पुणे विमानतळाचे विंटर शेड्यूल ‘कोरडे’ स्लॉट उपलब्ध मात्र सेवा देणाऱ्या कंपन्यांची अनुत्सुकता | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

पुणे विमानतळाचे विंटर शेड्यूल ‘कोरडे’ 
स्लॉट उपलब्ध मात्र सेवा देणाऱ्या कंपन्यांची अनुत्सुकता
पुणे विमानतळाचे विंटर शेड्यूल ‘कोरडे’ स्लॉट उपलब्ध मात्र सेवा देणाऱ्या कंपन्यांची अनुत्सुकता

पुणे विमानतळाचे विंटर शेड्यूल ‘कोरडे’ स्लॉट उपलब्ध मात्र सेवा देणाऱ्या कंपन्यांची अनुत्सुकता

sakal_logo
By

पुणे, ता. २९ : पुणे विमानतळाच्या बहुचर्चित ‘विंटर शेड्यूल’ला रविवार (ता. ३०)पासून सुरुवात आहे. यात नवीन व अधिकच्या उड्डाणांसाठी विमानतळ प्रशासनाने प्रयत्न केले. प्रशासनाने जास्तीचे स्लॉट उपलब्ध करूनदेखील विमानसेवा देणाऱ्या कंपन्यांची मात्र सेवा देण्यास अनुत्सुकता असल्याचे दिसून येते. यामध्ये पुणे विमानतळाचे बहुतांश स्लॉट रिकामे राहिले आहेत. विशेषतः शनिवारी व रविवारी मोठ्या प्रमाणांत स्लॉट रिकामे आहेत. त्यामुळे पुणे विमानतळाचे विंटर शेड्यूल प्रवाशांसाठी ‘कोरडे’च जाणार आहे.

विंटर शेड्यूलमध्ये प्रवास करणाऱ्यांची संख्या अधिक असते. त्यामुळे विमानतळ प्रशासन उड्डाणासाठी व लँडिंगसाठी विमान कंपन्यांना वेळ उपलब्ध करून देते. जास्तीतजास्त उड्डाणे व्हावीत यासाठी विमानतळ प्रशासन प्रयत्न करते. या वेळी तो प्रयत्न झालादेखील. मात्र, विमान कंपन्याचा त्याला फारसा प्रतिसाद लाभलेला नाही. तसेच जाहीर केलेल्या शेड्यूलमध्ये नवीन शहरांना जोडलेले नाही. त्यामुळे याचा फटका प्रवाशांना बसणार आहे.

स्लॉट वाढले मात्र विमान कंपन्या कुठे?
- पुणे विमानतळावर सध्या रोज सरासरी १६० ते १७० विमानांची ये-जा होते. विंटर शेड्यूलमध्ये सोमवार ते शुक्रवार दरम्यान १०९ स्लॉट म्हणजेच २१८ विमानांना ये-जा करण्यास परवानगी मिळाली आहे. मात्र प्रत्यक्षात २०० विमानांची वाहतूक होणार आहे. यात दररोज ९ स्लॉट रिकामे राहिले आहेत.
- शनिवारी २२० विमानांना वाहतुकीस परवानगी देण्यात आली. मात्र प्रत्यक्षात केवळ १६२ विमानांची वाहतूक होईल. म्हणजे जवळपास ५८ विमानांची सेवा देण्यास विमानसेवा देणाऱ्या कंपन्यांनी अनुत्सुकता दाखवली आहे. दर शनिवारी २९ स्लॉट रिकामे राहतील.
- रविवारीदेखील अशीच परिस्थिती आहे. रविवारी २४९ विमानांच्या वाहतुकीस परवानगी दिली आहे. मात्र प्रत्यक्षात २०३ विमानांची वाहतूक होईल. ४६ विमानांच्या सेवेस कंपन्यांनी पाठ फिरवली. रविवारी २३ स्लॉट रिकामे राहिले आहेत.

‘दोहा’ला मंजुरी मात्र तारीख ठरली नाही
पुणे ते दोहा व पुणे ते सिंगापूर या सेवेसाठी इंडिगो एअरलाइन्सला स्लॉट मंजूर झाला आहे. मात्र त्याची तारीख अद्याप ठरलेली नाही. तर पुणे-सिंगापूर दरम्यानची २ डिसेंबरपासून सुरुवात होत आहे. तर १२ नोव्हेंबरपासून पुणे-बँकॉक ही विमानसेवा सुरू होत आहे.

३० ऑक्टोबरपासून पुणे विमानतळाचा विंटर शेड्यूल सुरू होत आहे. जास्तीतजास्त विमानांचे उड्डाणे व्हावे, या करिता प्रयत्न केले गेले आहेत. याचा प्रवाशांना लाभ होणार आहे.
- संतोष ढोके, विमानतळ संचालक, पुणे विमानतळ

हवाई दलाच्या सरावाच्या व्यस्त वेळापत्रकातून पुणे विमानतळावर एवढ्या मोठ्या प्रमाणात स्लॉट उपलब्ध होणे ही चांगली बाब आहे. मात्र विमानसेवा देणाऱ्या कंपन्यांनी त्यास अपेक्षित प्रतिसाद दिला नाही. त्यामुळे मोठ्या प्रमाणात स्लॉट रिकामे राहिले आहेत.
- धैर्यशील वंडेकर, हवाई वाहतूकतज्ज्ञ