वडगाव शेरीत भंगार मालाच्या गोदामाला आग | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

वडगाव शेरीत भंगार मालाच्या गोदामाला आग
वडगाव शेरीत भंगार मालाच्या गोदामाला आग

वडगाव शेरीत भंगार मालाच्या गोदामाला आग

sakal_logo
By

पुणे, ता. ३ : नगर रस्त्यावरील वडगाव शेरी परिसरात एका भंगार मालाच्या गोदामाला गुरुवारी दुपारी आग लागली. या आगीत प्लास्टिक साहित्य, टाकाऊ वस्तू जळून भस्मसात झाल्या. अग्निशमन दलाच्या जवानांनी तासाभरात आग आटोक्यात आणली. सुदैवाने या घटनेत कोणी जखमी झाले नाही. आगीचे कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही.

गोदामातील साहित्य पेटल्याने मोठी आग भडकली. त्यामुळे परिसरात मोठ्या प्रमाणावर धूर पसरला होती. आगीमुळे गोदामातील स्वयंपाकाच्या गॅस सिलिंडरचे स्फोट झाल्याने परिसरात घबराट निर्माण झाली होती. या घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दल तसेच पुणे महानगर क्षेत्र विकास प्राधिकरणाचे बंब, टँकर अशा १५ गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या. अग्निशमन दलातील आठ अधिकारी आणि ५० जवानांनी तातडीने आग आटोक्यात आणण्यासाठी प्रयत्न सुरू केले.

जवानांनी पाण्याचा मारा करून तासाभरात आग आटोक्यात आली. गोदामातील प्लास्टिकच्या वस्तू, लोखंडी माल, डबे, भांडी तसेच अन्य साहित्य जळाले. आतमध्ये कोणी कामगार अडकला नसल्याची माहिती गोदाम मालकाने दिली. गोदामात भंगार माल असल्याने आग धुमसत होती. त्यामुळे सुरक्षेचा उपाय म्हणून अग्निशमन दलाचे जवान तेथे थांबले होते. आग पूर्णपणे आटोक्यात आणण्यासाठी किमान दोन ते तीन तास लागले, असे पुणे अग्निशमन दलाचे प्रमुख देवेंद्र पोटफोडे यांनी सांगितले.

कोंढव्यात रुग्णालयात आग

कोंढवा बुद्रूक भागातील डॉ. आंबेडकर चौक परिसरात असलेल्या धन्वंतरी क्लिनिक येथे गुरुवारी पहाटे आग लागली. रुग्णालयात कोणी नसल्याने अनर्थ टळला. या आगीत रुग्णालयातील फर्निचर, औषधे, कागदपत्रे तसेच अन्य साहित्य जळाले. या घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलाचे जवान रवींद्र हिवरकर, योगेश पिसाळ, किशोर मोहिते, रफिक शेख, प्रथमेश निकम आदींनी घटनास्थळी धाव घेऊन दहा मिनिटांत आग आटोक्यात आणली.