अनिर्बंध विकासाने ‘धुतले’ पुण्याला काँक्रिटीकरणाने ‘धुतले’ पुण्याला | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

अनिर्बंध विकासाने ‘धुतले’ पुण्याला
काँक्रिटीकरणाने ‘धुतले’ पुण्याला
अनिर्बंध विकासाने ‘धुतले’ पुण्याला काँक्रिटीकरणाने ‘धुतले’ पुण्याला

अनिर्बंध विकासाने ‘धुतले’ पुण्याला काँक्रिटीकरणाने ‘धुतले’ पुण्याला

sakal_logo
By

पुणे, ता. १८ : अवघे दोन तास पडलेल्या पावसाने पुणे अक्षरशः धुतले जाते, याचं खापर फक्त बदललेल्या पावसाच्या स्वरूपावर फोडता येणार नाही. शहराचा विकास करताना बेसुमार केलेले सिमेंट काँक्रिटीकरण, पर्यावरणाचा विचार न करता बांधलेल्या टोलेजंग इमारती आणि रस्ते, पदपथ करताना पावसाचे पाणी वाहून जाण्याची न केलेली व्यवस्था हे जास्त कारणीभूत आहेत, असा निष्कर्ष विविध हवामान आणि पर्यावरण तज्ज्ञांच्या बोलण्यातून निघाला.
पुण्यात वर्षांनूवर्ष पाऊस पडतो आहे. त्यावेळी मुठा नदीला पूर आल्यानंतर काठावरच्या घरांमध्ये पाणी शिरायचे. पण, रस्त्यावरून वाहणाऱ्या पाण्याचे लोंढे घरात, दुकानांमध्ये गेल्याचे जुन्या पुणेकरांना आठवतही नाही. पण, आता तासाभराच्या पावसानेही शहरात पाणी साचून राहाते. त्याचा निचरा होत नाही. कारण, पावसाचे पाणी वाहून जाण्याची सक्षम व्यवस्था नाही, असे भूअभ्यासक गिरीश ताकवले यांनी सांगितले.
भारतीय हवामान खात्याचे निवृत्त महासंचालक डॉ. रंजन केळकर म्हणाले, “पाऊस म्हणजे पूर, असे एक नवीन समीकरण निर्माण होत आहे. पाऊस आला म्हणजे लोकं पाण्यात बुडणार, घरांमध्ये-दुकानांमध्ये पाणी जाणार हे निश्चित असते. जेमतेम तासाभराच्या पावसाने हे असंच चित्र आपल्याला दिसतं. याचं प्रमुख कारण रस्त्यावरून पाणी वाहून जात नाही, हे आहे.”
“पाऊस बदललेला नाही. तर आपल्या अवती-भोवतीची परिस्थिती खूप बदलली आहे. सोमवारी रात्री दोन तासांमध्ये ८० मिलिमीटर पाऊस पडला. २०-२५ वर्षांपूर्वी हा पाऊस असाच पडला असता तर आपल्याला आश्चर्य वाटलं नसतं. पण, आता ते वाटतं. कारण, पडलेल्या पावसाचे पाणी वाहून जात नाही, ही नवीन समस्या निर्माण झाली आहे. ही निश्चित जुनी समस्या नाही,” असेही त्यांनी सांगितले.

हवामान बदल
कमी वेळेत मुसळधार पडणारा पाऊस ही सह्याद्री पर्वत रांगेतील गेल्या चार ते पाच वर्षांमध्ये प्रकर्षाने पुढे आलेली समस्या आहे. वरंधा घाटामध्ये कोसळलेल्या कडा हे त्याचे उत्कृष्ट उदाहरण आहे. खडकाच्या स्तरावर माती तयार होण्याची प्रक्रिया हजारो वर्षांपासून सुरू असते. वळवाचा पाऊस पडला की, या मातीतील गवत, वनस्पती उगवतात. त्यातून पावसाळ्यापर्यंत या वनस्पतींची चांगली वाढ होऊन माती धरून ठेवण्यासाठी या उपयुक्त ठरतात. गेल्या काही वर्षांपासून मॉन्सूनपूर्व पाऊस पडत नाही. थेट जून-जुलैमध्ये जोरदार पावसाला सुरवात होते. त्यामुळे या वनस्पतींची वाढ होत नाही. हा जसा डोंगरमाथ्यावर परिणाम होतो, तसाच पाणी वाहून न जाणे, ते घरांमध्ये शिरणे, पाण्याच्या वेगात वाहने वाहून जाणे या हवामान बदलाच्या शहरी भागातील समस्या आहेत.

आरोग्यावर होणारा परिणाम
सकाळी उन्हाचा चटका, संध्याकाळी ढगाळ वातावरण आणि रात्री मुसळधार पाऊस याचा थेट परिणाम आरोग्यावर होत आहे. अशा विषम वातावरणामध्ये स्वाइन फ्ल्यूच्या ‘एच१-एन१’सारख्या विषाणूंचा संसर्ग वाढण्याचा धोका असतो. तसेच, सर्दी, ताप, खोकला, थंडी, डोकेदुखी अशी फ्ल्यूची लक्षणे असलेल्या रुग्णांची संख्या वाढते, अशी माहिती वैद्यकीय तज्ज्ञ डॉ. राहुल पठारे यांनी दिली.

पश्चिम घाटावर दुष्परिणाम
अनियमित पावसाचा पश्चिम घाटावर परिणाम होत आहे. त्यामुळे दरडी कोसळल्या आहेत, पूर आले आहेत. पण, पावसाच्या जोडीने पश्चिम घाटामध्ये सुरू असलेल्या बेकायदेशीर दगडखाणी, रस्त्यांच्या विकासासाठी बेसुमार झाडे तोडणे या सर्वांचा दुष्परिणाम पश्चिम घाटावर होत आहे, असे ज्येष्ठ पर्यावरण तज्ज्ञ माधव गाडगीळ यांनी सांगितले.

पावसाळ्यातील पाऊस
जून ........... २०९.८ मिलिमीटर (७० टक्के)

जुलै .......... ६७७.५ मिलिमीटर(२७ टक्के)
ऑगस्ट ....... ९५७.१ मिलिमीटर (१८ टक्के)

ऑक्टोबरमधील पाऊस
२०१९ ....... २३५ मिलिमीटर
२०२० ...... ३१२ मिलिमीटर
२०२१ ....... २८१.७ मिलिमीटर

या भागात बसतो सर्वाधिक फटका
- शहरात सखल भागात असलेल्या भागांना पावसाच्या पाण्याचा सर्वाधिक फटका बसतो. शहराच्या उंच भागात पडलेल्या पावसाचे पाणी उताराने सखल भागात येते. त्यामुळे विधी महाविद्यालय रस्त्यावरून येणारे पाणी डेक्कनच्या भागात साचते.
- सातारा रस्त्यावरून येणाऱ्या पाण्यामुळे पद्मावती, चव्हाण नगर, स्वारगेट तर शिवाजी रस्त्याने येणाऱ्या पाण्याचा फटका बुधवार पेठ, रविवारी पेठ, कसबा पेठ भागांना बसतो.
- नागझरी आणि माणिक नाला येथून येणारे पाणी सोमवार पेठ, जुना बाजार परिसर, मंगळवार, रविवार, सोमवार आणि महात्मा फुले या पेठांमध्ये पाणी शिरते.
- एमआयटी, वेताळ टेकडी या भागात पडलेल्या पावसाचे पाणी कोथरूड आणि परिसरात जमा होते.