Pune traffic : पुणेकरांवर १० महिन्यांत तब्बल ७३ कोटी २९ लाख रुपयांचा दंड | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

pune
डोकं ठिकाणावर आहे का?

Pune traffic : पुणेकरांवर १० महिन्यांत तब्बल ७३ कोटी २९ लाख रुपयांचा दंड

पुणे : वाहतुकीचे नियम मोडणाऱ्या पुणेकरांवर १० महिन्यांत तब्बल ७३ कोटी २९ लाख रुपयांचा दंड ठोठावण्यात आला असून, यातील सर्वाधिक प्रमाण (३८ कोटी ५९ लाख रुपये) हे विना हेल्मेट प्रवास करणाऱ्या चालकांचे आहे. जानेवारी ते ऑक्टोबर २०२२ मधील वाहतूक पोलिसांच्या कारवाईतून ही आकडेवारी समोर आली आहे. यातील तब्बल ५२ टक्के दंड हा विना हेल्मेट प्रवासासाठी ठोठावण्यात आला आहे. आता वेगळा विचार केला तर एकूण दंडाची रक्कम लक्षात घेता त्या रकमेत सुमारे १४४ किलो सोने आले असते. विना हेल्मेट चालकांना (एका हेल्मेटचे वजन सुमारे १३५० ग्रॅम) केलेल्या दंडाची रक्कम विचारात घेतली तर त्या पैशात सुमारे ७६ किलो सोने आले असते.

शहरात एकीकडे दिवसेंदिवस वाहतूक कोंडीत वाढ होत असून, दुसरीकडे नियमांचे उल्लंघन करणाऱ्या वाहनचालकांमुळे अडचणींनी अधिकच गंभीर स्वरूप धारण केले आहे. शहरातील सुरळीत वाहतुकीसाठी अशा बेशिस्त वाहनचालकांवर कारवाई करण्याबरोबरच ठोठावलेला दंड वसूल करण्याचे मोठे आव्हान पोलिसांसमोर आहे. मागील १० महिन्यांच्या कालावधीत १३ लाख ३३ हजार ८२९ जणांनी वाहतुकीच्या नियमांचे उल्लंघन केले आहे.

प्रत्यक्ष जागेवर किंवा सीसीटीव्हीच्या माध्यमातून ही दंडात्मक कारवाई करण्यात आली आहे. एकूण दंडाच्या फक्त २८ टक्के रकमेचा दंड नागरिकांनी आजवर भरला असून, उर्वरित दंड वसूलीसाठी पोलिस प्रयत्नशील आहे. विनाहेल्मेट प्रवास आणि नो पार्किंग खालोखाल सिट बेल्ट न लावणे, सिग्नलच्या नियमांचे पालन न करणे, लायसन्स न दाखवणे अशा घटनांचे प्रमाण वाढले असल्याचे वाहतूक पोलिसांनी सांगितले.

कोंडीचा प्रश्न गंभीर
अरुंद रस्ते, खड्डे आणि विविध विकासकामांमुळे पुणे शहरातील वाहतूक कोंडीने गंभीर स्वरूप धारण केले आहे. तासनतास होणाऱ्या वाहतूक कोंडीमुळे पुणेकरांमध्ये नियम मोडण्याची जणू स्पर्धाच लागली आहे. सुरक्षेसाठी वाहन चालकांनी नियमांचे पालन करावे, असे आवाहन पोलिसांनी केली आहे.

काय आहे स्थिती
- शहरात विना हेल्मेट प्रवास करणाऱ्यांची संख्या सर्वाधिक
- विना हेल्मेट प्रवास करणाऱ्यांकडून तब्बल ३८ कोटी ५९ लाख रुपयांचा दंड
- विना हेल्मेट खालोखाल नो पार्किंगमध्ये वाहने उभी करण्याचे प्रमाण जास्त
- वाहतूक कोंडीबरोबरच नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांचे प्रमाण वाढले
- सीसीटीव्हीच्या वापरामुळे कारवाईला वेग
- ७० टक्क्यांहून अधिक दंड वसूल करणे बाकी

दहा महिन्यांतील कारवाई
- नियमाचे उल्लंघन करणारे ः १३, ३३,८२९
- एकूण दंड ः ७३,२९,६८,९००
- भरलेला दंड ः २०,०७,३८,७५०
- बाकी ः ५३,२२,२५,१५०
- विना हेल्मेट प्रवास करणारे ः ७,७२,६४१
- नो पार्किंगमध्ये वाहने उभे करणारे ः २,०३,३९१

आपल्या बरोबरच रस्त्यावरील सर्वांच्या सुरक्षेसाठी वाहन चालवताना सर्व नियम पाळणे गरजेचे आहे. नियम मोडणाऱ्यांची संख्या मोठ्या प्रमाणावर वाढली असून, पुणेकरांना नम्र आवाहन आहे की सुरक्षेसाठी वाहतुकीचे नियम पाळायला हवेत.
- राहुल श्रीरामे, वाहतूक उपायुक्त, पुणे शहर