शारदा बँक ‘कॉसमॉस’मध्ये विलीन | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Sharda Bank merged with Cosmos Bank
शारदा बँक ‘कॉसमॉस’मध्ये विलीन

शारदा बँक ‘कॉसमॉस’मध्ये विलीन

पुणे : कॉसमॉस को-ऑप. बँकेमध्ये श्री शारदा सहकारी बँकेचे विलीनीकरण करण्यात आले आहे. रिझर्व्ह बँकेने सहकारी बँकांच्या विलीनीकरणाबाबत केलेल्या सूचनेनुसार देशातील सहकार क्षेत्रातील हे पहिलेच विलीनीकरण आहे, अशी माहिती कॉसमॉस बँकेच्या संचालक मंडळाने सोमवारी पत्रकार परिषदेत दिली.

याप्रसंगी कॉसमॉस बँकेचे ज्येष्ठ संचालक डॉ. मुकुंद अभ्यंकर, बॅंकेचे उपाध्यक्ष सचिन आपटे, ज्येष्ठ संचालक ॲड. प्रल्हाद कोकरे, प्रा. नंदकुमार काकिर्डे, ॲड. अनुराधा गडाळे, अजित गिजरे, प्रा. राजेश्र्वरी धोत्रे, यशवंत कासार, मिलिंद पोकळे, अरविंद तावरे, व्यवस्थापकीय संचालिका अपेक्षिता ठिपसे उपस्थित होते.

आपटे म्हणाले, ‘‘ग्राहकांना चांगली सेवा देण्यासोबतच बँकांची क्षमता वाढण्यासाठी केंद्र सरकारने राष्ट्रीयकृत बँकांची विलीनीकरणे केली. त्याच धर्तीवर अर्बन को-ऑप. बँकांचीही विलीनीकरणे रिझर्व्ह बँकेला अपेक्षित आहेत. त्यानुसार ऑक्टोबर २०२१ मध्ये या दोन्ही बँकांनी विलीनीकरणाचा प्रस्ताव रिझर्व्ह बँकेकडे दाखल केला होता. या प्रस्तावाला रिझर्व्ह बँकेने १४ ऑक्टोबर २०२२ रोजी मान्यता दिली. त्यानुसार ही विलीनीकरण योजना ३० ऑक्टोबरपासून प्रत्यक्षात अस्तित्वात आली आहे.

श्री शारदा सहकारी बँकेची वार्षिक उलाढाल सुमारे ५५० रुपये कोटी आहे. परंतु, बदलत्या काळात छोट्या सहकारी बँकांना खातेदार टिकविण्यासोबतच नफा-खर्चाचे योग्य व्यवस्थापन करण्यासाठी अशा प्रकारचे विलीनीकरण होणे, ही काळाची गरज आहे. हे सगळ्यात पहिल्यांदा ओळखून या दोन्ही बँकांच्या संचालक मंडळांनी त्वरित विलीनीकरणाचा निर्णय घेतला. या विलीनीकरणामुळे आता शारदा बँकेच्या खातेदार, ठेवीदार आणि कर्जदारांना सध्या मिळत असलेल्या सेवांपेक्षा जलद, आधुनिक आणि सुरक्षित सेवा देण्यावर कॉसमॉस बँकेचा भर असेल, असे या वेळी सांगण्यात आले.

सात राज्यांत बँकिंग व्यवहार

विलीनीकरणानंतर कॉसमॉस बँकेच्या १५२ शाखा झाल्या आहेत. पुणे शहरात आता कॉसमॉस सर्वांत जास्त शाखा असणारी बँक झाली आहे. आत्तापर्यंत कॉसमॉस बँकेने १६ बँकांचे विलीनीकरण करून घेतले आहे.

दरम्यान, या विलीनीकरणामुळे शारदा बँकेच्या सर्व आठ शाखांमधून कॉसमॉस बँकेच्या नेट बँकिंग, मोबाईल बँकिंग व्हॉट्सअॅप बँकिंग अशा सर्व अत्याधुनिक सेवांचा लाभ खातेदारांना मिळावा या उद्देशाने शारदा सहकारी बँकेने विलीनीकरणाचा मार्ग स्वीकारला. कॉसमॉस बँकेच्या सात राज्यांमध्ये शाखा असून, या सर्व शाखांमधून बँकिंग व्यवहार करण्याची सुविधा सर्व खातेदारांना मिळणार आहे, असे ठिपसे यांनी नमूद केले.