स्वागत दिवाळी अंकाचे | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

स्वागत दिवाळी अंकाचे
स्वागत दिवाळी अंकाचे

स्वागत दिवाळी अंकाचे

sakal_logo
By

१) संवादसेतू

दिवाळीचा प्रसन्न मूड जागता ठेवत विविध कलांशी, कलाकृतींशी आणि जाणीवजागृतीच्या प्रयत्नांशी ‘सेतू’ जोडणारा दिवाळी अंक - अशी ओळख ‘संवादसेतू’ दिवाळी अंकाने अल्पावधीत निर्माण केली आहे. साहित्य आणि ललित कलांचा विविधांगी अनुबंध उलगडण्याचा प्रयत्न उल्लेखनीय आहे. ज्येष्ठ चित्रकार रवी परांजपे यांनी रेखाटलेले प्रसन्न मुखपृष्ठ लक्षवेधक आहे. जन्मशताब्दी वर्षाचे औचित्य साधणारे जीए कुलकर्णी, दिलीपकुमार, शंकर रामाणी यांच्यावरील लेख उत्तम आहेत. कथा या साहित्यप्रकाराची आवर्जून नोंद घेत ६ स्वतंत्र आणि ३ अनुवादित कथांचा नजराणा ‘संवादसेतू’मधून वाचकांच्या भेटीस आला आहे. राजहंस प्रकाशनाचे दिलीप माजगावकर यांच्यावरील विशेष लेख आवर्जून वाचावा, असा जमून आला आहे. व्यंगचित्रांवरील रोचक लेख, ललितलेख, अभ्यासलेख, प्रवासलेखही लक्षवेधक आहेत. यंदा ‘संवादसेतू’ने नाशिकचे ज्येष्ठ लेखक बा. अ. शुक्ल यांच्या स्मृत्यर्थ राज्यस्तरीय विनोदी कथास्पर्धा शुक्ल कुटुंबीयांच्या सहकार्याने आयोजित केली होती. त्यातील सर्वोत्तम विनोदी कथांचा समावेशही अंकात आहे. कथास्पर्धेच्या परीक्षक ज्येष्ठ लेखिका मंगला गोडबोले यांचा लेखही चिंतनीय आहे.
संपादक ः डॉ. वंदना बोकील कुलकर्णी, पृष्ठे - १८४, मूल्य ः २५० रुपये

२) साहित्य स्वानंद
प्रसिद्ध साहित्यिकांच्या दर्जेदार साहित्याबरोबर नवोदितांच्या कसदार व वेगळी धाटणी असलेल्या खमंग साहित्याचा फराळ ‘साहित्य स्वानंद’ या दिवाळी अंकात वाचकांसाठी निश्चित आत्मानंद देणारा आहे.
‘आजची आव्हाने ! बदलणारे विद्यार्थीपणा’ हा प्रा. प्रवीण दवणे, ‘माझी लग्नगाथा’ हा मानसी चिटणीस, तसेच ‘संत साहित्यातील देखणे विद्यापीठ’ हा श्रीकांत चौघुले आदींचे लेख वाचनीय आहेत. ‘अभिनयसम्राट दिलीपकुमार’ हा प्रदीप गांधलीकर यांनी दिलीपकुमार यांच्या जन्मशताद्धीनिमित्त लिहिलेला लेख दिलीपकुमार यांचा जीवनपट उलगडून दाखवतो. डॉ. अशोक कामत, डॉ. न. म. जोशी, डॉ. विजया वाड, आशा पाटील, घनश्याम पाटील, सदानंद भणगे, संजय ऐलवाड, संदीपान पवार या लेखकांचे वैचारिक लेख समृद्ध करून जातात.
‘काव्यरंग’ मधील कविता वाचकांना अंर्तमुख करतात. प्रकाश वर्मा यांची मार्मिक व्यंगचित्रे सद्यपरिस्थितीवर बरेच काही बोलून जातात.
संपादक : महादेव कोरे, मूल्य : १२०, पृष्ठे : ९६
------------------------

३) अंतरीचे प्रतिबिंब
वैविध्यपूर्ण विषय आणि चालू घडामोडींशी सांगड हे ‘अंतरीचे प्रतिबिंब’ या दिवाळी अंकातील लेखांचे वैशिष्ट्य आहे. अंकात शाश्वत अशा सौर ऊर्जेवर विशेष विभाग असून त्यात १८ तज्ज्ञांनी मार्गदर्शन केले आहे. कुमार केतकर, जयदेव डोळे, हेमंत देसाई, चंद्रहास मिरासदार, मंजिरी मराठे यांनी राजकीय विषयांवरील लेखनातून वेगळा दृष्टिकोन दाखवून दिल आहे. लता मंगेशकर यांना बाबू मोशाय यांनी तर प्रदीप भिडे यांना डॉ. केशव साठे यांनी श्रद्धांजली वाहिली आहे. नितीन सप्रे, मुकुंद कुळे आदींनी व्यक्तिचित्रणे रंगविली आहेत. कोरोनामुळे वैद्यकीय क्षेत्राबाबत नागरिक सजग झाले आहे. बरे वाटत नसल्यास कधी कोणत्या आरोग्य तपासण्या करायला हव्यात या विषयावर डॉ. कल्पना भांगे यांनी मार्गदर्शन केले आहे.क्रीडा विभागात पराग फाटक आणि ज्ञानेश भुरे यांनी विक्रमी कामगिरी केलेला टेनिसपटू रॉजर फेडरर याच्या कारकिर्दीचा वेध घेतला आहे. नंदन बाळ यांनी त्यांच्या टेनिसमधील प्रवास कथन केला आहे. रशियन सौंदर्यवती टेनिसपटू ॲना कुर्निकुव्हावरील ‘ती सध्या काय करते?’ हा प्रशांत केणी यांचा लेख वाचनीय आहे. यंदाच्या अंकात कथा विभागाची व्याप्ती वाढविलेली आहे.

