चाकणमधील ४६८ उद्योगांना पर्यायी मार्गातून वीज पुरवठा | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

चाकणमधील ४६८ उद्योगांना पर्यायी मार्गातून वीज पुरवठा
चाकणमधील ४६८ उद्योगांना पर्यायी मार्गातून वीज पुरवठा

चाकणमधील ४६८ उद्योगांना पर्यायी मार्गातून वीज पुरवठा

sakal_logo
By

पुणे, ता. १८ ः चाकण येथील महापारेषण कंपनीच्या अतिउच्चदाबाची वाहिनी असलेल्या ४२० किलोवॉट क्षमतेच्या वीज उपकेंद्रांतील विद्युत रोहित्र मंगळवारी दुपारी साडेबारा वाजता अचानकपणे जळाले. यामुळे विद्युत रोहित्रावरील महावितरणच्या २२ किलोवॉट सहा वीजवाहिन्यांचा वीजपुरवठा खंडित झाला. यामुळे चाकण येथील महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळातील (एमआयडीसी) उच्च व लघुदाबाच्या विजेवर चालणारे ४६८ उद्योग आणि सुमारे ८५० घरगुती व अन्य ग्राहकांचा वीजपुरवठा विस्कळित झाला आहे.
महापारेषण कंपनीच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी नाव न छापण्याच्या अटीवर या वृत्ताला दुजोरा दिला आहे. या सर्व उद्योगांना तात्पुरत्या स्वरूपात पर्यायी मार्गाने वीज पुरवठा करण्यात आला आहे. शिवाय नादुरुस्त झालेल्या विद्युत रोहित्र दुरुस्तीचे काम रात्री उशिरापर्यंत चालू होते. हा रोहित्र दुरुस्त झाल्यानंतर पुन्हा वीज पुरवठा पुर्ववत होऊ शकणार आहे. महावितरणने कंपन्यांसोबतच अन्य सर्व वीज ग्राहकांचाही वीज पुरवठा पर्यायी मार्गाने सुरु केला आहे.
महापारेषणच्या चाकण येथील दुसऱ्या अतिउच्चदाब १३२ किलोवॉट क्षमतेच्या उपकेंद्रातील विद्युत रोहित्रवर या सहा वीज वाहिन्यांचा वीज भार काही प्रमाणात वळविला आहे. नादुरुस्त झालेल्या रोहित्राचे काम उद्या दुपारपर्यंत (ता.१९) पूर्ण होण्याची शक्यता वर्तविली आहे. भारनियमन टाळून या ४६८ उद्योगांना आणि अन्य सर्व ग्राहकांना सुरळीत वीजपुरवठा करण्यासाठी महावितरणकडून प्रयत्न करण्यात येत असल्याचेही या अधिकाऱ्याने सांगितले.