शिवाजीनगर परिसरात मध्यरात्रीपर्यंत कोंडी | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

शिवाजीनगर परिसरात मध्यरात्रीपर्यंत कोंडी
शिवाजीनगर परिसरात मध्यरात्रीपर्यंत कोंडी

शिवाजीनगर परिसरात मध्यरात्रीपर्यंत कोंडी

sakal_logo
By

पुणे, ता. २१ ः दिवाळीनिमित्त बाहेरगावी जाणाऱ्या प्रवाशांची गर्दी वाढल्याने, तसेच बाहेरून येणाऱ्या अतिरिक्त बसगाड्यांमुळे शिवाजीनगर एसटी बसस्थानकाबाहेर (वाकडेवाडी) शुक्रवारी सायंकाळी सात वाजल्यापासून झालेली वाहतूक कोंडी रात्री १२ वाजल्यापर्यंत कायम होती. याचा इतर वाहनचालकांना कमालीचा मनस्ताप सहन करावा लागला. काही वाहनचालक तर अक्षरशः गाडी रस्त्याकडेला लावून पायी घरी चालत गेले.

शहरातील वाहतूक कोंडीचा प्रश्न दिवसेंदिवस गंभीर होत चालला आहे. त्यात सणासुदीच्या काळात तर आणखीनच भर पाहायला मिळते आहे. दिवाळीनिमित्त बाहेरगावी जाणाऱ्या प्रवाशांची संख्या शुक्रवारपासून लक्षणीय वाढली आहे. शिवाजीनगर एसटी बसस्थानक परिसरात सायंकाळपासून मध्यरात्रीपर्यंत वाहतूक कोंडी झाली होती. बसस्थानक गाड्यांनी फुल्ल झाल्याने बाहेरून येणाऱ्या गाड्या या रस्त्यामध्ये थांबूनच भरल्या जात होत्या. तसेच, खासगी प्रवासी वाहतूक करणाऱ्या ट्रॅव्हल्सही रस्त्यालगत उभ्या असल्याने कोंडीत जास्त भर पडत होती. वाहतूक नियमनासाठी आलेले पोलिसही कोंडी सोडविताना हतबल झाले होते.

वाहनचालक बिपिनचंद्र चौगुले म्हणाले, ‘‘मुंबई-पुणे महामार्गावर खडकीपर्यंत आणि अंतर्गत रस्त्यांवर वाहतूक कोंडी होती. कोंडीतून बाहेर पडणे अशक्य झाल्याने वैतागून कार खडकीत रस्त्याच्याकडेला लावून शिवाजीनगरपर्यंत पायी चालत आलो.’’