प्रकल्पांत स्थानिकांना सामावून घ्या ! | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

प्रकल्पांत स्थानिकांना सामावून घ्या !
प्रकल्पांत स्थानिकांना सामावून घ्या !

प्रकल्पांत स्थानिकांना सामावून घ्या !

sakal_logo
By

पुणे, पिंपरी/शिरूर, ता. ३१ : रांजणगाव एमआयडीसीत इलेक्ट्रॉनिक्स मॅन्युफॅक्चरिंग क्लस्टरच्या माध्यमातून पाच हजार रोजगार उपलब्ध होणार असल्याने शहर, जिल्ह्यासह औद्योगिक पट्ट्यातून उत्स्फूर्त स्वागत झाले. या क्लस्टरमधील गुंतवणुकीमुळे सर्व उद्योजकांना याचा फायदा होणार आहे. त्याचवेळी स्थानिकचे निकष काटेकोर पाळले जाऊन प्रकल्पग्रस्त भूमिपुत्रांना प्राधान्याने या विकासात सामावून घेतले जावे, अशी अपेक्षा व्यक्त करण्यात आली.
पुणे जिल्ह्यात पाचशे कोटींच्या इलेक्ट्रॉनिक मॅन्युफॅक्चरिंग क्लस्टरला केंद्र सरकारने मंजुरी दिली. हा प्रकल्प रांजणगाव एमआयडीसीच्या फेज तीनमध्ये होणार असल्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ट्विटरच्या माध्यमातून जाहीर केल्यानंतर रांजणगाव औद्योगिक पट्ट्यात समाधानाचे वातावरण पसरले. राजकीय पदाधिकाऱ्यांबरोबरच स्थानिक कामगार प्रतिनिधींनी या महत्त्वाकांक्षी प्रकल्पाचे स्वागत केले, तर सामान्य कामगारांनीही आता खऱ्या अर्थाने ‘अच्छे दिन’ येणार असल्याची प्रतिक्रिया दिली. या इलेक्ट्रॉनिक प्रकल्पात जास्त महिलांना सामावून घ्यावे, अशी मागणी बाभुळसरच्या सरपंच सोनाली फंड यांनी केली.
कर्डे घाटानजीक ‘फेज थ्री’मध्ये इलेक्ट्रॉनिक हब यापूर्वीच जाहीर झाले आहे. तेथे ‘आयएफबी’ या प्रकल्पाचे सत्तर टक्के काम झाले असून, स्टेरिऑनचे काम चालू असल्याची माहिती कामगार कंत्राटदार कृष्णा घावटे यांनी दिली.

हा प्रकल्प आणल्याबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे आभार. मात्र, माजी उद्योगमंत्री सुभाष यांनी या प्रकल्पाचे सूतोवाच केले होते. अनेक प्रकल्प महाराष्ट्राबाहेर जात असताना हा प्रकल्प येणे समाधानाची बाब असून, बेरोजगार तरुणांच्या दृष्टीने आशेचा किरण आहे.
- डॉ. अमोल कोल्हे, खासदार

शिरूर विधानसभा मतदारसंघातील ‘फेज थ्री’मध्ये हा प्रकल्प होत असताना त्याचे स्वागत आहे. ही मोठी गुंतवणूक होत असताना त्याचा लाभ नोकऱ्या व कामधंद्यांच्या माध्यमातून स्थानिकांना मिळावा. सुशिक्षित बेरोजगारांना त्यांच्या गुणवत्तेनुसार या नव्या औद्योगिकरणात अधिकाधिक सामावून घेतले जावे. रस्ते, वाहतूक व्यवस्था व पायाभूत सुविधांनाही गती दिली जावी.
- अशोक पवार, आमदार

