रिक्षा प्रमाणीकरणाचा प्रवास अवघड! | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Rickshaw
रिक्षा प्रमाणीकरणाचा प्रवास अवघड!

रिक्षा प्रमाणीकरणाचा प्रवास अवघड!

पुणे - रिक्षाची नवी दरवाढ लागू होऊन दोन महिने झाले. दोन महिन्यांत पुण्यातील केवळ ३२ हजार रिक्षांच्या मीटरचे प्रमाणीकरण (कॅलिब्रेशन) झाले. उर्वरित ५० हजार रिक्षांच्या मीटरच्या प्रमाणीकरणसाठी आरटीओने ३० नोव्हेंबरची मुदत दिली. या मुदतीत देखील प्रमाणीकरण होणे जवळपास अशक्य आहे. मीटरच्या प्रमाणीकरणाची पद्धत ही कालबाह्य व वेळखाऊ असल्याचा ठपका रिक्षा संघटनांनी ठेवला. परिणामी रिक्षा चालक मीटरचे प्रामाणीकरणास उत्सुक नाही. त्यामुळे केवळ दोन महिन्यांत केवळ ३२ हजार रिक्षांचे मीटर प्रमाणीकरण झाले. रिक्षा संघटनांनी ॲप आधारित दरपत्रक लागू करण्याची मागणी केली आहे.

पुण्यात १ सप्टेंबरपासून रिक्षांची नवी दरवाढ लागू झाली. दरवाढी लागू होताच मीटरचे प्रमाणीकरण करणे आवश्यक असते. यासाठी दोन महिन्यांचा वेळ दिला; मात्र त्याच्या पद्धतीला कंटाळून रिक्षा चालकांनी प्रमाणीकरणाकडे पाठ फिरवली. तर दरपत्रकाचा वापर करण्याकडे अधिक कल दिला आहे; मात्र दरपत्रकात दरात हस्तक्षेप करणे सोपे असते. त्यामुळे प्रवाशांची फसवणूक होण्याची शक्यता नाकारता येत नाही. मीटर प्रमाणीकरण न होण्याचे प्रमाण असेच वाढत राहिले तर रिक्षा चालक व प्रवासी यांच्यात दरावरून वाद होण्याची शक्यता अधिक आहे. त्यामुळे आता दिलेल्या मुदतीत तर मीटरचे प्रमाणीकरण होणे गरजेचे आहे. जोपर्यंत प्रमाणीकरण होत नाही, तोपर्यंत नवीन दराप्रमाणे भाडे आकारायचे नाही, हा नियम आहे; मात्र, अनेक रिक्षाचालक याचे उल्लंघन करतात. परिणामी प्रवासी व रिक्षाचालक यांच्यात वाद होतो.

कसे होते प्रमाणीकरण?

सर्वांत आधी मीटरमध्ये ‘भाडे’ संदर्भातले सॉफ्टवेअर अपलोड करावे लागते. त्यानंतर संबंधित कंपनीकडून प्रमाणपत्र दिले जाते. ते प्रमाणपत्र आरटीओच्या निरीक्षकांना दाखवावे लागते. त्यानंतर टेस्ट ट्रॅकवर मीटरसाठीची चाचणी होते. यावेळी रिक्षा २१०० मीटर धावते. त्याप्रमाणे मीटरचे रीडिंग बरोबर येते की नाही, हे आरटीओचे निरीक्षक तपासतात. त्यात काही बदल झाला तर निरीक्षक त्या टेस्टमध्ये रिक्षा चालकाला नापास करतात. त्यामुळे त्यांना पुन्हा चाचणी द्यावी लागते. यासाठी एक ते दोन दिवस लागतो. शिवाय यासाठी सुमारे सहाशे रुपयांचा खर्च येतो.

पुण्यातील रिक्षांची संख्या

  • एकूण रिक्षा : ८२ हजार

  • मीटर प्रमाणीकरण झालेल्या : ३२ हजार

  • मीटर प्रमाणीकरण न झालेल्या : सुमारे ५२ हजार

पाऊस व रिक्षा चालकांची प्रमाणीकरणासाठी असलेली अनुत्सुकता या दोन घटकांमुळे मिटर प्रमाणीकरणास उशीर लगत आहे. नोव्हेंबर महिन्यात दिलेली मुदतवाढ ही शेवटची आहे. ती पुन्हा दिली जाणार नाही. तेव्हा रिक्षा चालकांनी वेळेत प्रमाणीकरण पूर्ण करून घ्यावे.

- डॉ. अजित शिंदे, प्रादेशिक परिवहन अधिकारी, पुणे

पुणे आरटीओने मीटर प्रामाणीकरांची कालबाह्य पद्धत बंद करावी. मोबाईल ॲपच्या साह्याने रिक्षाचे भाडे ठरविता येते. नवीन तंत्रज्ञानाचा वापर करून एकावेळी सर्व मीटरचे प्रमाणीकरण करावे. म्हणजे रिक्षा चालकांचा वेळ वाचेल.

- नितीन पवार, सरचिटणीस, रिक्षा पंचायत, पुणे

टॅग्स :puneRickshawrates hike