मुंबई महापालिकेच्या धर्तीवर पुण्यात उपाययोजनांची गरज | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

मुंबई महापालिकेच्या धर्तीवर 
पुण्यात उपाययोजनांची गरज
मुंबई महापालिकेच्या धर्तीवर पुण्यात उपाययोजनांची गरज

मुंबई महापालिकेच्या धर्तीवर पुण्यात उपाययोजनांची गरज

sakal_logo
By

पुणे, ता. २८ ः ‘पावसाचे पाणी तुंबू नयेत, यासाठी मुंबई महापालिकेने अनेक उपाययोजना केल्या आहेत. त्या धर्तीवर पुण्यातही महापालिकेने अशा उपाययोजना कराव्यात,’ अशी सूचना शिवसेना-उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे नेते आणि माजी पर्यावरण मंत्री आदित्या ठाकरे यांनी महापालिका आयुक्त विक्रमकुमार यांना शुक्रवारी केली.
पुणे दौऱ्य दरम्यान ठाकरे यांनी महापालिका आयुक्त विक्रमकुमार यांची महापालिकेत भेट घेतली. त्यावेळी पुणे महापालिकेला पर्यावरण क्षेत्रात केलेल्या उल्लेखनीय कामाबद्दल आंतरराष्ट्रीय स्तरावरचा ‘सी-४०’ पुरस्कार मिळाल्याबद्दल त्यांनी आयुक्तांचे अभिनंदन केले. यावेळी आयुक्तांबरोबर झालेल्या बैठकीत शहरातील पर्यावरण, ई-बस, सार्वजनिक वाहतुक व्यवस्था, पावसाळी पाण्याचे नियोजन, ई-बाईक, रस्ते, फूटपाथ, सायकल ट्रॅक या प्रश्नांबाबत चर्चा केली व शहराच्या विकासासाठी काही सूचना केल्या.
पत्रकारांशी बोलताना ठाकरे म्हणाले, ‘‘पावसाचे पाणी मुंबईत ज्या ठिकाणी तुंबते त्या ठिकाणी भूमिगत टॅक बांधले आहेत. त्यात पाणी सहा-सात तास साठविता येते. नंतर त्या पाण्याचा निचरा होता. पुण्यातही अशा धर्तीवर उपाययोजना करणे शक्य आहे. तसेच पावसाळी नाले सफाई योग्य पद्धतीने झाल्यास पुराचा धोका टाळता येईल.’’ पुण्यातील वाहतूक कोंडी सोडविण्यासाठी ई-मिनीबसचा वापर वाढविणे गरजेचे आहे. तसेच पदपथ रुंद करून ते पादचाऱ्यांसाठी खुले केले पाहिजे. तसेच सायकल ट्रॅक सलग हवेत. त्यावरील अतिक्रमणे दूर करण्याच्याही सूचना त्यांनी आयुक्तांना केल्या. नदीसुधार प्रकल्प, माझी वसुंधरा अभियान सुरू ठेवल्याबद्दल त्यांनी महापालिकेचे अभिनंदन केले. आयुक्त विक्रमकुमार यांनी ठाकरे यांच्या सूचनांचा स्वीकार केला असल्याचे सांगितले.
या वेळेस पक्षाचे पुणे शहर व जिल्ह्याचे संपर्कप्रमुख आमदार सचिन अहिर, माजी आमदार चंद्रकांत मोकाटे, महापालिकेतील माजी गटनेते पृथ्वीराज सुतार, शहरप्रमुख संजय मोरे, गजानन थरकुडे, उपशहर प्रमुख आनंद गोयल उपस्थित होते.