येत्या काही महिन्यांत या प्रकल्पाच्या माध्यमातून दोन हजार कोटी रुपयांची गुंतवणूक होणे अपेक्षित आहे. सध्या भोसरीमध्ये ‘एमसीसीआयए’चेदेखील एक ब्राउनफील्ड इलेक्ट्रॉनिक्स मॅन्युफॅक्चरिंग क्लस्टर आहे. दोन महिन्यांत ते पूर्ण होईल. हे दोन्ही क्लस्टर एकमेकांना पूरक आहेत. त्याचा उद्योगांना फायदा होईल. इलेक्ट्रॉनिक्स मॅन्युफॅक्चरिंगमध्ये देशात राज्याचा वाटा २० टक्के आहे. आपण इलेक्ट्रॉनिक्सच्या वस्तू मोठ्या प्रमाणात आयात करत आहोत. त्यामुळे आणखी असे प्रकल्प आले पाहिजेत.
- प्रशांत गिरबने, महासंचालक, मराठा चेंबर ऑफ कॉमर्स, इंडस्ट्रीज अँड ॲग्रिकल्चर (एमसीसीआयए)

या ‘एमआयडीसी’तील या नव्या गुंतवणुकीचे स्वागत आहेच; पण सकारात्मक पद्धतीने दिलेल्या वेळेतच हा प्रकल्प मार्गी लागावा. कारण ‘फेज थ्री’मधील यापूर्वीच्या प्रकल्पांना म्हणावी तशी गती नाही. त्यामुळे प्रकल्प केवळ जाहीर करून स्थानिक बेरोजगारांवर हवालदिल होण्याची वेळ येणार नाही, हे प्राधान्याने पाहावे.
- नाथा शेवाळे, अध्यक्ष, महाराष्ट्र प्रदेश जनता दल

हा प्रकल्प नवीन आहे, की जुना पुन्हा नव्याने जाहीर केला, याबाबत संभ्रम आहे. नवीन प्रकल्प असेल तर त्याचा फायदा स्थानिकांना होणारच आहे. कारण ‘फेज थ्री’मध्ये यापूर्वीच इलेक्टॉनिक हब जाहीर झाले असून, तिथे दोन प्रकल्पांचे काम सुरू झाले आहे. त्यामुळे गोलमाल असू नये.
- विजय सोनवणे, करारो इंडिया कामगार युनियन लीडर

या ‘एमआयडीसी’मुळे पर्यावरणाची पातळी धोक्यात येत असून, प्रदूषणमुक्त प्रकल्पांचीच गरज आहे. यापुढे प्रकल्पांना प्रदूषणमुक्तीची सक्ती असायला हवी. पर्यावरणाचा समतोल ठेवणाऱ्या अशा अधिकाधिक प्रकल्पांची या परिसरात गरज आहे.
- तुषार वेताळ, अध्यक्ष, सिद्धेश्वर वनीकरण व पर्यावरण संवर्धन समिती, शिरूर

इलेक्ट्रॉनिक्स मॅन्युफॅक्चरिंग क्लस्टरची गुंतवणूक आल्यामुळे रांजणगाव, शिक्रापूर, चाकण, तळेगाव, पिंपरी-चिंचवड परिसरातील उद्योजकांना याचा फायदा होणार आहे. ‘आयएफबी’सारखी रेफ्रिजिरेशनची कंपनी सुमारे ४५० कोटी रुपयांची गुंतवणूक करणार असल्याने इलेक्ट्रॉनिक्ससह प्रेसपार्ट, फॅब्रिकेशन, रबर, प्लॅस्टिक्स अशा औद्योगिक क्षेत्रातील उद्योजकांना फायदा होणार आहे. या लघु-मध्यम-सूक्ष्म उद्योजकांचा सुटे भाग पुरवठा केला जाणार आहे.
- संदीप बेलसरे, अध्यक्ष, पिंपरी-चिंचवड लघु उद्योजक संघटना

इलेक्ट्रॉनिक्ससह अन्य उद्योजकांनाही नवीन तंत्रज्ञान आत्मसात करून उद्योग सुरू करण्याची संधी मिळू शकते. या सर्व गुंतवणुकीचा लघु-मध्यम-सूक्ष्म अशा सर्वच उद्योजकांना फायदा होईल. ऑटोमाबाइल क्षेत्रात आता मोठ्या कंपन्या ई-वाहनांकडे गुंतवणुकीसाठी वळल्या आहेत. त्यामुळे या क्लस्टरचा नक्कीच ई-वाहन उद्योग क्षेत्राला फायदा होईल.
- अभय भोर, अध्यक्ष, फोरम ऑफ स्मॉल स्केल इंडस्ट्रीज असोसिएशन