लायसन्स राज आणण्याची मोदी सरकारची भूमिका माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांची टीका | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

लायसन्स राज आणण्याची
मोदी सरकारची भूमिका

माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांची टीका
लायसन्स राज आणण्याची मोदी सरकारची भूमिका माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांची टीका

लायसन्स राज आणण्याची मोदी सरकारची भूमिका माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांची टीका

sakal_logo
By

पुणे, ता. १ : ‘‘डॉ. मनमोहन सिंग यांनी अर्थमंत्री असताना ‘लायसन्स राज’ कमी करण्यासाठी तसेच उद्योगांना कोणत्याही राज्यात जाण्यासाठी केंद्र सरकारची परवानगी घेण्याची अट जाणीवपूर्वक शिथिल करण्यात आली. परंतु आज केंद्रातील सरकार उदारीकरणाच्या विरोधात भूमिका घेत उद्योगांनी कोणत्या राज्यात गुंतवणूक करावी, हे ठरवत आहे. त्यामुळे हे सरकार पुन्हा ‘लायसन्स राज’ आणू पाहत असून ते देशाच्या दृष्टीने घातक आहे,’’ अशा शब्दांत माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी मोदी सरकारवर मंगळवारी टीका केली.

भारत जोडो यात्रेच्या पार्श्वभूमीवर आढावा बैठकीनंतर चव्हाण यांनी पत्रकारांशी संवाद साधला. वेदांता-फॉक्सकॉन, टाटा एअरबस यासारखे मोठे प्रकल्प महाराष्ट्रातून गुजरातमध्ये गेल्याने वादंग निर्माण झाले आहेत. सत्ताधारी आणि विरोधक त्यासाठी एकमेकांना जबाबदार धरत आहेत, असे चव्हाण म्हणाले.

महाराष्ट्रातून बाहेर जाणाऱ्या उद्योगांबाबत चव्हाण म्हणाले, ‘‘खासगी क्षेत्रातून होणारी गुंतवणूक ही त्या राज्यातील राजकीय स्थैर्यावर अवलंबून असते. सध्या राज्यातील सरकार अस्थिर आहे. त्यामुळे गुंतवणूकदारही विचार करीत असतील, हे देखील त्यामागे एक कारण आहे. आघाडी सरकारच्या काळात पालघर जिल्ह्यात मरिन पोलिस अकादमीला सर्व प्रकारची मान्यता देण्यात आली होती. पण सरकार बदलले. फडणवीस यांच्या काळात ते गुजरातमध्ये नेण्यात आले. मुंबईत वित्तीय सेवा केंद्र येणार होते, ते देखील अहमदाबाद येथे नेले. परंतु मुंबई हे जगाशी जोडले गेले आहे. अहमदाबादला कोण जाणार? उद्योग, व्यापारी यापैकी कोणाचीही मागणी नसताना मुंबई ते अहमदाबाद बुलेट ट्रेनचा घाट घातला गेला. या ट्रेनच्या खर्चाचा चाळीस टक्के भार हा महाराष्ट्रावर पडणार आहे.’’