पथारी व्यावसायिक समितीसाठी ४ डिसेंबरला मतदान | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

पथारी व्यावसायिक समितीसाठी ४ डिसेंबरला मतदान
पथारी व्यावसायिक समितीसाठी ४ डिसेंबरला मतदान

पथारी व्यावसायिक समितीसाठी ४ डिसेंबरला मतदान

sakal_logo
By

पुणे,ता. १ : शहरातील पथारी व्यावसायिकांच्या समितीचा निवडणूक कार्यक्रम महापालिकेकडून जाहीर करण्यात आला आहे. त्यानुसार आठ सदस्यांच्या निवडीसाठी ४ डिसेंबरला मतदान होणार आहे. त्यासाठी ११ हजार ४२२ व्यावसायिकांची मतदार यादी अंतिम करण्यात आली आहे.

केंद्र सरकारने पथारी व्यावसायिकांसाठी निश्‍चित केलेल्या धोरणानुसार पथारी व्यावसायिकांची समिती स्थापन करण्यासाठी ८ सदस्यांची निवड मतदानाद्वारे करण्यात येणार आहे. त्यानुसार हा निवडणूक कार्यक्रम जाहीर केला असून मतपत्रिकेच्या माध्यमातून ४ डिसेंबरला क्षेत्रीय कार्यालयात उभारण्यात येणाऱ्या केंद्रांवर मतदान होणार आहे.

शहरामध्ये काही वर्षांपूर्वी करण्यात आलेल्या पथारी व्यावसायिकांच्या सर्वेक्षणामध्ये २२ हजार ८८९ व्यावसायिकांची बायोमेट्रीक नोंदणी करण्यात आली आहे. मतदारयादी अंतिम करताना प्रशासनाने पुन्हा सर्व व्यावसायिकांचे सर्वेक्षण केले. संघटनांच्या माध्यमांतूनही व्यावसायिकांना वेळोवेळी आवाहन करून त्यांचा व्यवसाय सुरू असल्याबाबतचे पुरावे सादर करावेत, असे आवाहन करण्यात आले होते. त्यावर १०५ व्यावसायिकांनी पुरावे दिल्यानंतर त्यांची पुरवणी यादी तयार करण्यात आली आहे.
बायोमेट्रीक नोंदणी असतानाही व्यवसाय करत नसल्याचे १० हजार ६७४, तर एकापेक्षा अधिक परवाने घेतलेले (दुबार) २६४ आणि प्रमाणपत्र रद्द केलेल्या १३८ व्यावसायिकांची नावे अंतिम मतदार यादीतून वगळण्यात आली आहेत, असे अतिक्रमण विभागाचे प्रमुख माधव जगताप यांनी सांगितले.


परवाने रद्द होणार

बायोमेट्रीक नोंद असतानाही जागेवर व्यवसाय करत नसलेल्या व्यावसायिकांचे परवाने रद्द करण्याबाबत पावले उचलण्यात येणार आहेत, असेही जगताप यांनी सांगितले. त्यामुळे केवळ नोंदणी केलेले परंतु व्यवसाय न करणाऱ्या पथारी व्यावसायिकांच्या अडचणी वाढणार आहेत.


असा आहे निवडणुकीचा कार्यक्रम
२ नोव्हेंबर - अंतिम मतदार यादी प्रसिद्ध करणे
२ आणि ३ नोव्हेंबर - नामनिर्देशन पत्राचे वाटप करणे
९ आणि १० नोव्हेंबर - नामनिर्देशन पत्र स्वीकारणे
११ नोव्हेंबर- नामनिर्देशन पत्रांची छाननी
१४ नोव्हेंबर - नामनिर्देशन पत्रावरील आक्षेप, हरकती स्वीकारणे
२१ नोव्हेंबर - नामनिर्देशन पत्र मागे घेणे
२२ नोव्हेंबर - अंतिम उमेदवारी यादी प्रसिद्ध करणे
४ डिसेंबर - मतदान
५ डिसेंबर - मतमोजणी (गणेश कला क्रिडा मंच)