बाजीराव, शिवाजी रस्त्यावर उद्यापासून पीएमपीची सेवा पूर्ववत | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

बाजीराव, शिवाजी रस्त्यावर उद्यापासून पीएमपीची सेवा पूर्ववत
बाजीराव, शिवाजी रस्त्यावर उद्यापासून पीएमपीची सेवा पूर्ववत

बाजीराव, शिवाजी रस्त्यावर उद्यापासून पीएमपीची सेवा पूर्ववत

sakal_logo
By

पुणे, ता. २ ः वाहतूक कोंडीचे कारण सांगत पीएमपी प्रशासनाने बाजीराव व शिवाजी रस्त्यावरील १२ मीटर लांबीची बससेवा बंद केली होती. मात्र याचा थेट परिणाम प्रवासी उत्पन्नावर झाल्याने अखेर पीएमपी प्रशासनाला हा निर्णय मागे घ्यावा लागला. शुक्रवार (ता. ४) पासून या रस्त्यावर धावणाऱ्या सात बस मार्ग सुरु केल्या जात आहेत. त्यामुळे प्रवाशांची तर सोय होईलच; शिवाय प्रवासी उत्पन्नही वाढणार आहे.

शहराच्या मध्यवर्ती भागातील बाजीराव रस्ता व शिवाजी रस्त्यावरील वाहतूक कोंडी कमी करण्याचे कारण सांगत पीएमपीने २८ जुलैपासून मार्गात बदल केला होता. यामुळे प्रवाशांची मोठी गैरसोय होत होती. प्रवाशांनी पीएमपीच्या या निर्णयावर टीका केली. ‘सकाळ’ने देखील हा निर्णय चुकीचा तसेच प्रवाशांच्या दृष्टीने गैरसोयीचा असल्याचे वृत्त प्रसिद्ध केले होते. आता शुक्रवारपासून कात्रज ते शिवाजीनगर, सहकारनगर ते संगमवाडी, स्वारगेट ते सांगवी, मार्केटयार्ड ते घोटावडे फाटा, न. ता. वाडी ते सहकारनगर, अप्पर डेपो ते सुतारदरा, मार्केटयार्ड ते पिंपरीगाव या मार्गांवरील बस डेक्कन, दांडेकर पूल, शास्त्री रस्ता या मार्गाने न धावता पूर्वीप्रमाणे बाजीराव व शिवाजी रस्त्यावरून धावणार आहेत. या सात मार्गांवरील ३१ बसच्या रोज सुमारे ३४४ फेऱ्या आता बाजीराव रस्त्याने होतील. त्यामुळे प्रवाशांना मोठा दिलासा मिळणार आहे.