चुकीचा दाखलाप्रकरणी ग्रामसेवक निलंबित | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

चुकीचा दाखलाप्रकरणी ग्रामसेवक निलंबित
चुकीचा दाखलाप्रकरणी ग्रामसेवक निलंबित

चुकीचा दाखलाप्रकरणी ग्रामसेवक निलंबित

sakal_logo
By

पुणे, ता. १ ः पुणे सहकारी दूध उत्पादक संघाच्या (कात्रज डेअरी) पंचवार्षिक निवडणुकीत तीन अपत्याच्या कारणावरून उमेदवारी अर्ज बाद झालेले पुरंदर तालुक्यातील तत्कालीन संचालक संदीप जगदाळे यांना तीन अपत्य असल्याबाबतचा भोर तालुक्यातील जोगवडी येथील ग्रामसेवकाने दिलेले अपत्याबाबतचा दाखला बनावट असल्याचे जिल्हा परिषदेच्या चौकशीतून निष्पन्न झाले आहे. त्यामुळे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आयुष प्रसाद यांनी जोगवडीचे ग्रामसेवक अशोक दंडवते यांना सोमवारी (ता. ३१) निलंबित केले. नाव साधर्म्याचा फायदा घेत भोर तालुक्यातील या ग्रामसेवकाने जोगवडी ग्रामपंचायतींच्या नोंदीत खाडाखोड आणि फेरफार करून हा चुकीचा दाखला दिल्याचे उघडकीस आले आहे.
याच दाखल्यामुळे जिल्हा दूध संघाचे तत्कालीन संचालक संदीप जगदाळे हे या निवडणुकीच्या रिंगणाबाहेर फेकले गेले. परिणामी निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी जगदाळे यांचे प्रतिस्पर्धी उमेदवार मारुती जगताप हे बिनविरोध झाले होते. संदीप जगदाळे यांना तीन अपत्य असल्याचा मुद्दा उपस्थित करत, मारुती जगताप यांनी याबाबतचा पुरावा म्हणून जोगवडी ग्रामपंचायतीचा तीन अपत्याबाबतचा दाखला सादर केला होता. जिल्हा परिषदेच्या चौकशीतून हाच दाखला बनावट असल्याचे आणि कागदपत्रात खाडाखोड करून तयार केला असल्याचे उघड झाले आहे.
निलंबित ग्रामसेवक अशोक दंडवते यांनी नियमबाह्य पद्धतीने दाखला देताना ग्रामपंचायतीच्या दस्तावेजामध्ये मोठ्या प्रमाणात फेरफार केले तसेच ग्रामपंचायतचे काही दप्तरदेखील गायब केले. यामुळे त्यांच्यावर ही निलंबनाची कारवाई करण्यात येत असल्याचे निलंबन आदेशात नमूद करण्यात आले आहे.

फौजदारी गुन्हा दाखल करा ः जगदाळे
माझा आणि जोगवडी गावचा अर्थाअर्थी काहीही संबंध नाही. जोगवडी ही काही माझी सासुरवाडीही नाही. तरीही तेथील ग्रामपंचायतीच्या ग्रामसेवकाने मी पुरंदर तालुक्यातील असताना माझा चुकीचा दाखला देण्याचा संबंध काय? या ग्रामसेवकाला हा दाखला जाणीवपूर्वक द्यायला लावलेला आहे. तो कोणी द्यायला लावला, हे बाहेर येणे गरजेचे आहे. त्यासाठी या ग्रामसेवकावर फौजदारी गुन्हा दाखल करून त्याची चौकशी व्हायला हवी, अशी मागणी संदीप जगदाळे (पुरंदर) यांनी प्रतिक्रिया देताना केली आहे.