Savitribai Phule Pune University Election : व्यवस्थापन परिषदेची निवडणूक जाहीर | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Savitribai Phule Pune University
व्यवस्थापन परिषदेची निवडणूक जाहीर

Savitribai Phule Pune University Election : व्यवस्थापन परिषदेची निवडणूक जाहीर

पुणे : दोन महिन्यांच्या प्रतीक्षेनंतर अखेर सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या अधिसभा निवडणुकांचे पडघम वाजले असून, विद्यापीठाशी संलग्न महाविद्यालये आणि शैक्षणिक संस्थांतील व्यवस्थापन परिषदेच्या सहा सदस्यांची निवडणूक सूचना जाहीर करण्यात आली आहे. २७ नोव्हेंबरला मतदान तर मतमोजणी २९ नोव्हेंबरला करण्यात येणार आहे.

विद्यापीठाच्या अधिसभा (सिनेट) सदस्यांचा कार्यकाळ ऑगस्ट २०२२ मध्ये पूर्ण झाला होता. त्यानंतर अधिसभेच्या निवडणुका या ओबीसी आरक्षणासह घ्यायच्या की आरक्षणाशिवाय याविषयी विद्यापीठामध्ये संभ्रमाचे वातावरण होते. दोन महिन्यांच्या प्रतीक्षेनंतर आता निवडणूक जाहीर झाली आहे. पुणे, अहमदनगर आणि नाशिक अशा तीन जिल्ह्यांचे कार्यक्षेत्र असलेल्या विद्यापीठात पदवीधर, व्यवस्थापन प्रतिनिधी यासह प्राध्यापक, प्राचार्य गटातील प्रतिनिधींची निवड करण्यासाठी निवडणूक होणार आहे. सहा जागांपैकी एक जागा महिला तर एक जागा अनुसूचित जमातीसाठी राखीव आहे.

नेत्यांच्या नातेवाइकांचे स्वारस्य

नोव्हेंबर २०१७ मध्ये झालेल्या या निवडणुकीत प्रगती पॅनेल व एकता पॅनेलमध्ये लढत रंगली होती. राज्यातील सर्वपक्षीय नेत्यांच्या नातेवाइकांनी बाजी मारल्यामुळे राज्याचे लक्ष या निवडणुकीकडे होते. यात प्रामुख्याने माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांची पत्नी सुनेत्रा पवार, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे चुलत बंधू प्रसेनजित फडणवीस, महसुल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांचे चुलत बंधू अनिल विखे पाटील या निवडणुकीत विजयी झाले होते.

महत्त्वाच्या तारखा
अर्ज दाखल करणे ः १० नोव्हेंबर
अर्ज मागे घेणे ः १२ नोव्हेंबर
मतदान ः २७ नोव्हेंबर
मतमोजणी आणि निकाल ः २९ नोव्हेंबर

मतदान केंद्र
पुणे ः सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ, गणेशखिंड
नगर ः सारडा महाविद्यालय
नाशिक ः एच.पी.टी. महाविद्यालय