विद्येच्या प्रांगणात | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

विद्येच्या प्रांगणात
विद्येच्या प्रांगणात

विद्येच्या प्रांगणात

sakal_logo
By

राज्यस्तरीय विज्ञान नाट्य
स्पर्धेत ‘रमणबाग’ विजेते
पुणे : केंद्र सरकारच्या सांस्कृतिक मंत्रालयाच्या नेहरू सायन्स सेंटर आणि नागपूरच्या गणित व विज्ञान संस्थेच्या वतीने आयोजित केलेल्या ‘राज्यस्तरीय विज्ञान नाट्य स्पर्धे’त पुणे विभागातील न्यू इंग्लिश स्कूल रमणबागने विजेतेपद पटकाविले. स्पर्धेत शाळेने ‘कहानी रेबीज व्हॅक्सिन की’ हे नाटक सादर केले. स्पर्धेत ईशान जबडे या विद्यार्थ्याला उत्कृष्ट अभिनेता आणि रवींद्र सातपुते या शिक्षकाला उत्कृष्ट दिग्दर्शकाचे पारितोषिक मिळाले. या यशामुळे शाळेची राष्ट्रीय स्पर्धेच्या पूर्व विभागीय स्पर्धेसाठी निवड झाली आहे. कोल्हापूर विभागातील चिपळूणच्या एसपीएम इंग्लिश मीडियम स्कूलने दुसरा क्रमांक मिळविला आहे. राज्य विज्ञान शिक्षण संस्थेचे माजी संचालक नारायण जोशी यांच्या हस्ते स्पर्धेचा बक्षीस वितरण समारंभ झाला.

भेकराईमाता विद्यालयात वाचन प्रेरणा दिन साजरा
पुणे : फुरसुंगी येथील श्री शंभु महादेव देवस्थान ट्रस्टच्या श्री भेकराईमाता प्राथमिक माध्यमिक विद्यालयात दिवंगत माजी राष्ट्रपती डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम यांच्या जन्मदिवसाचे औचित्य साधून वाचन प्रेरणा दिवस साजरा करण्यात आला. यावेळी विद्यार्थ्यांनी ‘सकाळ’ वर्तमानपत्र वाचण्यास देण्यात आले. कार्यक्रमात ‘सकाळ’चे वरिष्ठ वितरण व्यवस्थापक पराग समुद्र, प्रतिनिधी सुनील गाडेकर प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. शाळेच्या ग्रंथपाल विद्या थोरात, विद्यालयाचे पदाधिकारी सत्यदेव दळवी, रंजना जगताप, सुनील कामठे, राहुल घोंगडे आदी सहभागी झाले होते. कामठे यांनी डॉ. कलाम यांच्या जीवनातील संघर्षाबद्दल तसेच संशोधनाबद्दल माहिती दिली. यानिमित्त विद्यालयामध्ये पुस्तक प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले होते.

सामाजिक बांधिलकी जपत दिवाळी साजरी
पुणे : विश्वकर्मा विद्यालयातील विद्यार्थ्यांनी आपल्या खाऊच्या पैशातून सीमेवरील जवान, दुर्धर आजारांवर उपचार घेणारे आजी-आजोबा यांच्यासाठी भेट कार्ड, आकाशकंदील, पणत्या, दिवाळीचा फराळ देत दिवाळी साजरी केली. या अंतर्गत भारतीय सीमेवर लढणाऱ्या सैनिकांना दिवाळी फराळ, भेटकार्ड, दिवाळी संदेश सैनिक मित्र परिवारामार्फत पाठविण्यात आले. तसेच ‘उमेद केअर’ या आजी-आजोबांचा सांभाळ करणाऱ्या संस्थेस विद्यालयातील शिक्षक, विद्यार्थी तसेच पालकांनी सदिच्छा भेट दिली. या भेटीचे नियोजन सांस्कृतिक प्रमुख सुप्रिया नाईक आणि शिक्षकांनी केले. यासाठी संस्था प्रमुख तृप्ती अग्रवाल, संस्था सचिव आर. सी. बेटावदकर, शाळेच्या मुख्याध्यापिका सुनंदा सरडे यांनी मार्गदर्शन केले.

क्लारा ग्लोबल स्कूलमध्ये विज्ञान प्रदर्शन
पुणे : बी. टी. कवडे रस्ता येथील क्लारा ग्लोबल स्कूलमध्ये विज्ञान प्रदर्शन भरविण्यात आले होते. प्रदर्शनात नर्सरी ते दहावीच्या विद्यार्थ्यांनी विज्ञानाशी संबंधित मॉडेल्स तयार केली होती. ‘विज्ञानाची अनेक रूपं’ या संकल्पनेवर आधारित हे प्रदर्शन होते. यावेळी विद्यार्थ्यांनी नृत्य करून भारतीय संस्कृतीचे दर्शन घडवले. मुलांनी विविध राज्यातील खाद्यपदार्थ व पोशाख यांचे वर्णन केले. अंतराळवीर, अपोलो ११ यान, चंद्रावर मानवाचे पहिले पाऊल हे प्रदर्शनाचे मुख्य आकर्षण होते. शाळेचे अध्यक्ष चंद्रकांत कवडे, विशाल कवडे, साहेबराव बाबर, सागर बाबर, मुख्याध्यापिका सारिका बाबर आदी उपस्थित होते.

वाचन प्रेरणा दिवस साजरा
पुणे : किलबिल विद्यालयात दिवंगत माजी राष्ट्रपती डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम यांच्या जन्मदिवसानिमित्त ‘सकाळ’च्या माध्यमातून वाचन प्रेरणा दिवस साजरा करण्यात आला. यावेळी इयत्ता नववीतील श्वेता जाधव या विद्यार्थिनीने डॉ. कलाम यांची माहिती दिली. तर हिमांशू राय या विद्यार्थ्यांने वाचनाचे महत्त्व स्पष्ट केले. या कार्यक्रमाद्वारे शाळेतील ग्रंथालयातील पुस्तके वाचण्यासाठी विद्यार्थ्यांना प्रवृत्त करण्यात आले. यावेळी योगेश बाचल, महेश कुंभार आदी मान्यवर उपस्थित होते.