रिंगरोडच्या मार्गातला अडथळा दूर | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

रिंगरोडच्या मार्गातला अडथळा दूर
रिंगरोडच्या मार्गातला अडथळा दूर

रिंगरोडच्या मार्गातला अडथळा दूर

sakal_logo
By

सकाळ वृत्तसेवा
पुणे, ता. २३ : पुणे आणि पिंपरी-चिंचवड शहरातील वाहतुकीची कोंडी फोडण्यासाठी हाती घेण्यात आलेला रिंगरोड मार्गी लागण्याच्या दृष्टीने आणखी एक महत्त्वपूर्ण पाऊल पुढे पडले आहेत. या रस्त्याच्या भूसंपादनासाठी लागणारे अकरा हजार कोटी रुपयांचे कर्ज देण्यास हुडकोने तत्त्वतः मान्यता दिली आहे. त्यामुळे भूसंपादनासाठी असलेली आर्थिक अडचण दूर होण्यास मदत होणार आहे.
केंद्र सरकारच्या पर्यावरण मंत्रालयाने महाराष्ट्र राज्य रस्ते विकास मंडळाच्या (एमएसडीसी) पश्‍चिम भागातील रिंगरोडच्या मार्गास मध्यंतरी हिरवा कंदील दाखविल्याने या रस्त्याच्या मार्गातील सर्व अडथळे दूर झाले आहेत. त्यातच राज्य सरकारने या रस्त्याच्या भूसंपादनासाठी दीड हजार कोटी रुपये जाहीर केले आहेत. आतापर्यंत केवळ ३५ कोटी रुपये भूसंपादनासाठी प्राप्त झाले आहे. त्यातून उर्से गावात भूसंपादनाची प्रक्रिया सुरू झाली आहे. प्रत्यक्षात पश्‍चिम भागातील रिंगरोडच्या भूसंपादनासाठी किमान चार ते साडेचार हजार कोटी रुपये लागणार आहे. त्यानंतर बांधणीसाठी किमान सात हजाराहून कोटी रुपयांहून अधिक निधी लागणार आहे.
यापूर्वी ‘ईपीसी’ तत्त्वावर या रस्त्याची उभारणी करण्याचा विचार होता. या पद्धतीमध्ये भूसंपादन करून रस्ता बांधणीचे काम निविदा काढून दिल्यानंतर संबंधित ठेकेदार कंपनीला टप्प्याटप्प्याने सरकार पैसे उपलब्ध करून देणार होते. परंतु रस्त्याचे काम खर्चिक असल्याने एवढा निधी उभा करणे सरकारला शक्य नाही, त्यामुळे हे काम बीओटी तत्त्वावर देता येईल, याची तपासणी करून अहवाल सादर करण्याच्या सूचना एमएसआरडीसीला दिल्या होत्या. त्यानुसार एमएसआरडीसीने या संदर्भातील अहवाल तयार करून राज्य सरकारकडे पाठविला होता; मात्र त्यावर अद्याप कोणताही निर्णय झाला नाही. एकीकडे ही प्रक्रिया सुरू असताना दुसरीकडे एमएसआरडीसीने या प्रकल्पासाठी कर्ज उभारण्याबाबतच्या पर्यायावर देखील काम सुरू होते. त्यात एमएसआरडीसीला यश आले आहे. या रस्त्याच्या भूसंपादनासाठी कर्ज देण्यास हुडकोने तत्त्वतः मान्यता दिल्याचे एमएसआरडीएच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सांगितले.

कोंडी फोडण्यास मदत
पुणे व पिंपरी-चिंचवड शहरातील वाहतूक कोंडी कमी करण्यासाठी या रिंगरोडचे काम एमएसआरडीसीने हाती घेतले आहे. पूर्व व पश्‍चिम असे रस्त्याचे दोन टप्पे आहेत. पश्‍चिम रिंगरोडला केळवडेपासून (ता. भोर) सुरुवात होणार असून हवेली, मुळशी आणि मावळ येथील उर्से टोलनाका येथे एकत्र येणार आहे. रिंगरोड हा ३७ गावांमधून जाणार आहे.

दृष्टीक्षेपात प्रकल्प
- पूर्व आणि पश्‍चिम अशा दोन भागात रिंगरोड होणार
- एकूण रिंगरोडची लांबी १७३ किलोमीटर
- रिंगरोड बांधकामासाठी अपेक्षित खर्च १७ हजार ७२३ कोटी
- बीओटी तत्त्वावर राबविल्यास अपेक्षित प्रकल्पाची किंमत -२६ हजार ८१८.८४ कोटी
- एकूण भूसंपादनाचा खर्च सुमारे ११ हजार कोटी
- पश्‍चिम भागातील भोर, हवेली, मुळशी, मावळ या चार तालुक्‍यातील रिंगरोड गावातून जाणार
- ६९५ हेक्‍टर जमिनीचे भूसंपादन (पश्‍चिम भाग)
- पश्‍चिम रिंगरोड भूसंपादन अंदाजे पाच हजार कोटी
- रस्ता बांधणीसाठी अंदाजे खर्च ७ हजार कोटी