राज्य बॅंकेच्या कर्मचाऱ्यांना १३.२५ टक्के बोनस | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

राज्य बॅंकेच्या कर्मचाऱ्यांना १३.२५ टक्के बोनस
राज्य बॅंकेच्या कर्मचाऱ्यांना १३.२५ टक्के बोनस

राज्य बॅंकेच्या कर्मचाऱ्यांना १३.२५ टक्के बोनस

sakal_logo
By

पुणे, ता. १८ : महाराष्ट्र राज्य सहकारी बॅंकेच्या १११ व्या वर्धापन दिनानिमित्त बँकेचे प्रशासक विद्याधर अनास्कर यांनी कर्मचाऱ्यांना गतवर्षीपेक्षा जास्त म्हणजे १३.२५ टक्के इतका उच्चांकी बोनस जाहीर केला. इतकेच नव्हे तर वर्धापन दिनादिवशीच कर्मचाऱ्यांच्या खात्यात बोनसची रक्कम जमा करीत त्यांचा आनंद द्विगुणित केला. गतवर्षी बँकेने कर्मचाऱ्यांना १२.५० टक्के इतका बोनस जाहीर केला होता.

धनंजयराव गाडगीळ, वैकुंठभाई मेहता आणि विठ्ठलदास ठाकरसी या सहकारातील दिग्गजांचे स्मरण करत राज्य सहकारी बँकेचा १११ वा वर्धापन दिन मुंबई येथील बँकेच्या मुख्य कार्यालयात उत्साहाने पार पडला. विठ्ठलदास ठाकरसी हे बँकेचे पहिले अध्यक्ष होते. धनंजयराव गाडगीळ हे कित्येक वर्षे संचालक आणि पाच वर्षे अध्यक्ष होते. तर, वैकुंठभाई मेहता हे सुमारे २५ वर्षे बँकेचे व्यवस्थापकीय संचालक होते. या बँकेने आज देशातच नव्हे तर आशिया खंडातील उत्कृष्ट राज्य बँक म्हणून नावलौकीक मिळविला आहे.
समारंभात बँकेच्या प्रगतीत मोलाची कामगिरी करणाऱ्या विविध विभागांचा प्रशासकांच्या हस्ते गौरव करण्यात आला. त्यानंतर प्रशासकांनी बँकेच्या पुढील वाटचालीसंदर्भात कर्मचाऱ्यांशी प्रेरणादायी संवाद साधला. सूत्रसंचालन बॅंकेचे व्यवस्थापकीय संचालक डॉ. अजित देशमुख यांनी केले.

राज्य बॅंकेला ६०३ कोटींचा निव्वळ नफा

राज्य बॅंकेच्या ३१ मार्च २०२२ अखेर ठेवी २१ हजार ६७ कोटी रुपये आणि कर्जे २५ हजार ९६० कोटी रुपये इतके आहे. बॅंकेचा एकूण व्यवहार ४७ हजार २७ कोटी रुपये असून, निव्वळ नफा ६०३ कोटी रुपये प्राप्त झाला आहे. तर, अनुत्पादक कर्जाचे निव्वळ प्रमाण शून्य आहे.