अपहृत मुलीचा गळा दाबून खून पोलिसांनी काही तासांतच उघड केला बनाव | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

अपहृत मुलीचा गळा दाबून खून
पोलिसांनी काही तासांतच उघड केला बनाव
अपहृत मुलीचा गळा दाबून खून पोलिसांनी काही तासांतच उघड केला बनाव

अपहृत मुलीचा गळा दाबून खून पोलिसांनी काही तासांतच उघड केला बनाव

sakal_logo
By

पुणे, ता. २८ : अपहरण करून नेलेल्या अल्पवयीन मुलीचा सरार्इत आरोपीने राहत्या घरात ओढणीने गळा आवळून खून केल्याचा प्रकार समोर आला आहे. या प्रकरणी आरोपीला विमानतळ पोलिसांनी अटक केली. संबंधित मुलगी ही माझी पत्नी असून, तिने आत्महत्या केल्याची माहिती आरोपीने पोलिसांना दिली होती. मात्र तिचा गळा आवळून खून केल्याचे शवविच्छेदन अहवालातून निष्पन्न झाले आहे.

चेतन ऊर्फ आकाश सोमनाथ मिसाळ (वय २३, रा. लोहगाव) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. खून झालेल्या १७ वर्षीय मुलीच्या आईने याबाबत विमानतळ पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. २६ ऑक्टोबरला हा गुन्हा घडला होता. दिवाळीनिमित्त मुलीला तिच्या घरी जायचे होते. मात्र त्यावरून त्यांच्यात वाद झाले. त्यातून चेतनने मुलीचा खून केल्याची प्राथमिक माहिती पोलिसांनी दिली. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, घटनेच्या दिवशी चेतनने मुलीला ससून रुग्णालयात दाखल केले होते. संबंधित मुलगी माझी पत्नी असून, तिने आत्महत्या केली आहे, असे त्याने रुग्णालयात सांगितले व तो घरी निघून गेला.

मुलगी अल्पवयीन असल्याने व तिच्या गळ्याभोवती व्रण असल्याने डॉक्टरांना संशय आला. त्यानंतर मुलीचा गळा आवळून खून केल्याचे शवविच्छेदन केल्यानंतर निष्पन्न झाले. तिच्या शरीरावर मारहाणीच्या खुणा आढळून आल्या होत्या. त्यामुळे पोलिसांनी त्वरित मुलीच्या आईचा शोध घेऊन तिला या घटनेची माहिती दिली. घटनेच्या काही तासांतच पोलिसांनी गुन्हा उघडकीस आणला.

मुलगी १३ वर्षीची असताना केले होते अपहरण
मुलगी १३ वर्षाची असताना चेतनने तिचे अपहरण केले होते. याबाबत त्यावर विश्रांतवाडी पोलिस ठाण्यात अपहरणाचा गुन्हा दाखल आहे. या गुन्ह्यात अटक झाल्यानंतर त्याने जामीन मिळवला होता. मुलीला येरवडा येथील बालग्राम आश्रमात ठेवण्यात आले होते. मुलीला बालग्राममधून शिक्षणासाठी पाठविण्यात येत असताना डिसेंबर २०१९ मध्ये चेतनने तिचे पुन्हा अपहरण केले. या संदर्भात येरवडा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. अपहरण कालावधीत त्याने मुलीवर लैंगिक अत्याचार केले. तिने वर्षापूर्वी एका मुलाला जन्मदेखील दिला आहे.