ऐन दिवाळीत कंत्राटी कामगार बिनपगारी पुणे महापालिका ः साडेआठ हजार कर्मचारी तीन महिन्यांपासून वाऱ्यावर | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

ऐन दिवाळीत कंत्राटी कामगार बिनपगारी
पुणे महापालिका ः साडेआठ हजार कर्मचारी तीन महिन्यांपासून वाऱ्यावर
ऐन दिवाळीत कंत्राटी कामगार बिनपगारी पुणे महापालिका ः साडेआठ हजार कर्मचारी तीन महिन्यांपासून वाऱ्यावर

ऐन दिवाळीत कंत्राटी कामगार बिनपगारी पुणे महापालिका ः साडेआठ हजार कर्मचारी तीन महिन्यांपासून वाऱ्यावर

sakal_logo
By

पुणे, ता. २१ ः तुम्ही सगळे दिवाळीच्या उत्साही, आनंदी वातावरणात असाल. कपडे, घरातील वस्तूंची खरेदी जोरदार सुरू असेल, फराळ तयार करण्याची गडबड तर असणारच. असे संपूर्ण शहर आनंदोत्सव साजरा करत असताना. एक घटक मात्र असा आहे, जो आॅगस्टपासून पगाराची वाट पाहात आहे. महापालिकेच्या अधिकाऱ्यांना लाखाच्या घरात बोनस मिळाला. सातव्या वेतन आयोगाचा लाखो रुपयांचा फरक मिळाला. पण याच महापालिकेत कंत्राटी काम करणारे सुरक्षा रक्षक, चालक, सफाई कर्मचारी मात्र हक्काच्या पगारासाठी डोळे लावून बसले आहेत. ऐन दिवाळीत सुमारे साडेआठ हजार कर्मचाऱ्यांच्या घरात दिवाळीची पणती पेटलेली नाही. साडे आठ हजार कोटींचा अर्थसंकल्प असलेल्या महापालिकेतील ही भयाण अवस्था आहे.

महापालिकेत अपुरे कर्मचारी असल्याने कंत्राटी कर्मचारी घेतले जातात. त्यांना किमान वेतन, पीएफ, इसीएस यासह सुमारे २० हजार रुपये पगार आहे. पगारातील कपात वगळून हातात १६ ते १८ हजार रुपये येतात. यामध्ये सर्वाधिक १५९० सुरक्षा रक्षक आहेत. पाणी पुरवठा विभागाचे पाणी सोडणारे ४०० कर्मचारी, पथ विभागाकडे असलेले सुमारे २०० कर्मचारी, मोटार वाहन विभागाकडील १२०० कर्मचारी, प्रत्येक क्षेत्रीय कार्यालयाकडे असलेले झाडलोट काम करणारे कर्मचारी असे सुमारे साडे चार हजार कर्मचारी आहेत. याचप्रमाणे आरोग्य, संगणक, विद्युत, मंडई, अतिक्रमण यासह २८ विभागांकडे कंत्राटी कर्मचारी आहेत. हे कामगार पुरविण्याची निविदा आपल्याच माणसाला मिळावी म्हणून राजकीय नेते प्रचंड दबाव आणतात, सोयीच्या अटी टाकून घेतात, पण एकदा निविदा मिळाल्यानंतर कर्मचाऱ्यांना मात्र वाऱ्यावर सोडून दिले जात असल्याचा प्रकार वारंवार घडत आहे.
भाजपचे नेते आमदार प्रसाद लाड यांच्याशी संबंधित असलेल्या क्रिस्टल इंडिया प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीकडून पुणे महापालिकेने १५९० सुरक्षा रक्षक (बहुउद्देशीय कामगार) घेतले. त्यांना आॅगस्ट, सप्टेंबर या दोन महिन्यांचे पगार दिलेला नाहीत. दोन महिने हे कर्मचारी पगाराची वाट पाहत असताना ऐन दिवाळीत कर्मचाऱ्यांना उसने किंवा व्याजाने पैसे घेऊन दिवाळी साजरी करण्याची नामुष्की आली आहे. महापालिकेच्या अधिकाऱ्यांना विचारले असता ठेकेदाराने प्रत्येक महिन्याच्या १० तारखेला पगार जमा करणे आवश्‍यक आहे, त्यानंतर आमच्याकडे बिल सादर केले पाहिजे. तीन महिने पगार होत नसल्याने त्याबद्दल कारवाई केली जात नाही. अशीच अवस्था चालक, झाडलोट काम करणारे कर्मचारी, पाणी सोडणारे कर्मचाऱ्यांची आहे. आज काही संघटना, पक्षांकडून आयुक्त, अतिरिक्त आयुक्तांना भेटून पगार देण्याची मागणी केली, त्यानंतर संध्याकाळपर्यंत किमान एका महिन्याचा तरी पगार करू, अशी बोळवण करून त्यांना पाठवून दिले.

सुरक्षा रक्षकांसह इतर सर्व कंत्राटी कामगारांचे वेतन करण्यासाठी आम्ही गेल्या दोन दिवसांपासून प्रयत्न करत आहोत. ठेकेदारांना त्वरित वेतन द्यावे, असे आदेश दिलेले आहेत. आज सायंकाळपर्यंत कर्मचाऱ्यांच्या खात्यावर पैसे जमा होतील.
- डॉ. कुणाल खेमणार, अतिरिक्त आयुक्त

महापालिकेत नियुक्तीस असलेल्या सुरक्षा रक्षकांना पगार देण्यास सांगितले असून, लवकरच बँक खात्यात पैसे जमा होतील.
- प्रसाद लाड, आमदार

महापालिकेतील कंत्राटी सुरक्षा रक्षकांचे वेतन त्वरित द्यावे व हे वेतन वेळेवर न देणाऱ्या क्रिस्टल इंटिग्रेटेड सर्व्हिसेस प्रा. लि. कंपनीला काळ्या यादीत टाकावे, अशी मागणी आयुक्तांकडे केली. ही कंपनी भाजप आमदार प्रसाद लाड यांची असल्याने तिच्यावर कारवाई होत नाही.
-डॉ. अभिजित मोरे, प्रवक्ते, आप

सुरक्षा रक्षकांसह इतर सर्वच कर्मचाऱ्यांचे दोन महिन्याचे वेतन मिळालेले नाही. आता दिवाळीतसुद्धा कर्मचाऱ्यांना वेतन न देणे म्हणजे ही खूप मोठी पिळवणूक आहे. तसेच या कर्मचाऱ्यांना दिवाळीला बोनस देण्याची जबाबदारीही महापालिकेची आहे. त्यासाठीही आमचे प्रयत्न सुरू आहेत.
- सुनील शिंदे, अध्यक्ष, राष्ट्रीय मजदूर संघ