प्रत्येक कुटुंबाचे बॅंक खाते आवश्यक | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

प्रत्येक कुटुंबाचे बॅंक खाते आवश्यक
प्रत्येक कुटुंबाचे बॅंक खाते आवश्यक

प्रत्येक कुटुंबाचे बॅंक खाते आवश्यक

sakal_logo
By

पुणे, ता. २८ : पुणे जिल्ह्याच्या ग्रामीण भागातील प्रत्येक कुटुंबाचे किमान एक बॅंक खाते असणे आवश्‍यक आहे. त्यामुळे जिल्ह्यातील अधिकाधिक नागरिकांचे बॅंकेत खाते उघडण्यासाठी प्रयत्न करावेत, अशी सूचना केंद्रीय अर्थ विभागातील सहसचिव (आर्थिक सेवा) पंकज शर्मा यांनी शुक्रवारी (ता. २८) जिल्हा आणि जिल्हा परिषद प्रशासनाला केली.

केंद्रीय अर्थ मंत्रालयाच्यावतीने पुणे जिल्ह्यात येत्या २६ नोव्हेंबरपर्यंत आर्थिक समावेशनातून सशक्तीकरण या प्रकल्पाची प्रायोगिक तत्त्वावर अंमलबजावणी करण्यात येत आहे. या प्रकल्पांतर्गत जिल्ह्यातील ग्रामपंचायतींमध्ये मेळाव्यांचे आयोजन करण्यात आले आहे. या प्रकल्पाच्या प्रगतीची माहिती घेण्यासाठी शर्मा यांनी शुक्रवारी आढावा बैठक घेतली. या बैठकीत बोलताना त्यांनी ही सूचना केली. या वेळी जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख, जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेच्या प्रकल्प संचालक शालिनी कडू-धोटे, महाराष्ट्र बँकेचे कार्यकारी संचालक ए. बी. विजयकुमार, महाराष्ट्र बँकेचे मुख्य व्यवस्थापक श्रीकांत कारेगावकर, जिल्हा उद्योग केंद्राचे महाव्यवस्थापक प्रकाश रेंदाळकर, जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी शिवाजी विधाटे, महाराष्ट्र बँकेचे महाव्यवस्थापक विजय कांबळे, राजेश सिंग आदी उपस्थित होते.

केंद्र सरकारने आर्थिक समावेशनातून सशक्तीकरण या प्रायोगिक प्रकल्पांतर्गत देशातील ७ जिल्ह्यांची निवड केली आहे. यामध्ये राज्यातील पुणे व औरंगाबाद या दोन जिल्ह्यांचा समावेश आहे. या प्रकल्पांतर्गत पुणे जिल्ह्यात १५ ऑक्टोबरपासून मेळाव्यांचे आयोजन करण्यात आले आहे. येत्या २६ नोव्हेंबरपर्यंत ही मोहीम राबविण्यात येणार आहे.

‘पुणे जिल्ह्याची कामगिरी उल्लेखनीय’
पुणे जिल्ह्याने गेल्या वर्षभरात किसान क्रेडिट कार्ड वितरण, महिला बचत गटांना कर्जवाटप, मुद्रा योजनेंतर्गत बेरोजगारांना कर्जवाटपात उल्लेखनीय कामगिरी केली आहे. यामुळे पुणे जिल्ह्यात केंद्र सरकारच्या सामाजिक सुरक्षा योजनांतर्गत विमा योजनांचे उद्दिष्ट साध्य करण्याची मोठी क्षमता आहे. जिल्ह्याच्या या क्षमतांचा बँकांनी योग्य उपयोग करावा. यासाठी जिल्हा प्रशासन बॅंकांना पूर्ण सहकार्य करेल, असे जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांनी बैठकीत बोलताना सांगितले.

पुणे जिल्ह्यात बांधकाम क्षेत्राबरोबरच अन्य क्षेत्रांमध्ये मोठ्या प्रमाणात स्थलांतरित कामगार काम करत आहेत. या सर्व कामगारांना विमा योजनेत आणणे गरजेचे आहे. बँकांनी या घटकांवर विशेष लक्ष केंद्रित केल्यास मोठे लक्ष्य साध्य होऊ शकेल. शिवाय आर्थिक समावेशनातून सशक्तीकरण प्रकल्पाच्या अंमलबजावणीसाठी त्याचा फायदा होऊ शकेल.
- ए. बी. विजयकुमार, कार्यकारी संचालक, बॅंक ऑफ महाराष्ट्र