हॉटेल व्यवस्थापकाचा वार करून खून | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

हॉटेल व्यवस्थापकाचा वार करून खून
हॉटेल व्यवस्थापकाचा वार करून खून

हॉटेल व्यवस्थापकाचा वार करून खून

sakal_logo
By

धायरी, ता. ३० : दुचाकीवरून घरी जात असलेल्या ‘गारवा बिर्याणी’च्या व्यवस्थापकाचा अज्ञातांनी डोक्यात वार करून खून केला. शनिवारी (ता. २९) धायरेश्वर मंदिर ते पारी कंपनी चौक दरम्यान हा प्रकार घडला. कोणत्या कारणातून हा खून करण्यात आला, हे अद्याप स्पष्ट झालेले नाही.
भरत भगवान कदम (वय २४, रा. धायरेश्वर प्राइड, मतेनगर, धायरी) असे खून झालेल्याचे नाव आहे. या प्रकरणी त्यांचा भाऊ प्रकाश भगवान कदम यांनी सिंहगड रस्ता पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, भरत कदम हे गारवा बिर्याणी येथे व्यवस्थापक होते. शनिवारी रात्री काम संपल्यानंतर ते दुचाकीवरून घरी जात होते. यावेळी धायरेश्वर मंदिर ते पारे कंपनी चौक रस्त्यावर हल्लेखोरांनी कदम यांना अडविले आणि त्यांच्या डोक्यात वार केले. कदम जखमी अवस्थेत पडल्यानंतर हल्लेखोर तेथून पळून गेले. गंभीर जखमी अवस्थेतील कदम यांना तातडीने रुग्णालयात नेण्यात आले. मात्र उपचारांपूर्वीच त्याचा मृत्यू झाला होता. कदम यांची दुचाकी घटनास्थळी सापडली. पैसे, पाकिट तसेच अन्य कागदपत्रे खिशात सापडली. चोरीच्या उद्देशाने भरतचा खून झाला नसावा, असे गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक जयंत राजूरकर यांनी सांगितले. वरिष्ठ पोलिस निरीक्षक शैलेश संखे यांच्या मार्गदर्शनाखाली या गुन्ह्याचा तपास करण्यात येत आहे.

धायरी परिसरातील गुन्ह्यांत वाढ

धायरी परिसरात फौजदारी स्वरूपांच्या गुन्ह्यांमध्ये गेल्या काही दिवसांत वाढ झाली आहे. येथील गणेश नगरमध्ये गारवा बिर्याणी हॉटेलमध्ये बिर्याणी घेण्यासाठी आलेल्या ग्राहकांबरोबर झालेल्या वादातून कोयत्याने वार करून हॉटेल व्यावसायिकासह दोघांच्या खुनाचा प्रयत्न केल्याची घटना काही दिवसांपूर्वी घडली होती. या प्रकरणी मयूर मते (वय ३३, रा. धायरी) यांनी सिंहगड रोड पोलिसांकडे फिर्याद दिली आहे. त्यावरुन सहा जणांना विरुद्ध दाखल करण्यात आला आहे.