पावसाचा जोर कमी होण्याची चिन्हे | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

पावसाचा जोर कमी होण्याची चिन्हे
पावसाचा जोर कमी होण्याची चिन्हे

पावसाचा जोर कमी होण्याची चिन्हे

sakal_logo
By

पुणे, ता. १८ : पुणे आणि परिसरात बुधवारी (ता.१९) आणि गुरुवारी (ता.२०) आकाश अंशतः ढगाळ राहून दुपार आणि सायंकाळनंतर मेघगर्जनेसह विजांचा कडकडाट आणि हलक्या स्वरूपाचा पाऊस होण्याची शक्यता भारतीय हवामानशास्त्र विभागाने वर्तविली आहे.
पुण्यात मंगळवारी हलक्या स्वरूपाचा पाऊस नोंदविला. राज्यात कोकण-गोवा, मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यात तुरळक ठिकाणी मेघगर्जना व विजांचा कडकडाट होण्याची शक्यता आहे. पावसाचा जोर ओसरेल, असा अंदाज हवामानशास्त्र विभागाने दिला आहे.
बंगालच्या उपसागरात आग्नेय आणि पूर्व-मध्य भागात चक्रीय वाऱ्याची स्थिती निर्माण झाली असून येत्या दोन दिवसांत हवेचा कमी दाबाचा पट्टा तयार होण्याची शक्यता आहे. शनिवारपर्यंत (ता.२२) येथे अतितीव्र कमी दाबाचे क्षेत्र तयार होण्याची शक्यता आहे. या कमी दाबाच्या क्षेत्राचा प्रभाव कायम राहिल्यास बंगालच्या उपसागरात पश्चिम-मध्य भागात पुढील आठवड्यात चक्रीवादळात रूपांतर होऊ शकते, असे हवामानशास्त्र विभागाने सांगितले. महाराष्ट्रातील उर्वरित भाग आणि विदर्भासह छत्तीसगड, झारखंड, ओरिसा आणि पश्चिम बंगालमधून नैऋत्य मोसमी वारे परतण्यास पूरक वातावरण आहे. त्यामुळे राज्यातील आणखी काही भागातून मॉन्सून परतण्याची चिन्हे आहेत. पश्चिम महाराष्ट्रातून आणि पुण्यात शुक्रवारनंतर (ता.२१) पावसाचा जोर कमी होण्याची शक्यता हवामानशास्त्र विभागाने वर्तविली आहे.