MSRTC : शिवाजीनगर बसस्थानक मूळ जागीच होणार | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

MSRTC
मूळ जागीच उभारणार शिवाजीनगर बसस्थानक राज्य परिवहन महामंडळाची माहिती, मेट्रोकडून अद्याप दुजोरा नाही

MSRTC : शिवाजीनगर बसस्थानक मूळ जागीच होणार

पुणे : शिवाजीनगर बसस्थानकाच्या पूर्वीच्याच जागीच नवे बसस्थानक उभारण्याचे जवळपास निश्चित झाले आहे. या ठिकाणी होणाऱ्या मल्टी मॉडेल ट्रान्स्पोर्टेशन हबमुळे प्रवाशांना येथूनच एसटी, मेट्रो व रेल्वेने प्रवास करणे सोपे होणार आहे. त्याचा खर्च हा मेट्रो आणि एसटीकडून करण्यात येणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली. याबाबत एसटीकडून दुजोरा मिळाला असला, तरी कोणताही ठोस निर्णय झालेला नाही, असे मेट्रो प्रशासनाकडून सांगण्यात आले.

शिवाजीनगर बसस्थानकाबाबत निर्णय घेण्यासाठी बुधवारी राज्य परिवहन महामंडळ आणि मेट्रो प्रशासन यांच्यात मुंबईमध्ये बैठक झाली. या वेळी शिवाजीनगर बसस्थानक मूळ जागीच ठेवण्याचा तसेच त्याच्या उभारणीचा खर्च दोन्ही प्रशासनाने मिळून करण्याचा निर्णय झाला. यासाठी सुमारे ४५० कोटींचा खर्च अपेक्षित आहे.

तसेच येथे १० मजली कमर्शिअल कॉम्प्लेक्स उभारण्याचाही निर्णय झाल्याचे एसटीच्या विश्वसनीय सूत्रांनी सांगितले. शिवाजीनगर येथील मेट्रोच्या भूमिगत स्थानकासाठी शिवाजीनगर बसस्थानकाचे वाकडेवाडी येथे स्थलांतर करण्यात आले.

त्यावेळी शिवाजीनगर बसस्थानक पाडण्यात आले. आता मेट्रोचे काम झाले. परंतु बसस्थानक कोण बांधणार यावरून मेट्रो प्रशासन व एसटी प्रशासन यांच्यात वाद सुरू झाले. शिवाजीनगर बसस्थानक हे मूळ जागीच राहणार आहे. या जागेवरच १० मजली कमर्शिअल कॉम्प्लेक्सही बांधण्यात येणार आहे. यासाठी शशी प्रभू ही कन्सल्टन्सी नेमली असून, दोन आठवड्यांत शिवाजीनगर बसस्थानकाच्या जागेची पाहणी करून अहवाल देण्यात येणार आहे.

वाकडेवाडीची जागा आम्हालाच द्या!

राज्य परिवहन महामंडळाने शिवाजीनगर बसस्थानकासह वाकडेवाडी बसस्थानकही तसाच ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. वाकडेवाडीची ‘आरे’ची जागा एसटी प्रशासनालाच मिळावी, यासाठी राज्य सरकारकडे प्रस्ताव पाठविण्यात येणार आहे. वाकडेवाडीच्या जागेवरही डेपो उभारण्याची एसटीची योजना आहे.

'मेट्रोच्या अधिकाऱ्यांसोबत बैठक झाली. शिवाजीनगरचे बसस्थानक हे पूर्वीच्याच जागी उभारले जाईल. यासाठी कन्सल्टन्सी नेमली असून, १५ दिवसांत अहवाल मागवला आहे.

- शेखर चन्ने, उपाध्यक्ष तथा व्यवस्थापकीय संचालक, राज्य परिवहन महामंडळ, मुंबई '

एसटी प्रशासनासोबत बैठक झाली. विविध मुद्द्यांवर चर्चा झाली. मात्र काही ठोस निर्णय झालेला नाही. त्यामुळे आताच यावर अधिक काही बोलता येणार नाही.

- हेमंत सोनवणे, सरव्यवस्थापक, मेट्रो