पुण्यात दम्याची धाप! | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

पुण्यात दम्याची धाप!
पुण्यात दम्याची धाप!

पुण्यात दम्याची धाप!

sakal_logo
By

पुणे, ता. १ : तुमच्या लहान मुलांना तुम्ही मातीत खेळून देता का? याचं उत्तर ‘नाही’ असेल तर तुम्ही तुमच्या मुलाच्या स्वच्छतेची अतीकाळजी घेता, असा त्याचा अर्थ होता. याच अतिकाळजीमुळे शहरात दम्याची (अस्थमा) धाप वाढत असल्याचे निरीक्षण वैद्यकीय तज्ज्ञांनी नोंदविले.
लहान मुलांमधील दम्याचे प्रमाण वेगाने वाढत आहे. यात सातत्याने वाढ दिसत आहे. शहरीकरण हे त्यामागचे प्रमुख कारण ठरले आहे. आपण शहरातील मुलांना कमीत कमी माती याच्या संपर्कात ठेवतो. मुले मैदानावर मातीमध्ये खेळत नाहीत. जिथे मातीचा संपर्क येणार नाही, अशा ठिकाणी आणि अशा खेळांच्या क्लबमध्ये पाठवण्याकडे पालकांचा कल अधिक असतो. त्याचा थेट परिणाम मुलांच्या श्वसन संस्थेवर होतो.
या बद्दल माहिती देताना छातीविकारतज्ज्ञ डॉ. नितीन अभ्यंकर म्हणाले, ‘‘लहानपणी मातीशी संपर्क न आल्याने मुलांमध्ये प्रतिकार शक्ती निर्माण होत नाही. नंतर ज्या वेळी संपर्क येतो, त्यावेळी शरीराकडून अॅलर्जिक प्रतिसाद देते. त्यामुळे त्याला अतिस्वच्छतेमुळे होणारे दुष्परिणाम असेही म्हणता येईल. मुलांमध्ये याचे प्रमाण निश्चित वाढत आहे.’’

अशी वाढली रुग्णसंख्या
दर वर्षी पाच ते दहा टक्क्यांनी दम्याच्या रुग्णांमध्ये वाढ होत आहे. शहरातील लहान मुलांच्या दम्याचे प्रमाण १० ते १२ टक्क्यांहून जास्त आहे. हेच प्रमाण प्रौढांमध्ये दोन ते तीन टक्के आहे. प्रौढांच्या तुलनेत बालदम्याच्या रुग्णांचे प्रमाण सातत्याने वाढत आहे.

शहर केंद्रित आजार
- दमा हा शहर केंद्रित आजार असल्याचे दिसत आहे. शहरापासून दूर गेल्यानंतर निमशहरी आणि ग्रामीण भागातील मुले मातीत खेळतात. त्यामुळे त्यांच्यामध्ये प्रतिकार शक्ती निर्माण होते.
- महामार्गापासून जितके दूर तितका दमा कमी, असा अभ्यासातून अधोरेखित झाले आहे. त्या आधारावर दमा हा शहर केंद्रित आजार झाला आहे.

दिवाळीनंतरची स्थिती दिलासादायक
दिवाळीमध्ये वाजविलेले फटके, तेलकट पदार्थ आणि वाढलेली थंडी यामुळे दम्याचे रुग्णांची संख्या दरवर्षी वाढलेली दिसते. या वर्षी लक्ष्मीपूजनच्या दिवशी फटाके वाजले. पण, इतर दिवशी त्याचं प्रमाण कमी होते. त्यामुळे दम्याच्या रुग्णांना रुग्णालयात दाखल करण्यापर्यंत वेळ गेली नाही. पण, आता थंडीमुळे बाह्य रुग्ण विभागात येणाऱ्या रुग्णांची संख्या वाढल्याचे निरीक्षण छातीविकार तज्ज्ञ डॉ. नितीन अभ्यंकर यांनी नोंदविले.

कोरोना उद्रेक नियंत्रित झाल्यानंतर सर्व व्यवहार पूर्ववत सुरू झाले आहेत. वाहतूक वाढली, औद्योगिक चक्रे पुन्हा सुरू झाली, लोक बाहेर पडून गर्दी करू लागली. या सर्वांचा परिणाम लहान मुलांवर दिसून आला. कोरोना उद्रेकात बाल दम्याचे प्रमाण ७० टक्क्यांपर्यंत कमी झाले होते. ते आता पुन्हा वाढताना दिसून येत आहे.
- डॉ. संदीप साळवी, फ्युअर फाउंडेशन