Dairy business : राज्यातील दुग्ध व्यवसायाला फटका | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

milk
राज्यातील दुग्ध व्यवसायाला फटका

Dairy business : राज्यातील दुग्ध व्यवसायाला फटका

पुणे : परराज्यातील दुग्ध संस्थांची आक्रमक स्पर्धा आणि विक्रेता ते ग्राहक यांच्यातील दूध दरातील मोठ्या फरकाचा राज्यातील दुग्ध व्यवसायावर दुष्परिणाम होऊ लागला आहे. यामुळे राज्यातील दुग्ध व्यवसायाशी निगडित असलेले शेतकरी, दुग्ध संस्था आणि ग्राहकांचे मोठे आर्थिक नुकसान होऊ लागले आहे. याचा थेट परिणाम हा पुणे शहर व जिल्ह्यातील दूध व्यवसायावरही होऊ लागला आहे. यावर तातडीने उपाययोजना करण्यासाठी येत्या रविवारी (ता.३०) राज्यातील प्रमुख दुग्ध संस्थांच्या प्रतिनिधींची बैठक पुण्यात आयोजित करण्यात आली आहे.

कर्नाटक, आंध्र प्रदेश, राजस्थान, मध्यप्रदेश आणि गोवा राज्यामध्ये तेथील राज्य सरकारकडून शेतकऱ्यांना प्रतिलिटर ५ रुपयांचे अनुदान दिले जाते. त्यामुळे तेथील दुग्ध संस्था स्थानिक शेतकऱ्यांकडून अल्प दरात दूध खरेदी करतात. यामुळे संस्थांचा खर्च वाचतो आणि त्या पैशाचा वापर केवळ अधिकच्या दुधाची गरज असेल त्या दिवसापुरते महाराष्ट्रातील दूध अधिक भावाने खरेदी करण्यासाठी केला जातो. परिणामी येथील शेतकऱ्यांना कधी खुपच कमी तर, कधी खुपच जास्त असा दर मिळू लागल्याने, राज्यातील दूध व्यवसाय अस्थिर होऊ लागला आहे. यामुळे दूग्ध संस्था, उत्पादक शेतकरी आणि ग्राहकांनाही मोठ्या प्रमाणात फटका बसू लागला असल्याचे महाराष्ट्र राज्य दुग्ध उत्पादक व प्रक्रिया व्यावसायिक कल्याणकारी संघाचे सचिव प्रकाश कुतवळ यांनी सांगितले.

सध्या जिल्ह्यात गाईच्या दुधाच्या खरेदी व विक्री दरात प्रतिलिटर २० रुपयांचा फरक आहे. शहर व जिल्ह्यातील दुग्ध उत्पादकांकडून संस्था गाईचे दूध प्रतिलिटर ३६ रुपयांनी खरेदी करत असून प्रत्यक्षात ग्राहकांना हेच दूध प्रतिलिटर ५५ रुपयांनी खरेदी करावे लागत आहे. यामुळे दुग्ध संस्थांकडून विक्रेत्याला (डीलर) दिल्या जाणाऱ्या किमतीत आणि विक्रेत्यांकडून ग्राहकांना विकल्या जाणाऱ्या किमतीत मोठी तफावत निर्माण झाली आहे. दूध विक्रेत्यांच्या या नफेखोरीची मोठी झळ शेतकऱ्यांना आणि ग्राहकांना बसू लागली आहे. साधारणतः शेतकऱ्यांकडून दूध खरेदी केल्यानंतर त्यावर प्रक्रिया करणे, पिशवी बंद करणे आणि प्रत्यक्ष ग्राहकांच्या हातात पडेपर्यंत दूध संस्थांना प्रति लिटर किमान १० आणि कमाल १४ रुपये खर्च येतो. त्यात डीलर, सबडिलर आणि विक्रेत्यांचे कमिशनही असते, असेही त्यांनी यावेळी स्पष्ट केले.

विक्रेत्यांना आठ रुपये नफा

पुणे शहर व जिल्ह्यातील दुग्ध संस्था सध्या शेतकऱ्यांकडून गाईचे दूध प्रतिलिटर ३६ रुपयांनी खरेदी करत आहेत. त्यावर त्यांना प्रक्रिया खर्च किमान दहा ते १४ रुपये प्रतिलिटर करावा लागत आहे. प्रक्रिया केल्यानंतर हेच दूध विक्रेत्यांना कमाल ४७ रुपये प्रति लिटरने दिले जाते. विक्रेता त्याची ५५ रुपयांनी विक्री करत असल्याचे विविध संस्थांच्या अध्यक्षांनी नाव छापण्याच्या अटीवर सांगितले.

नुकसान टाळण्यासाठी आवश्यक उपाययोजना

- दूध संघांनी दर चढ-उतार निधी स्थापन करायला हवा

- खरेदी व विक्री दरावर नियंत्रण ठेवणारी सक्षम यंत्रणा असायला हवी

- सरकारने स्थापन केलेल्या समितीनेच दर निश्चित करणे अनिवार्य करावे

- सरकारने स्थापन केलेल्या समितीने घेतलेल्या निर्णयाची अंमलबजावणी व्हावी

- बाहेरील राज्यातील दूध संस्थांना काही अटी व शर्ती असणे आवश्यक
- अन्य राज्यांप्रमाणे महाराष्ट्रातही प्रतिलिटर ५ रुपयांचे अनुदान दिले जावे

आधीच दुधाच्या आणि दूध पावडर व बटरच्या (लोणी) खरेदी आणि विक्री दरात कायम चढ-उतार होत असतात. त्यातच परराज्यातील दूध संस्था आता महाराष्ट्रातील दूध व्यवसाय अस्थिर करू लागल्या आहेत. या अस्थिरतेचा फटका हा शेतकरी, दूध संस्था, ग्राहक आणि दूध व्यवसायालाच बसू लागला आहे. हे टाळण्यासाठी दूध व्यवसाय वाढीसाठी राज्य सरकारने स्वतंत्र धोरण जाहीर करणे गरजेचे आहे.
- प्रकाश कुतवळ, सचिव, राज्य दुग्ध उत्पादक व प्रक्रिया व्यावसायिक कल्याणकारी संघ