पिंपरी-चिंचवड परिसरात विजांचा गडगडाटासह पाऊस | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

पिंपरी-चिंचवड परिसरात विजांचा गडगडाटासह पाऊस
पिंपरी-चिंचवड परिसरात विजांचा गडगडाटासह पाऊस

पिंपरी-चिंचवड परिसरात विजांचा गडगडाटासह पाऊस

sakal_logo
By

पिंपरी, ता. १७ : विजांचा प्रचंड आवाज, ढगांचा मोठा गडगडाट आणि मुसळधार सरी...अशा स्वरूपाचा पाऊस पिंपरी-चिंचवड शहरात सोमवारी रात्री झाला. विजांमुळे परिसरात भितीचे वातावरण निर्माण झाले होते. रस्त्यात जे अडकले, त्यांची अवस्था केविलवाणी झाली होती. कुठे आडोसा नाही आणि समोरचे काही दिसत नाही, अशी विचित्र परिस्थिती त्यांच्यावर ओढवली होती. दिवाळीमुळे बाजारपेठेत विविध साहित्याची विक्री करणारे आवरून घरी जाण्याच्या तयारीत असतानाच झालेल्या पावसाने त्यांचे नुकसान झाले. पावसाचा जोर रात्री बारानंतर कमी झाला. दरम्यान, हौसिंग सोसायट्यांचे पार्किंग व झोपडपट्ट्यांमध्ये पाणी शिरल्याने वाहने व पाणी बाहेर काढण्यासाठी रहिवाशांची धावपळ सुरू होती.

आपत्कालीन विभाग सज्ज
महापालिका आपत्कालीन विभाग सज्ज आहे. सर्व क्षेत्रीय कार्यालयांना अॅलर्टच्या सूचना दिल्या आहेत. अग्निशामक विभाग व वीज विभागाकडे अद्याप एकही कॉल आलेला नाही. प्रशासक शेखर सिंह सर्व परिस्थितीवर लक्ष ठेवून आहेत.

पिंपरी अजमेरा-मासूळकर कॉलनी
जोरदार पावसाने हजेरी लावली. नेहरूनगर, वास्तू उद्योग, मोरवाडी, लालटोपीनगर, यशवंतनगर, एच. ए. कॉलनी या भागात विजांच्या कडकडाटासह पाऊस झाला. अचानक आलेल्या पावसामुळे दुकाने बंद करून परतणाऱ्यांची चांगलीच तारांबळ उडाली. सोसायट्यांच्या पार्किंगमध्ये पाणी शिरले होते.

जुनी सांगवी परिसर
पावसाने नागरिक, भाजी विक्रेते, स्थानिक कार्यक्रम बाजारपेठा झोडपल्या. नवी सांगवी येथील कृष्णा चौकात सुरू असलेल्या कामामुळे नागरिकांची घरी परतण्यासाठी त्रेधा उडाली. येथील साई चौक ते माहेश्वरी चौक रस्ता, चंद्रमणीनगर चौक रस्ता, मुळा नदी किनारा रस्ता सखल भागातील रस्त्यांवरून पाणी वाहत होते. छोट्या गल्ल्यांमधील अनेक ठिकाणी चेंबर तुंबल्याने दापोडी भागात पडत्या पावसात नागरिकांना पाण्यातून वाट काढावी लागली.

भोसरी, इंद्रायणीनगर, दिघी परिसर
भोसरीतील पीएमटी चौक, पीसीएमसी चौक, अंकुशराव लांडगे नाट्यगृहासमोरील रस्ता, पुणे नाशिक महामार्गाच्या भोसरीतील कमानीसमोर, बापूजी बुवा चौक, दिघी रस्त्यावरील गंगोत्री पार्क, दिघीतील पुणे आळंदी रस्ता, इंद्रायणीनगरातील संतनगर चौक, इंद्रायणी चौक आदी भागात पाणी साचले होते.

पिंपळे गुरव परिसरात नदीचे स्वरूप
पिंपळे गुरव, नवी सांगवीतील अनेक भागांत पाणी साचले होते. रस्त्यांवरून पाण्याचे मोठ्या प्रमाणावर लोंढे वाहल्याचे दिसत होते. अनेक ठिकाणचे चेंबर तुंबल्याने पाणी साचून राहिले. काही उताराच्या भागावरून पाणी वाहत असल्याने त्याला नदीचे स्वरूप आले होते.

निगडी, तळवडे, देहूत मुसळधार
निगडी, तळवडे, देहूगाव परिसर निगडीतील टिळक चौक, दुर्गानगर चौक, तळवडेतील ज्योतिबा मंदिरासमोरील रस्ता, देहूतील मुख्य प्रवेशद्वार येथील रस्त्यांवर मोठ्या प्रमाणात पाणी वाहत होते. यातून मार्ग काढताना वाहनचालकांना कसरत करावी लागली.