संपादक ः प्रज्ञा जांभेकर
पृष्ठे ः २१८
मूल्य ः ३०० रुपये
--------------------
४) ज्योतिष तंत्र आणि मंत्र

गेल्या ४५ वर्षांपासून प्रकाशित होणारा हा अंक प्राचीन भारतीय
ज्ञानाचा भाग असलेल्या ज्योतिष विद्येला वाहिलेला आहे. गौरी केंजळे यांचा ‘पंचपक्षी ज्योतिषशास्त्र’, आनंद साने यांचा ‘लक्ष्मीप्राप्तीसाठी दिवाळीत करावयाचे तोडगे’, सुबोध पाटणकर यांचा ‘नक्षत्र’, डॉ. जयश्री देशपांडे यांचा ‘नोकरी कधी मिळेल ?’, प्रदीप पंडित यांचा ‘रत्न आणि धातू, डॉ. रमेश वायगावंकर यांचा ‘नवमांश वर्ग’, अजित झरेकर यांचा ‘मनाचा कारक चंद्र’, शरद पायगुडे यांचा ‘संतुलित सप्तचक्र’, डॉ. ज्योती जोशी यांचा ‘शुक्राचा नियभंग कोणते ग्रह करू शकतात ?’, नरेंद्र पंड्या यांचा ‘शुक्र प्रदोष व्रत परिचय एवं विस्तृत विधी’, डॉ. सविता महाडीक यांचा ‘आगामी वर्षाचे ग्रहयोग’, जयंत झरेकर यांचा ‘शाबरी विद्या : एक कल्पतरू’, सुधाकर नातू यांचा ‘जन्मपत्रिकेचा चिकित्सक अभ्यास’ आदीची माहिती या अंकातून मिळते.
संपादक : चंद्रकांत शेवाळे
पृष्ठे : १८४
मूल्य : ३००
फोटोः ०२६५२
---------------------
५) आरोग्य ज्ञानेश्वरी
-----------------
यंदाचा अंक बालसंगोपन विशेषांक आहे. बाळ दोन वर्षांचे होईपर्यंत व त्यानंतर त्याची काळजी कशी घ्यावी, याबद्दल सविस्तर माहिती या अंकात वाचायला मिळते. डॉ. चित्रा दाभोलकर यांनी यावर विशेष लेख लिहिले आहेत. त्याचबरोबर राष्ट्रीय आहार नितीतील महत्त्वाचे भाग यात दिले आहेत. त्याचबरोबर डॉ. हेमंत जोशी व डॉ. अर्चना जोशी लिखित मुलामुलींचे वाढीचे आधारकार्ड, लसीबद्दल सर्व काही, रोज शेकडो नवशिशू वाचवा, उष्टावन का करावे ?, नवजात बाळांवर दया करा, सुखी निरोगी सर्वोत्तम व्हायचंय ? योग शिका तसेच, आरोग्य सैनिक होऊ या, विवेकानंदांच्या मनाची एकाग्रता व ध्यान असे अनेकविध माहितीपर लेख या अंकात वाचायला मिळतात. अंकाचा शेवट हा हितोपदेश व पंचतंत्रातील गोष्टी व कृष्ण कथा यांनी होतो.
संपादक : डॉ. रेणुका हिंगणे, डॉ. विनायक हिंगणे, डॉ. अर्चना जोशी, डॉ. राजेंद्र आगरकर, डॉ. हेमंत जोशी
पृष्ठे : १२०
मूल्य : २५०
फोटोः ०२६५१
---------------------------------
६) सीआरआय कथा
मराठी भाषेतील क्रिकेट विषयक एकमेव दिवाळी अंक म्हणजे ‘सीआरआय कथा’. या दिवाळी अंकाचे हे दुसरे वर्ष आहे. यामध्ये काही माहितीपूर्ण लेख, आठवणी, विश्लेषण, मुलाखती, खेळाडूंचे किस्से व गप्पा गोष्टी आहेत. या अंकासाठी भारत, ऑस्ट्रेलिया, अमेरिका आणि कॅनडा येथील लेखकांनी लेखन केले आहे. मराठीतील ज्येष्ठ क्रिकेट समीक्षक द्वारकानाथ संझगिरी यांचे मनोगत आहे. भारतीय १९ वर्षांखालील संघाचा प्रशिक्षक हृषिकेश कानिटकर यांची मुलाखत आहे. कॉमनवेल्थ खेळांमध्ये पहिल्यांदाच महिला क्रिकेटचा समावेश करण्यात आला. या क्रिकेट स्पर्धेसाठी इंग्लंडला गेलेल्या अभिजित देशमुख यांचा आढावा वाचायला मिळतो. भारताच्या राष्ट्रीय संघात अष्टपैलू खेळाडू म्हणून ओळखले जाणारे शार्दूल ठाकूर यांच्या प्रवासाबद्दल त्यांचे वडील नरेंद्र ठाकूर यांची मुलाखत आहे. जितेंद्र शेंडे हे रमाकांत आचरेकरांची क्रिकेट प्रेमींना आठवण करून देतात. भारतीय क्रिकेटमध्ये सामनाधिकारी म्हणून काम केलेले सत्यजित सातभाई, आंतरराष्ट्रीय क्रिकेट पंच विनीत कुलकर्णी यांचे अनुभव वाचनीय आहेत.
संपादक : कौस्तुभ चाटे
पृष्ठे : ११२
मूल्य : २५०
फोटोः ०२६४९