खरेदीसाठी बाजारपेठेतील गर्दी कायम | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

खरेदीसाठी बाजारपेठेतील गर्दी कायम
खरेदीसाठी बाजारपेठेतील गर्दी कायम

खरेदीसाठी बाजारपेठेतील गर्दी कायम

sakal_logo
By

पुणे, ता. २२ : दिवाळी सणाच्या खरेदीसाठी शनिवारी देखील विविध बाजारपेठांमध्ये मोठ्या प्रमाणात गर्दी झाली होती. त्यामुळे शहराच्या मध्यभागात वाहतूक कोंडी झाली.
खरेदीसाठी बाहेर पडलेल्यांमध्ये लक्ष्मीपूजन, भाऊबीजेसाठी आवश्‍यक असलेल्या वस्तुंची आणि कपडे घेणाऱ्यांची संख्या मोठ्या प्रमाणात होती. चौथा शनिवार असल्याने अनेकांची सुटी आणि सोमवारी असलेले लक्ष्मीपूजन यामुळे नागरिकांचा विविध वस्तूंच्या खरेदीबाबत असलेला उत्साह बाजारपेठेत पाहायला मिळाला. खरेदीसाठी बाहेर पडलेल्या नागरिकांमुळे गर्दी झाल्याने छत्रपती शिवाजी महाराज रस्ता, बाजीराव रस्ता, टिळक रस्ता, प्रभात रस्ता, कुमठेकर रस्ता, केळकर रस्ता, लक्ष्मी रस्ता, नदीकाठ रस्ता, महात्मा फुले मंडई परिसर, डेक्कन परिसर, जंगली महाराज रस्ता, गणेशखिंड रस्ता अशा वेगवेगळ्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी झाली होती.

कापड मार्केटमध्येही गर्दी

दिवाळीच्या निमित्ताने कापड व रेडिमेड विक्रेत्यांनी मोठ्या सवलती दिल्या आहेत. जवळपास २० ते ३० टक्के सूट जाहीर केल्यामुळे लोकही बंपर खरेदी करीत आहेत. रविवार पेठ, लक्ष्मी रस्ता, कुमठेकर रस्ता येथील साड्यांच्या दुकानांत महिलांनी मोठी गर्दी केली होती. त्यासह रस्त्यांवर स्टॉल लावून विक्री सुरू असलेल्या वस्तूंना देखील मोठी मागणी आहे.