Pune : विराटच्या षटकाराने पुण्यात जल्लोष | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

pune
विराटच्या षटकाराने पुण्यात जल्लोष भारत-पाकिस्तान क्रिकेट सामन्यानंतर शहरात जागोजागी विजयोत्सव

Pune : विराटच्या षटकाराने पुण्यात जल्लोष

पुणे : संध्याकाळची पाच वाजून २६ मिनिटांची वेळ, ऑस्ट्रेलियातील मेलबॉर्नच्या मैदानावर विराट कोहलीने षटकार ठोकून, अवघे काही मिनिटे झाले असावेत. शेवटच्या चेंडूवर भारतानं पाकिस्तानविरुद्ध विजय मिळवला, अन् शहरातील महत्त्वाच्या रस्त्यांवर विजयाचे फटाके फोडत तरुणाईने आनंदोत्सव साजरा केला.

बाजीराव रस्ता, कुमठेकर रस्ता, नामदार गोपाळ कृष्ण गोखले रस्ता (फर्ग्युसन रस्ता) आणि जंगली महाराज रस्त्यावर गाणी वाजवत क्रिकेट प्रेमींनी विजयोत्सव साजरा केला. शनिवारवाड्याजवळ एकापाठोपाठ एक मोटारसायकली रस्त्यावर येऊ लागल्या अन् बघता बघता तिरंगी झेंडे घेऊन, बाईक रॅली निघाली. या रॅलीने कलाकार कट्ट्यावर एकत्र जमत विजयाचे फटाके तर फोडलेच, त्याचबरोबर गाडीचा हॉर्न, शिट्या आणि जयघोष करत आपला आनंद साजरा केला.

रविवारी दुपारपासूनच भारत-पाकिस्तान क्रिकेट सामन्याने प्रेक्षकांसह जणू संपूर्ण शहरावरच भुरळ घातली होती. दिवसभर शांत असलेल्या रस्त्यांवर संध्याकाळी विजयाचे फटाके फोडण्यात आले तर काही ठिकाणी मंडळांनी गाणी वाजवत आनंदोत्सव साजरा केला.
पाकिस्तानविरुद्धच्या रोमहर्षक क्रिकेट सामन्यातील विजयानंतर भारतीयांची दिवाळी अधिकच गोड झाली. रविवारच्या भाकड दिवशी जणू आनंदाचा पाडवाच साजरा करण्यात आला. विराट कोहलीने ‘नो बॉल’ ला मारलेल्या षटकाराची चर्चा शहरातील चौकाचौकात पाहायला मिळाली. फटाक्यांच्या आतषबाजीबरोबरच गाण्यावर ठेका धरलेल्या तरुणाईने आजच दिवाळी साजरी केली. मुख्य शहरासह उपनगरातही काही ठिकाणी एकत्र जमत तरुणाईने ‘टीम इंडिया’च्या विजयाचा जयघोष केला.

नो बॉल ट्रेंडींगमध्ये...

ट्वीटरसह विविध समाजमाध्यमांवर क्रिकेट सामन्यानंतर नो बॉल ट्रेंडींगमध्ये आला. विराट कोहलीने ‘नो बॉल’वर मारलेल्या षटकाराची स्तुती आणि पाकिस्तान संबंधीचे मीम्सही पाहायला मिळाले. विराटच्या षटकाराने भारतवासियांना दिवाळीची सर्वोत्तम भेट मिळाल्याचे चाहत्यांनी ट्वीट केले आहे. ‘काय मॅच, काय विराट, काय विजय, एकदम ओक्के मंदी’, ‘भारताची विराट खेळी,’ अशा संदेशांचा समाजमाध्यमांवर जोरदार पाऊस पडला.