‘जी २०’ परिषद : पुण्याला आंतरराष्ट्रीय स्तरावर झळकण्याची संधी चौक सुशोभिकरणासोबतच रस्ता दुरुस्तीचे आव्हान | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

‘जी २०’ परिषद : पुण्याला आंतरराष्ट्रीय स्तरावर झळकण्याची संधी 
चौक सुशोभिकरणासोबतच रस्ता दुरुस्तीचे आव्हान
‘जी २०’ परिषद : पुण्याला आंतरराष्ट्रीय स्तरावर झळकण्याची संधी चौक सुशोभिकरणासोबतच रस्ता दुरुस्तीचे आव्हान

‘जी २०’ परिषद : पुण्याला आंतरराष्ट्रीय स्तरावर झळकण्याची संधी चौक सुशोभिकरणासोबतच रस्ता दुरुस्तीचे आव्हान

sakal_logo
By

पुणे, ता. २१ : पुढीलवर्षी भारतात होणाऱ्या ‘जी २०’ परिषदेच्या निमित्ताने पुण्याला पुन्हा एकदा जागतिक स्तरावर नाव कमाविण्याची संधी मिळणार आहे. या संधीचे सोने करण्यासाठी पुणे महापालिकेने तयारी सुरू केली आहे. पहिल्या टप्प्यात शहरातील साठ चौकांचे सुशोभीकरण होणार आहे. चौकांबरोबरच शहरातील रस्त्यांची दुरवस्था सुधारण्याचे आव्हानही महापालिकेसमोर आहे.

आर्थिकदृष्ट्या प्रगत २० देशांची आणि केंद्रीय बँकांच्या प्रमुखांची जी २० ही संघटना आहे. परिषदेत जागतिक अर्थव्यवस्थेतील प्रश्न, सद्यःस्थिती, भविष्यातील वाटचाल यावर चर्चा करून धोरण निश्चित केले जाते. संघटनेच्या वार्षिक बैठकीत २० देशांचे प्रमुख, अर्थमंत्री आणि केंद्रीय बँकांचे गव्हर्नर सहभागी होतात. २०२३ च्या ‘जी २०’ परिषदेचा आयोजक भारत आहे. भारतातील परिषदेत होणाऱ्या २१३ बैठकांपैकी महाराष्ट्रात १३ होतील. यासाठी मुंबई, पुणे आणि औरंगाबाद या तीन शहरांची निवड झाली आहे.

या पार्श्‍वभूमीवर राज्याचे मुख्य सचिव मनुकुमार श्रीवास्तव यांनी काही आठवड्यांपूर्वी बैठक घेऊन शहराच्या सौंदर्यीकरण व स्वच्छतेसंदर्भात महापालिकेला आदेश दिले आहेत. सध्या शहरातील रस्त्यांची स्थिती गंभीर आहे. पावसाळ्यात पुणेकरांना भयंकर त्रासाला सामोरे जावे लागले. निकृष्ट काम करणाऱ्या १३ ठेकेदारांना महापालिका आयुक्तांनी काळ्यायादीत टाकले. उपअभियंत्यांना दंड ठोठावला. तरीही रस्त्यांची दुरवस्था कायम आहे. मेट्रो, उड्डाणपुलांच्या कामांमुळेही प्रमुख रस्त्यांची दुरवस्था झाली आहे. ‘जी २०’ परिषद पुढील वर्षी होत असताना जे ६० चौक सुशोभित केले जाणार आहेत, त्या परिसरातील सर्व रस्ते चांगले करण्याचे आव्हानही महापालिकेपुढे आहे.

पथ विभागाकडे यंदा ३५० कोटी रुपयांचा निधी आहे. त्यामध्ये दुरुस्ती, डांबरीकरण केले जाणार आहे. पण हा निधी अपुरा आहे, ‘जी २०’च्या निमित्ताने सर्व रस्त्यांचे पूर्ण डांबरीकरण करण्यासाठी किमान ४०० कोटींचा खर्च अपेक्षित आहे. परंतु, तरतूद उपलब्ध नाही असे अधिकाऱ्यांनी सांगितले.

सुशोभीकरण होणारे भाग
प्रमुख ६० चौक सुशोभित केले जातील. यामध्ये नगर रस्ता, येरवडा, विमाननगर, खराडी, विश्रांतवाडी, मुंढवा, हडपसर, वानवडी, फुरसुंगी, कोंढवा, खडी मशिन, स्वारगेट परिसर, कात्रज, नवले पूल, वडगाव चौक, पौड रस्ता, कर्वे रस्ता, बाणेर, सातारा रस्ता, वारजे, धायरी, महंमदवाडी या भागांचा समावेश आहे. आतापर्यंत २५ चौकांची जबाबदारी खासगी संस्थांनी घेतली आहे.

सुशोभीकरण कशासाठी...
- परिषदेसाठी २० देशांचे २०० पेक्षा जास्त प्रतिनिधी पुण्यात येणार.
- विदेशी प्रभावशाली व्यक्ती ऐतिहासिक, सांस्कृतिक व इतर पर्यटनस्थळांना भेट देणार.
- शहरांतर्गत प्रवासादरम्यान स्वच्छता, सुशोभीकरणातून पुण्याची आंतरराष्ट्रीय प्रतिमा निर्माण होणार.
- बांधकाम व्यावसायिक, खासगी कंपन्यांशी संपर्क साधून पीपीपी तत्त्वावर सुशोभीकरण होणार.
- पुढील पाच वर्षांसाठी या चौकांची देखभाल, दुरुस्ती व सजावट या कंपन्या करणार.