वैद्यकीय अभ्यासक्रमाच्या प्रवेश प्रक्रियेस सुरवात | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

वैद्यकीय अभ्यासक्रमाच्या प्रवेश प्रक्रियेस सुरवात
वैद्यकीय अभ्यासक्रमाच्या प्रवेश प्रक्रियेस सुरवात

वैद्यकीय अभ्यासक्रमाच्या प्रवेश प्रक्रियेस सुरवात

sakal_logo
By

पुणे, ता. १८ : राज्यातील सरकारी, अनुदानित, खासगी विनाअनुदानित, अल्पसंख्याक संस्थांमधील एमबीबीएस, बीडीएस, बीएएमएस, बीएचएमएस अशा आरोग्य विज्ञान अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठी ऑनलाइन नोंदणी प्रक्रिया सुरू झाली आहे. तर एमबीबीएस, बीडीएससह अन्य काही अभ्यासक्रमांच्या पहिल्या फेरीतील निवड यादी २८ ऑक्टोबर रोजी जाहीर होणार आहे.

वैद्यकीय अभ्यासक्रमाची प्रवेश ‘नीट युजी २०२२’ची परीक्षा १७ जुलै रोजी झाली आणि या परीक्षेचा निकाल ७ सप्टेंबरला जाहीर झाला. त्यानंतर दीड महिन्यांनी वैद्यकीय अभ्यासक्रमाची प्रवेश प्रक्रिया जाहीर केली आहे. या प्रवेश प्रक्रियेअंतर्गत राज्यातील सरकारी, अनुदानित, महापालिका, खासगी विनाअनुदानित आणि अल्पसंख्याक संस्थांमध्ये आरोग्य विज्ञान अभ्यासक्रमाच्या प्रवेशाची प्रक्रिया राज्य सरकारच्या राज्य सामाईक प्रवेश परीक्षा कक्षाने (सीईटी सेल) जाहीर केली आहे.
देश पातळीवरील रॅंकमधील विद्यार्थी या प्रक्रियेत ऑनलाइन नावनोंदणी करू शकणार आहेत. एमबीबीएस, बीडीएस, बीएएमएस, बीएचएमएस, बीयुएमएस, बीपीटीएच, बीओटीएच, बीएएसएलपी, बी (पी ॲण्ड ओ), बी.एस्सी नर्सिंग अशा अभ्यासक्रमांसाठी या अंतर्गत नोंदणी करता येणार आहे. ऑनलाइन नोंदणी न केल्यास अशा विद्यार्थ्यांना प्रवेश प्रक्रियेत सहभागी करून घेणार नसल्याचे परीक्षा कक्षातर्फे सांगण्यात आले आहे. या प्रवेश प्रक्रियेच्या जाहीर केलेल्या वेळापत्रकात केंद्र व राज्य सरकार, न्यायालय, एमसीसी, एएसीसीसी यांच्या सूचनांनुसार बदल होऊ शकतो, असेही परीक्षा कक्षाने सांगितले आहे.
राज्यातील दोन लाख ५६ हजार १२६ विद्यार्थ्यांनी ‘नीट-युजी’ परीक्षेसाठी नोंदणी केली होती. तर दोन लाख ४४ हजार ९०३ विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली आणि त्यातील एक लाख १३ हजार ८१२ विद्यार्थी प्रवेशासाठी पात्र ठरले आहेत.

ऑनलाइन अर्ज करताना सावध व्हा !
विद्यार्थ्यांनो, वैद्यकीय अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठी ऑनलाइन अर्ज नोंदणी, अर्ज भरणे, नोंदणी शुल्क भरणे ही प्रक्रिया तुम्ही, एजंट किंवा सायबर कॅफेमार्फत करत असाल, तर सावध रहा. समजा संबंधित एजंट किंवा सायबर कॅफेतील व्यक्ती ऑनलाइन अर्ज भरण्यास किंवा शुल्क भरण्यास अयशस्वी झाल्यास आणि वेळेत अर्ज भरणे, शुल्क भरणे शक्य न झाल्यास त्यासाठी विद्यार्थी सर्वस्वी जबाबदार असणार आहे. अशा विद्यार्थ्यांनी संबंधित वेळमर्यादा संपल्यानंतर विनंती केली, तरीही त्याची दखल घेतली जाणार नाही, असे सीईटी सेलने स्पष्ट केले आहे.

विद्यार्थी- पालकांसाठी सूचना
- विद्यार्थ्यांनी ऑनलाइन नोंदणी करण्यापूर्वी माहिती पुस्तिका डाऊनलोड करून काळजीपूर्वक वाचावी
- नोंदणी शुल्क भरण्याची प्रक्रिया यशस्वी झाल्यानंतरच प्रवेश प्रक्रियेत सहभागी होता येणार
- अर्ज सबमिट केल्यानंतर त्यात कोणतेही बदल करता येणार नाहीत, त्यामुळे अर्ज नीट भरावा

आरोग्य विज्ञान अभ्यासक्रमांच्या प्रवेशाचे वेळापत्रक
तपशील : कालावधी
- ऑनलाइन नोंदणी (सर्व अभ्यासक्रमांसाठी) : २२ ऑक्टोबरपर्यंत
- नोंदणी शुल्क भरणे (ऑनलाइनच्या साहाय्याने) : २३ ऑक्टोबरपर्यंत
- प्रवेशासाठी कागदपत्रे अपलोड करणे : २४ ऑक्टोबर (सायंकाळी पाच वाजेपर्यंत)
- उपलब्ध जागांचा तपशील जाहीर करणे (ग्रुप ए - एमबीबीएस, बीडीएस. ग्रुप सी- बीपीटीएच, बीओटीएच, बीएएसएलपी, बी पी ॲण्ड ओ, बी.एस्सी (नर्सिंग) : २० ऑक्टोबर
- ऑनलाइन अर्जात प्राधान्यक्रम देणे (ग्रुप ए आणि ग्रुप सी) : २१ ते २७ ऑक्टोबर
- तात्पुरती गुणवत्ता यादी जाहीर करणे : २५ ऑक्टोबर
- पहिल्या फेरीसाठी विद्यार्थ्यांची निवड यादी जाहीर करणे : २८ ऑक्टोबर
- प्रत्यक्ष महाविद्यालयात जाऊन प्रवेशाची प्रक्रिया पूर्ण करणे : २९ ऑक्टोबर ते ४ नोव्हेंबर

विद्यार्थ्यांनी अधिक माहितीसाठी संकेतस्थळ : https://cetcell.mahacet.org