नौदलात अधिकारी पदासाठी ऑनलाइन अर्ज प्रक्रिया सुरू | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

नौदलात अधिकारी पदासाठी
ऑनलाइन अर्ज प्रक्रिया सुरू
नौदलात अधिकारी पदासाठी ऑनलाइन अर्ज प्रक्रिया सुरू

नौदलात अधिकारी पदासाठी ऑनलाइन अर्ज प्रक्रिया सुरू

sakal_logo
By

पुणे, ता. ३० ः भारतीय नौदलात अधिकारी होण्याचे स्वप्न बाळगणाऱ्यांसाठी एक आनंदाची बातमी. नौदलाच्या वतीने ‘शॉर्ट सर्व्हिस कमिशन’ (एसएससी) अंतर्गत अधिकारी प्रवेश प्रक्रियेला सुरवात झाली आहे. यासाठी ऑनलाइन अर्ज प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. इच्छुक उमेदवारांना येत्या ६ नोव्हेंबरपर्यंत अर्ज भरता येणार आहे.
ही प्रवेश प्रक्रिया महिला व पुरुष उमेदवारांसाठी असून यामध्ये २१२ पदांसाठी भरती करण्यात येणार आहे. या प्रक्रिये अंतर्गत विविध विभागांमध्ये अधिकारी पदांसाठी उमेदवारांची निवड केली जाणार आहे. त्यात जनरल सर्व्हिससाठी ५६, एअर ट्रॅफिक कंट्रोलर पदासाठी ५, नेव्हल एअर ऑपरेशन ऑपरेशन अधिकारीसाठी १५, पायलटसाठी २५ जागा, लॉजिस्टिक आणि इंजिनिअरिंग विभागासाठी प्रत्येकी २५ जागा राखीव ठेवण्यात आल्या आहेत. त्याचबरोबर शिक्षण विभागात १२ तर, इलेक्ट्रिकलमध्ये ४५ आणि नेव्हल कंस्ट्रक्टर या पदासाठी १४ जागा ठेवण्यात आल्या आहेत. पदांची आकडेवारी तुर्तास देण्यात आली असून प्रत्यक्ष निवड प्रक्रिये दरम्यान यामध्ये बदल होऊ शकतो, असे नौदलाद्वारे स्पष्ट करण्यात आले आहे.
या प्रक्रियेत लेखी परीक्षा नसून थेट सर्व्हिस सिलेक्शन बोर्डाच्या (एसएसबी) मुलाखती घेण्यात येणार आहे. त्यासाठी उमेदवारांच्या पदवी किंवा पदव्युत्तर पदवीच्या गुणांच्या आधारावर त्यांना एसएसबीसाठी निवडले जाणार आहे. एसएसबी उत्तीर्ण झालेल्या उमेदवारांना पुढील प्रशिक्षणासाठी केरळच्या इंडियन नेव्हल ॲकॅडमी येथे पाठविण्यात येईल. प्रशिक्षण पूर्ण केल्यानंतर उमेदवारांना भारतीय नौदलाच्या विविध विभागात अधिकारी म्हणून रुजू केले जाईल.
यासाठी ठराविक शैक्षणिक पात्रता आणि वयोमर्यादा देण्यात आली आहे. या संपूर्ण प्रवेश प्रक्रियेशी निगडित माहिती व अर्ज करण्यासाठी इच्छुक उमेदवारांना joinindiannavy.gov.in या नौदलाच्या अधिकृत संकेतस्थळाचा वापर करता येईल.