Weather Update : राज्यात वाढली थंडीची हुडहुडी | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

cold weather
राज्यात वाढली थंडीची हुडहुडी

Weather Update : राज्यात वाढली थंडीची हुडहुडी

पुणे : उत्तरेकडून वाहणाऱ्या थंड वाऱ्यांमुळे राज्यात गारठा चांगलाच वाढू लागला आहे. एकीकडे हवामान कोरडे असून, दुसरीकडे थंड वाऱ्यांच्या प्रवाहामुळे राज्यात थंडीत वाढ होताना दिसून येत आहे. किमान तापमानात झालेली घट तर कमाल तापमानात मात्र चढ-उतार कायम असून, रात्री आणि पहाटेच्या वेळी थंडीचा कडाका अधिक जाणवू लागला आहे. मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात किमान तापमानात लक्षणीय घट झाली आहे. राज्यात बऱ्याच ठिकाणी किमान तापमानाचा पारा हा सरासरीपेक्षा २ ते ३ अंशांनी खाली घसरला आहे. तर कमाल तापमानातही चढ-उताराची स्थिती कायम आहे.

निरभ्र आकाश असल्यामुळे दुपारच्यावेळी पडणाऱ्या उन्हाचे चटकेही चांगलेच जाणवत आहेत. राज्यात बहुतांश ठिकाणी किमान तापमान १८ अंशांखाली आल्याने पहाटे गारठा वाढू लागला आहे. त्यामुळे थंडीपासून बचाव करण्यासाठी उबदार कपड्यांचा वापर करण्यावर नागरिक भर देत आहेत. रविवारी सायंकाळपर्यंत राज्यातील नीचांकी तापमानाची नोंद पुण्यात १२.६ अंश सेल्सिअस इतकी झाली. तर सर्वाधिक कमाल तापमान सांताक्रुझ येथे ३५.४ अंश इतके नोंदले गेले. राज्यात पुढील चार दिवस हवामान कोरडे राहणार असल्यामुळे गारठादेखील अशाच प्रकारे जाणवण्याची शक्यता हवामानशास्त्र विभागाने वर्तवली आहे.

सध्या ईशान्य मॉन्सूनने दक्षिण भारतातील आणखी काही भाग व्यापला आहे. त्यातच नैर्ऋत्य बंगालच्या उपसागरात दक्षिण श्रीलंकेच्या किनाऱ्यालगत समुद्रसपाटीपासून ३.६ किलोमीटर उंचीवर चक्राकार वारे वाहत आहेत. उत्तरेकडील हिमालयातील भागात होणाऱ्या बर्फवृष्टीमुळे थंड वाऱ्यांचा प्रवाह सुरू आहे. त्यात कोरड्या हवामानाची स्थिती कायम असल्याने हे वातावरण पोषक ठरत आहे. परिणामी, राज्यात गारठाही वाढू लागला आहे. उत्तरेकडून वाहणारे थंड व कोरडे वारे पोषक ठरल्याने राज्यात गारठा वाढू लागला आहे. निरभ्र आकाशामुळे स्वच्छ सूर्यप्रकाश जमिनीवर येऊन दुपारी ऊन वाढले आहे. रविवारी (ता. ३०) सकाळपर्यंतच्या २४ तासांमध्ये कोकण वगळता राज्यात बहुतांश ठिकाणी किमान तापमान १८ अंशांच्या खाली होते. तर कमाल तापमान २९ ते ३५ अंशांच्या दरम्यान स्थिरावले आहे.

येथे किमान तापमान १५ अंशांच्या खाली
ठिकाण किमान तापमान (अंश सेल्सिअसमध्ये)


पुणे १२.६
लोहगाव १४.७
जळगाव १४
महाबळेश्वर १३.८
नाशिक १३.३
सातारा १४.३
औरंगाबाद १३