
कामगाराच्या खूनाप्रकरणी सात जणांना बेड्या
पुणे, ता. १८ ः वाळू उपसा करणाऱ्या मजुरांमध्ये झालेल्या भांडणानंतर एकाचा खून केल्याप्रकरणी उत्तमनगर पोलिसांनी सात जणांना अटक केली आहे. खुनाचे कारण अद्याप समजू शकले नाही. आरोपींनी तरुणाचा खून करून पुरावा नष्ट करण्यासाठी मृतदेह रस्त्याच्याकडेला असलेल्या चरीत टाकून दिला होता. ही घटना १० ऑक्टोबरला पहाटेच्या सुमारास खडकवासला परिसरात घडली होती. ओंकार सुपेकर (वय २२) असे खून झालेल्या तरुणाचे नाव आहे. या प्रकरणी अजय पवार (वय ३०), बाळासाहेब गजरे (वय ३४), निखिल चोरे (वय १९), विजय गांजरे (वय ४०), सचिन कापसे (वय ४१), रोहित ढिले (वय २९), गणेश शिंदे (वय ४७) अशी अटकेतील आरोपींची नावे आहेत. वरिष्ठ पोलिस निरीक्षक सुनील जैतापुरकर यांनी दिलेल्या माहितीनुसार, खडकवासला धरण परिसरात सिंहगड सृष्टी इमारतीच्या मागील बाजूला असलेल्या चरीत १० ऑक्टोबरला एका तरुणाचा मृतदेह आढळून आला होता. याप्रकरणी उत्तमनगर पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यू अशी नोंद केली होती. शवविच्छेदन झाल्यानंतर याप्रकरणी खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. यानंतर पोलिसांनी तपास करत सात आरोपींना अटक केली.