अध्यात्माची गोडी मुलांच्या मुठीत! | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

अध्यात्माची गोडी मुलांच्या मुठीत!
अध्यात्माची गोडी मुलांच्या मुठीत!

अध्यात्माची गोडी मुलांच्या मुठीत!

sakal_logo
By

पुणे, ता. ३ ः हल्ली लहान मुलेही मोबाईलच्या आहारी गेलेली आहेत. जेवताना, झोपताना हातात मोबाईलवर काही तरी बघण्याची सवय मुलांना लागलेली आहे. अर्थात याला पालकही तितकेच जबाबदार आहेत. मोबाईलवर व्हिडिओ बघत मुल शांतपणे जेवते किंवा झोपी जाते व त्यामुळे आपलाही त्रास कमी होतो म्हणून पालकच मुलांना मोबाईलची सवय लावतात. मुलांच्या हातून आता हा मोबाईल जाण्याची चिन्हे दिसत नसल्याने याच मोबाईलच्या माध्यमातून मुलांना अध्यात्माची गोडी लावली तर...होय...हे शक्य आहे. कारण पुण्यातील ॲड. माधवी निगडे वेल्फेअर फाउंडेशन यासाठी पुढाकार घेतला आहे.
लहान मुलांना अध्यात्माची गोडी लागावी, वारकरी सांप्रदायिक संतांच्या चरित्राची माहिती व्हावी, या उद्देशाने फाउंडेशनतर्फे ‘माऊली’ या नावाचा आध्यात्मिक लघुपट (ॲनिमेटेड) तयार करण्यात आला आहे. पंढरपूरमध्ये उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते कार्तिकी एकादशीला शुक्रवारी (ता. ४) त्याचे लोकार्पण होणार आहे. नव्या पिढीपर्यंत संतांची उज्ज्वल परंपरा अपेक्षेप्रमाणे पोचत नाही. गेल्या काही वर्षांपासून कमी वयातील मुलेही मोबाईल, सोशल मीडियाच्या आहारी गेल्याचे चित्र आहे. या बाबींचा विचार करून मुलांना वारकरी सांप्रदायिक संतांची माहिती मुलांना व्हावी, त्यांचे विचार, चरित्रांमधून त्यांना जीवन अधिक सक्षमपणे जगता यावे, यासाठी पुण्यातील ॲड. माधवी निगडे वेल्फेअर फाउंडेशनने पुढाकार घेतला आहे. संतांच्या चरित्रातील प्रसंगांवर आधारित ॲनिमेटेड फिल्म सादर करण्याचा मनोदय व्यक्त केला आहे. त्यानुसार, हा उपक्रम हाती घेतला आहे.

काय आहे लघुपटात?
- वारकरी संप्रदायाचा पाया रचणाऱ्या श्री संत ज्ञानेश्वर महाराजांच्या चरित्रापासून सुरवात
- संत ज्ञानेश्वर महाराजांच्या चरित्रातील काही प्रसंगांची माहिती
- दोन भजने शांताराम महाराज निम्हण यांनी गायली आहेत
- लघुपट सहा मिनिटांचा आहे.

सध्याच्या काळात लहान मुलांनाही मोबाईलचे आकर्षण वाढत आहे. मात्र, अन्य काही गेम्स किंवा हाणामारीचे प्रसंग पाहण्यापेक्षा त्यांना संतांच्या चरित्रातील प्रसंगाची माहिती व्हावी, या उद्देशाने माऊली ही फिल्म प्रसारित करण्यात येणार आहे. या पुढील काळात वारकरी सांप्रदायातील एकूण तेरा संतांच्या चरित्रावर बाल लघुपट (ॲनिमेटेड) करण्यात येणार आहे.
- अॅड. माधवी निगडे, प्रमुख, माधवी निगडे वेल्फेअर फाउंडेशन