पाठीवरती हात ठेवून नुसतं लढ म्हणा... | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

पाठीवरती हात ठेवून 
नुसतं लढ म्हणा...
पाठीवरती हात ठेवून नुसतं लढ म्हणा...

पाठीवरती हात ठेवून नुसतं लढ म्हणा...

sakal_logo
By

प्रिय ताई,
तुझे आभार कोणत्या शब्दांत मानू, हेच मला कळेनासे झाले आहे. आमच्यामध्ये तू सर्वांत लहान असूनही, नेहमीच आमच्यावर मायेची पाखर धरतेस. अडीअडचणीच्या काळात आर्थिक मदतीबरोबरच आत्मविश्‍वासही देतेस. तू पाठीशी आहेस म्हणून मी आयुष्यात उभारी घेऊ शकलो, याची मला जाणीव आहे.
दिवाळीच्या आधी अवकाळी पाऊस झाला आणि हाता- तोंडाशी आलेला पिकांचा घास हिरावून गेला. तीन एकरातील कांदा काढून, त्याचे ढीग केले होते. मात्र, तीन- चार दिवस पाऊस एवढा झाला की बरेचसे कांदे वाहून गेले. काही कांदे शेतातील पाण्यात तरंगू लागले. हे दृश्‍य पाहून मी मटकन जाग्यावर बसलो. मी रंगवलेली स्वप्ने डोळ्यांदेखत वाहून जात असल्याचे पाहून, अश्रू अनावर झाले. मध्येच वेड्यासारखा वावरात पळू लागलो. घेतलेले कर्ज कसे फेडू? लेकरा- बाळांसोबत दिवाळी कशी साजरी करू, या विचाराने मी खचून गेलो. आपल्या जगण्यात काही अर्थ नाही, असा टोकाचाही विचार मनात आला. घरी आल्यानंतर लहानग्या प्रज्वल आणि सायलीने मिठी मारली. माझ्या डोळ्यांतील अश्रू पाहून दोघेही बिचकले. ‘‘बाबा, तू रडू नकोस. दिवाळीत आम्हाला कपडे नकोत.’’ असं म्हणून सायलीने माझे डोळे पुसले.
ताई, आठ वर्षांची सायली अगदी तुझ्यावर गेली आहे. तिलाही काहीही न सांगता दुसऱ्यांच्या मनातलं ओळखता येतं. मी मुलांची समजूत काढण्याऐवजी त्यांनीच माझी समजूत काढली. दोन दिवसांनी भाऊबीज होती. तुला ओवाळणी काय घालावी, हा प्रश्‍न मला पडला. त्यामुळे मी येण्याचे टाळत होतो. मात्र, तू फारच आग्रह केला म्हणून आलो. माझ्या मनातील चलबिचल तू ओळखली असावीस. ओवाळणी म्हणून कागदी पाकीट तुझ्या ताटात ठेवलं. जेवतानाही मी दाजी आणि तुझी नजर टाळत होतो. रिकामं पाकीट बघितल्यावर तुमच्या दोघांची काय प्रतिक्रिया येईल म्हणून मी अस्वस्थ होतो. खाली मान घालूनच मी तुमच्या घरातून बाहेर पडलो. थोडं पुढं आल्यावर माझ्या अश्रूंचा बांध फुटला. बहिणीला ओवाळणी म्हणून मी हजार- पाचशेही देऊ शकलो नाही, याची खंत वाटत होती. घरी आल्यानंतर मुलांसाठी तू दिलेला फराळ काढण्यासाठी पिशवीत हात घातला. त्यावेळी पाकिटात तू दहा हजार रूपये ठेवले होतेस. ते पाहून माझं मन भरून आलं. त्या पैशाने मी बायको व मुलांना कपडे व फटाके आणले. यंदाची माझी दिवाळी तुझ्यामुळे आनंदी झाली.
ताई, लहानपणी आपल्या घरची आर्थिक परिस्थिती फार वाईट होती. दिवाळीच्या आधी आपल्या गावातील मंदिरात बुंदीचे वाटप केले होते. त्यावेळी आपण तिघा भावंडांनी छोटं पातेले भरून बुंदी आणली होती. आम्ही ती तुझ्याकडे ठेवायला दिली. संध्याकाळी आईने विचारले, त्यावेळी तू बुंदी संपल्याचे सांगितले. एकटीने सगळी बुंदी खाल्ली म्हणून आईने तुला खूप मारले. ‘आपली धाकटी बहीण खूप स्वार्थी आहे’ म्हणून मी आणि मनोजही तुझ्यावर नाराज झालो. मात्र, दिवाळीच्या दिवशी तू बुंदीचे लाडू सगळ्यांच्या हातात ठेवून, आपल्या सगळ्यांची दिवाळी गोड केलीस. त्यावेळी तुला छातीशी कवटाळून आई कितीतरी वेळ रडत होती. आजही ते दृश्‍य आठवले तरी गलबलून येते. सगळ्यात लहान असूनही, तू आमची तेव्हापासून काळजी घेत आहेस. तुझ्यासारखी बहिण मिळाल्याचा आम्हा दोघा भावांना खूप अभिमान आहे.

ता. क. ः ताई, तू दिलेल्या पैशांतून टोमॅटोसाठी खते आणि औषधे आणली आहेत. एक-दीड महिन्यात टोमॅटोचे पीक चालू होईल. त्यावेळी तुझे हे पैसे मी नक्की परत करीन. तू व दाजींनी केलेल्या मदतीमुळेच मी पुन्हा एकदा आयुष्याची लढाई लढण्यासाठी सज्ज झालो आहे. कुसूमाग्रजांच्या कवितेचा आधार घेत मी एवढंच म्हणेन, की ‘मोडून पडला संसार तरी मोडला नाही कणा, पाठीवरती हात ठेवून नुसते लढ म्हणा.’
तुझा लाडका भाऊ, समीर