पुणे व परिसरात ओसरणार पावसाचा जोर कोकण, मध्य महाराष्ट्रासह मराठवाड्यात तुरळक सरींची शक्यता | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

पुणे व परिसरात ओसरणार पावसाचा जोर
कोकण, मध्य महाराष्ट्रासह मराठवाड्यात तुरळक सरींची शक्यता
पुणे व परिसरात ओसरणार पावसाचा जोर कोकण, मध्य महाराष्ट्रासह मराठवाड्यात तुरळक सरींची शक्यता

पुणे व परिसरात ओसरणार पावसाचा जोर कोकण, मध्य महाराष्ट्रासह मराठवाड्यात तुरळक सरींची शक्यता

sakal_logo
By

पुणे, ता. २१ : दिवाळीपूर्वीच शहर व परिसरात पावसाच्या धमाक्यानंतर आता पावसाचा जोर ओसरण्याची चिन्हे आहेत. ऊन-पावसाचा खेळ आता लवकरच संपणार असून, पुणे व परिसरातून पाऊस काढता पाय घेणार आहे, असा अंदाज हवामानशास्त्र विभागाने वर्तवला आहे.

गेल्या आठवडाभरापासून शहरात मध्यम ते जोरदार पाऊस हजेरी लावत आहे. दिवसा ऊन आणि रात्री पाऊस अशी स्थिती शहरात निर्माण झाली. तर शुक्रवारी (ता. २१) शहर आणि परिसरात दुपारनंतर ढगाळ वातावरण निर्माण झाले. तसेच शहरासह उपनगरांच्या काही भागांत हलक्या-मध्यम सरींनी हजेरी लावली. तर शहरात कमाल तापमानातही सरासरीपेक्षा २ अंशांनी घट झाली होती. हवामानशास्त्र विभागाने दिलेल्या माहितीनुसार, शनिवारी (ता. २२) पुणे व परिसरात पावसाच्या हलक्या सरींची शक्यता आहे. त्यानंतर मात्र हवामान कोरडे राहणार आहे.

राज्यात परतीच्या पावसाच्या सरी कायम असून, मध्य महाराष्ट्रातील काही भागांत पावसाच्या जोरदार सरी पडत आहेत. दरम्यान शनिवारी (ता. २२) कोकण, मध्य महाराष्ट्रासह मराठवाड्यात तुरळक ठिकाणी विजांच्या कडकडाटासह पावसाचा अंदाज कायम आहे. सध्या बंगालच्या उपसागरात उत्तर अंदमान समुद्रालगत कमी दाबाच्या क्षेत्राची निर्मिती झाली असून, या प्रणालीपासून ७.६ किलोमीटर उंचीवर चक्राकार वाऱ्यांची स्थिती आहे. तर शनिवारी (ता. २२) या प्रणालीची तीव्रता वाढण्याची शक्यता असून, येत्या सोमवारपर्यंत (ता. २४) बंगालच्या उपसागरात चक्रीवादळाची निर्मिती होऊ शकते. ही प्रणाली मंगळवारी (ता. २५) पश्चिम बंगाल, बांगलादेशच्या किनाऱ्याकडे जाण्याची चिन्हे आहेत.

दरम्यान, अंदमानमधील कमी दाबाच्या क्षेत्रापासून तमिळनाडू, केरळ ते आग्नेय अरबी समुद्रापर्यंत हवेचा कमी दाबाचा पट्टा आहे. आग्नेय अरबी समुद्रात केरळच्या किनाऱ्यालगत चक्राकार वारे आहेत. त्याचबरोबर पंजाब व लगतच्या परिसरावरही चक्राकार वाऱ्यांची स्थिती सक्रिय आहे. तर राज्यात धुमाकूळ घातलेला पाऊस विश्रांती घेऊ शकतो. रविवारपासून (ता. २३) राज्यातील बहुतांश भागांत पाऊस उघडीप देऊ शकतो. तर, शनिवारी रत्नागिरी, सिंधुदुर्ग, नगर, पुणे, सातारा, कोल्हापूर, औरंगाबाद, बीड जिल्ह्यांत विजांचा कडकडाट, मेघगर्जनेसह पावसाचा अंदाज आहे, असे हवामानशास्त्र विभागाने म्हटले आहे.

पुढील दोन दिवसांत मॉन्सून देशातून परतण्याची शक्यता
नैर्ऋत्य मोसमी वाऱ्यांचा (मॉन्सून) परतीचा प्रवास सुरू असून, शुक्रवारी (ता. २१) मॉन्सून संपूर्ण छत्तीसगड, ओडिशा, विदर्भाच्या बहुतांश भागांसह आंध्रप्रदेशच्या काही भागांतून परतला आहे. मॉन्सून देशाच्या बहुतांश भागांतून बाहेर पडला असून, पुढील दोन दिवसांत पुणे, मुंबईसह संपूर्ण देशातून बाहेर पडेल. यंदा मॉन्सूनने २० सप्टेंबर रोजी वायव्य भारतातून परतीच्या प्रवासाला सुरुवात केली होती. अत्यंत हळूहळू सुरू असलेल्या परतीचा प्रवास आता शेवटच्या टप्प्यात पोचला आहे. शुक्रवारी मॉन्सून विदर्भाच्या बहुतांश भागातून परतला आहे. दरम्यान हवामान पोषक असल्याने पुढील ४८ तासांमध्ये मॉन्सून महाराष्ट्रासह संपूर्ण देशातून बाहेर पडेल, असे हवामानशास्त्र विभागाने स्पष्ट केले.