उद्धव ठाकरे यांचे राजकारण मातोश्रीपुरते मर्यादित ः राणे | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

उद्धव ठाकरे यांचे राजकारण मातोश्रीपुरते मर्यादित ः राणे
उद्धव ठाकरे यांचे राजकारण मातोश्रीपुरते मर्यादित ः राणे

उद्धव ठाकरे यांचे राजकारण मातोश्रीपुरते मर्यादित ः राणे

sakal_logo
By

पुणे, ता. २२ : उद्धव ठाकरे यांचे राजकारण आता केवळ मातोश्रीपुरते मर्यादित राहिले आहे. शिवसेना आता राहिलेली नाही. त्यांच्याकडे केवळ सहा ते सात आमदार असून, त्यापैकी चार जण आमच्या संपर्कात आहेत आणि ते कधीही आमच्याकडे येतील, असा दावा केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी केला.

‘यशदा’ येथे शनिवारी आयोजित कार्यक्रमात राणे यांच्या हस्ते काही तरुण-तरुणींना नोकरीची नियुक्ती पत्रे देण्यात आली. या कार्यक्रमानंतर ते पत्रकारांशी बोलत होते. महाराष्ट्रातील राजकारणाचा स्तर खालावत चालला आहे, अशी टीका शिवसेना नेते आदित्य ठाकरे यांच्यासह महाविकास आघाडीतील नेत्यांकडून करण्यात येत आहे. या संदर्भात राणे म्हणाले, ‘‘महाराष्ट्राच्या राजकारणातील स्तर खालावलेला नाही. विरोधकांच्या वैचारिक पातळी तपासण्याची गरज आहे. राजकारणातील स्तर घसरू नये, असे मला वाटते. शिवसेनेचे आमदार भास्कर जाधव यांनी त्यांच्या घरावर झालेल्या हल्ल्यामागे राज्य सरकारचा अप्रत्यक्ष हात असल्याचा आरोप केला होता. त्यावर ‘‘याबाबत प्रसारमाध्यमांना जास्त माहिती आहे. मला कोकणात राहून काही माहिती नाही. जाधव यांनी भाषणामध्ये केलेली टिंगल, मस्करी हा काही चांगला गुण नाही,’’ असे त्यांनी नमूद केले.

आमदार नीतेश राणे आणि माजी खासदार नीलेश राणे यांच्याकडूनही तिखट भाषेत आरोप केले जातात. या प्रश्नावर ‘‘माझ्या मुलांनी प्रत्युत्तर दिलेलेच तुम्हाला दिसते, इतर लोक काय बोलतात, हे दिसत नाही. विकासाबाबत बोला. अशा प्रश्नाचे उत्तर द्यायला मी येथे आलेलो नाही,’’ असे सांगत राणे यांनी नाराजी व्यक्त केली. राज्य सरकारकडून शिधापत्रिकाधारकांना देण्यात येणाऱ्या दिवाळीच्या किटवरती सत्ताधारी राजकीय नेत्यांचे फोटो आहेत. याबाबत राणे म्हणाले, ‘‘फोटो दिला तर बिघडले कोठे ? त्याच्यावर कागद टाका आणि पाकीट फोडा. विरोधकांची इच्छा असेल तर त्यांनीही त्यांचे फोटो लावून नागरिकांना कीट द्यावेत. परंतु संकुचित वृत्ती ठेवू नये.’’

तरुणांच्या जीवनात आनंद

पंतप्रधान नरेंद्र मोदी हे देशातील तरुण-तरुणींना नोकऱ्या उपलब्ध व्हाव्यात, यासाठी आठ वर्षांपासून प्रयत्न करीत आहेत. या देशात दहा लाख तरुण-तरुणींना नोकऱ्या उपलब्ध करून द्यावयाच्या आहेत. पहिल्या टप्प्यात आज देशभरात ७५ हजारांहून अधिक तरुण-तरुणींना नोकरी उपलब्ध करून दिली आहे. त्यामुळे दिवाळीच्या उत्सवात तरुण-तरुणींच्या जीवनात आनंद निर्माण करण्याचे काम मोदी यांनी केले आहे, असे त्यांनी नमूद केले.