सोलू ते निरगुडी काम घेणार हाती | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

सोलू ते निरगुडी काम घेणार हाती
सोलू ते निरगुडी काम घेणार हाती

सोलू ते निरगुडी काम घेणार हाती

sakal_logo
By

सकाळ वृत्तसेवा
पुणे, ता. १८ : सोलू ते निरगुडी-वडगाव शिंदे दरम्यान सुमारे पाच किलोमीटर लांबीच्या रिंगरोडचे काम प्राधान्याने हाती घेण्याचा निर्णय पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाने (पीएमआरडीए) घेतला आहे. त्यामुळे पीएमआरडीएच्या या निर्णयामुळे पुणे-मुंबई एक्स्प्रेस वे ते नगर रस्ता दरम्यानचा एमएसआरडीचा रिंगरोड वेळेत पूर्ण होण्यास मदत होणार आहे.
प्रादेशिक विकास आराखड्यातील रिंगरोड विकसित करण्याचा निर्णय यापूर्वीच पीएमआरडीएने घेतला. एकूण १२८ किमी लांबीचा हा रिंगरोड होता. परंतु एमएसआरडीसी आणि पीएमआरडीए या दोन्हीचे रिंगरोड काही भागात एकाच गावातून जात असल्याचे समोर आले होते. त्यामुळे पीएमआरडीएच्या रिंगरोडची लांबी चाळीस मीटरने कमी करून ८१ किलोमीटर लांबीचा रिंगरोड करण्याचा निर्णय मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली पायाभूत समितीमध्ये घेण्यात आला होता. तसेच रिंगरोडची रुंदी कमी करून तो ६५ मीटरचा करण्याचा निर्णय पीएमआरडीने घेतला. त्यासाठी रुंदी कमी करण्यात आलेल्या रिंगरोडचे पुन्हा एकदा डीपीआर (सर्वंकष प्रकल्प अहवाल) तयार करण्यासाठी प्राधिकरणाकडून निविदा मागविण्यात आल्या. त्यानुसार मुंबई येथील एका सल्लागार कंपनीला हे काम देण्यात आले आहे. त्यामध्ये प्राधान्याने सेलू ते निरगुडी-वडगाव शिंदे दरम्यानच्या सुमारे पाच किलोमीटर लांबीच्या रिंगरोडचे सर्व्हेक्षण प्राधान्यक्रमाने पूर्ण करून द्यावे. उर्वरित रिंगरोडचे सर्व्हेक्षणाचे काम त्यानंतर पूर्ण करावे, असा निर्णय पीएमआरडीएने घेतला आहे. या कंपनीकडून पाच किलोमीटरचे सर्व्हेक्षणाचा अहवाल आल्यानंतर तत्काळ देखील रस्त्यासाठी भूसंपादनाचे प्रस्ताव तयार करून जिल्हा प्रशासनाकडे पाठविण्यात येणार आहे. जेणेकरून रिंगरोडचे काम वेळेत मार्गी लागण्यास मदत होणार आहे.

असे होणार पश्‍चिम भागातील काम
महाराष्ट्र रस्ते विकास महामंडळाकडून (एमएसआरडीसी) पश्‍चिम भागातील रिंगरोडचे काम हाती घेण्यात आला आहे. पुणे-मुंबई महामार्गावरील उर्से टोलनाक्यापासून हा रिंगरोड सुरू होणार आहे. तो नगर रस्त्याला वाघोली जवळ येऊन जोडणार आहे. त्यापैकी एक्स्प्रेस वे ते सोलू या दरम्यान ३८ किलोमीटरचे काम हे एमएसआरडीसी मिळणार करणार आहे. तर सोलू ते निरगुडी-वडगाव शिंदे दरम्यान पाच किलोमीटरचे काम हे पीएमआरडीए करणार आहे. तर वडगाव शिंदे ते वाघोली दरम्यानचे काम हे पुणे महापालिका करणार आहे. अशा पद्धतीने पश्‍चिम भागातील रिंगरोडचे काम करण्यात येणार आहे.

रिंगरोडचे सर्व्हेक्षण करण्यासाठी निविदा काढून कंपनी नेमण्यात आली आहे. या कंपनीला सोलू ते निरगुडी-वडगाव शिंदे दरम्यान ४.८० किलोमीटर लांबीचे सर्व्हेक्षण प्राधान्याने पूर्ण करून देण्याचे आदेश दिले आहेत. त्यानंतर हे काम तातडीने हाती घेण्यात येणार आहे.
- राहुल महिवाल, आयुक्त पीएमआरडीए