पुणे विभागातील रक्तपेढ्यांवर कारवाई | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

पुणे विभागातील रक्तपेढ्यांवर कारवाई
पुणे विभागातील रक्तपेढ्यांवर कारवाई

पुणे विभागातील रक्तपेढ्यांवर कारवाई

sakal_logo
By

पुणे, ता. २४ : पुणे विभागातील तीन रक्तपेढ्यांचा परवाना गेल्या सहा महिन्यांमध्ये रद्द करण्यात आला. तसेच वेगवेगळ्या १३ रक्तपेढ्यांना ‘कारणे दाखवा’ नोटीस बजावण्यात आल्याची माहिती ‘अन्न व औषध प्रशासन’तर्फे (एफडीए) देण्यात आली. प्रत्येक गरजू रुग्णाला सुरक्षित रक्त मिळणे हा त्याचा अधिकार आहे. रक्तपेढीतील रक्ताची गुणवत्ता नियंत्रित ठेवण्यासाठी दर सहा महिन्यांनी रक्तपेढ्यांची तपासणी केली जाते. या अंतर्गत विभागातील पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूर आणि सोलापूर या जिल्ह्यातील १०३ रक्तेपढ्यांची तपासणी करण्यात आली.

पुणे विभागाचे सहआयुक्त (औषध) एस. बी. पाटील या बाबत माहिती देताना म्हणाले, “विभागातील १०३ रक्तपेढ्यांची तपासणी करण्यात आली. त्यापैकी तीन रक्तपेढ्यांचे परवाने रद्द करण्याचे आदेश दिले आहेत. वेगवेगळ्या १३ रक्तपेढ्यांना ‘कारणे दाखवा’ नोटीस बजावण्यात आली आहे. तसेच, दहा रक्तपेढ्यांचे निलंबन करण्यात आले.” रक्तपेढ्यांमध्ये मान्यताप्रमाणे कर्मचारी नसणे, समक्ष आणि तांत्रिक अधिकारी नसणे आणि रक्तपेढ्यातील नोंदणी व्यवस्थित न ठेवणे ही या कारवाईमागाची प्रमुख कारणे आहेत. तसेच रक्त वाहतुकीसाठी आवश्यक कागदपत्रांची पडताळणी महत्त्वाची असते. याची पूर्तता केली नसल्याने काही रक्तपेढ्यांवर कारवाई करण्यात आल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. नोंदी व्यवस्थित न ठेवणे, हा पुणे विभागातील काही रक्तपेढ्यांमधील मोठा दोष दिसून आला आहे. विशेषतः रक्तदान शिबिरांमधून होणाऱ्या रक्त संकलनात हा दोष आढळतो. तसेच, रक्तदान शिबिरांमध्ये रक्त संक्रमण अधिकारी (बीटीओ) नसणे, हे एक रक्तपेढीवर कारवाई होण्यामागचे प्रमुख कारण असल्याचेही पाटील यांनी सांगितले.