नव्या मराठी नाटकांची मेजवानी | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

नव्या मराठी नाटकांची मेजवानी
नव्या मराठी नाटकांची मेजवानी

नव्या मराठी नाटकांची मेजवानी

sakal_logo
By

पुणे, ता. ३ : कोरोनानंतर आधी निम्म्या आणि नंतर पूर्ण आसन क्षमतेने खुली झालेली नाट्यगृहे चांगलीच गर्दी खेचू लागली आहे. शनिवारी (ता. ५) मराठी रंगभूमी दिन साजरा करणाऱ्या रंगकर्मी व नाट्यरसिकांचा आनंद द्विगुणित करणारी वर्दी काही नाट्यसंस्थांनी दिली आहे. लवकरच अनेक नव्या मराठी नाटकांची मेजवानी मिळणार आहे.
प्रसिद्ध दिग्दर्शक विजय केंकरे म्हणाले, ‘‘कोरोना काळात ‘ओटीटी’सारख्या डिजिटल मंचावर लोकांनी पाहिलेल्या विषयांमुळे त्यांची अभिरुची बदललेली जाणवते. रहस्य, रोमांचाकडे प्रेक्षकांचा वाढता ओढा लक्षात घेऊन नव्या नाटकांमध्येही तसे प्रयोग केले जात आहेत. मी सध्या तीन नवी नाटकं बसवतो आहे. ‘यू मस्ट डाय,’ ‘काळी राणी’ व ‘मर्डरवाले कुलकर्णी’ ही तिन्ही रहस्यप्रधान नाटकं असली तरी प्रत्येकाची धाटणी वेगळी आहे. बालसाहित्य व बालनाटकांसंबंधीचे उपक्रम छोट्या गावांमध्येही जोम धरू लागल्याचे चित्रही आशादायक आहे. मला दिसणारा मोठा बदल म्हणजे मराठी नाटकं लिहिणाऱ्या लेखिकांची संख्या वाढते आहे. त्यांचं लिखाण मराठी रंगभूमीची संवेदनक्षमता समृद्ध करणारे आहे.’’
नाट्यनिर्माते दिलीप जाधव यांनी सांगितले की, अशोक सराफ यांची प्रमुख भूमिका असलेले ‘मर्डरवाले कुलकर्णी’ हे नवीन नाटक निखळ मनोरंजनाचा आनंद देणारे ठरेल. ‘जाऊ बाई जोरात’च्या दुसऱ्या भागाची तयारी सुरू आहे. ते सध्याच्या राजकीय परिस्थितीवर भाष्य करणारे आहे.’’
पुण्यातील नाट्य व्यवस्थापक प्रवीण बर्वे म्हणाले, ‘‘बरीच नवीन मराठी नाटकं या व पुढील महिन्यात रंगमंचावर येणार आहेत. ‘चर्चा तर होणारच,’ ‘करायचं प्रेम तर मनापासून,’ ‘मास्टर माईंड,’ ‘संभ्रम’ यांसारख्या नवीन नाटकांसोबतच ‘ती परी अस्मानीची’ हे बालनाट्यही लवकरच येणार आहे. ‘चारचौघी’सारखे जुने लोकप्रिय नाटक नव्या संचात गर्दी खेचत आहे. ‘संगीत अवघा रंग एक झाला’ हे जुने नाटकही नव्याने यायला सज्ज होत आहे.