‘जय जय महाराष्ट्र माझा’ गीताचे सादरीकरण | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

‘जय जय महाराष्ट्र माझा’ गीताचे सादरीकरण
‘जय जय महाराष्ट्र माझा’ गीताचे सादरीकरण

‘जय जय महाराष्ट्र माझा’ गीताचे सादरीकरण

sakal_logo
By

‘जय जय महाराष्ट्र माझा’
गीताचे सादरीकरण
पुणे, ता. २३ ः ‘जय जय महाराष्ट्र माझा, गर्जा महाराष्ट्र माझा’ या महाराष्ट्राची महती सांगणाऱ्या गीताला राज्यगीताचा दर्जा देणार असल्याच्या सरकारच्या निर्णयाचे स्वागत करण्यासाठी शाहीर हिंगे लोककला प्रबोधिनीचे आचार्य शाहीर हेमंतराजे मावळे यांनी या गीताचे नुकतेच सादरीकरण केले. या वेळी पुणेकरांना साखर वाटून आनंद व्यक्त करण्यात आला. फर्ग्युसन रस्त्यावरील कलाकार कट्टा येथे कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या वेळी शाहीर हिंगे लोककला प्रबोधिनीचे सचिव अरूण कुमार बाभुळगावकर, प्रा. संगीता मावळे उपस्थित होते. होनराज मावळे यांनी संगीत संयोजन केले. सक्षम जाधव यांनी ढोलकी तर होनराज मावळे यांनी संवादिनीवर साथसंगत केली. शाहीर मावळे म्हणाले, ‘‘शाहीर साबळे यांनी गायलेल्या या गीताला राज्यगीताचा दर्जा मिळणार आहे. शाहीर साबळे यांचे हे जन्मशताब्दी वर्ष असल्याने सरकारच्या या निर्णयाचा सर्व शाहिरांना अभिमान आहे.’’

‘साखळीपीर’तर्फे वंचितांसह दिवाळी
पुणे, ता. २३ ः साखळीपीर तालिम राष्ट्रीय मारूती मंदिर, जय आनंद ग्रुप संचालित ऋषीआनंदवन व लायन्स क्लब ऑफ पुणे सेंट्रल यांच्यातर्फे वंचित-संचितांची दिवाळी साजरी करण्यात आली. जैन साध्वी इंद्रकवरजी महाराज साहब यांच्या जयंतीनिमित्त ‘समाजधनपुजन’ करण्यात आले. या वेळी १०० गरजू परिवारांना दिवाळीनिमित्त फराळ वाटप करण्यात आले. तसेच, वर्षभर कार्यरत असणाऱ्या पोलिस कर्मचारी, फायर ब्रिगेड जवान, पालिका सफाई कर्मचारी यांचे औक्षण करून त्यांचा सन्मान करण्यात आला. याप्रसंगी रविंद्र माळवदकर, विजयकुमार मर्लेचा, भाई कात्रे, शिवानी माळवदकर, जयप्रकाश सोनी, शांतीलाल नवलाखा, ईश्वर बोरा, संजय कटारिया, संतोष कर्नावट, प्रवीण तालेडा, विजय धोका, रमेश लाहोटी आदी उपस्थित होते.

स्वर सुरांची आनंदयात्रेत रसिक मंत्रमुग्ध
पुणे, ता. २३ ः ज्येष्ठ गायक सुरेश वाडकर आणि गायिका अनुराधा पौडवाल यांच्या सुरेल गायनाने रसिकांना आज भक्ती आणि प्रेमरसाची अनुभूती आली. निमित्त होते, महावीर एंटरप्रायजेस आयोजित स्वर सुरांची आनंदयात्रा या कार्यक्रमाचे. या वेळी वाडकर आणि पौडवाल यांनी ‘ओमकार स्वरूपा’, ‘देवाचिये द्वारी’, ‘काळ देहासी आला’, ‘श्रीमद्‌‍ नारायण नारायण’, ‘ओम जय जगदीश हरे’, ‘स्वामी समर्थ माझे आई’ आदी भक्तीरचना सादर केल्या. तसेच, ‘लगी आज सावनी की’, ‘मेघा रे मेघा रे’, ‘ए जिंदगी गले लगा ले’, ‘एक प्यार का नगमा है’, ‘काळ्या मातीत मातीत तिफण चालते’ आदी हिंदी-मराठी चित्रपट गीते सादर केली. गायक-संगीतकार चंद्रशेखर महामुनी, सचिन इंगळे यांनी संयोजन केले. सूत्रसंचालन स्नेहल दामले, योगेश सुपेकर यांनी केले.

‘मन करा रे प्रसन्न’चे आज आयोजन
पुणे, ता. २३ ः आनंदवन बहुउद्देशीय संस्था आणि एनजीओ आघाडी यांच्यातर्फे दिवाळीनिमित्त डॉ. संजय उपाध्ये यांच्या ‘मन करा रे प्रसन्न’ या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. घोले रस्त्यावरील जवाहरलाल नेहरू सांस्कृतिक भवन येथे सोमवारी (ता. २४) सकाळी ८ वाजता हा कार्यक्रम होईल. आयुष्य कसे जगावे, असे सांगणारे ज्ञान, आध्यात्म, मनोरंजन आणि प्रबोधन यांचा अपूर्व संगम असणारा हा कार्यक्रम आहे. कार्यक्रम विनामूल्य असल्याची माहिती आनंदवन बहुउद्देशीय संस्थेचे अध्यक्ष डॉ. अजय दुधाणे यांनी दिली.