दिवसा उन्हाचे चटके अन् पहाटे गारठा | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

दिवसा उन्हाचे चटके अन् पहाटे गारठा
दिवसा उन्हाचे चटके अन् पहाटे गारठा

दिवसा उन्हाचे चटके अन् पहाटे गारठा

sakal_logo
By

पुणे, ता. ३ ः शहर आणि परिसरात दिवसा उन्हाचे चटके आणि पहाटे व रात्री गारठा जाणवू लागला आहे. शहरातील किमान तापमानात सरासरीपेक्षा घट कायम असून किमान तापमानात आठवड्याभरात काहीसा चढ-उतार राहण्याची शक्यता हवामानशास्त्र विभागाने वर्तवली आहे.
शहरात गुरुवारी १३.१ अंश सेल्सिअस किमान तापमानाची नोंद झाली. राज्यातील नीचांकी तापमानाची नोंद गुरुवारी पुण्यात झाली. सरासरीच्या तुलनेत किमान तापमानात २ अंशांनी घट झाली. दरम्यान कमाल तापमान सरासरीच्या जवळपास नोंदले गेले. कोरडे हवामान आणि उत्तरेकडून येणाऱ्या थंड वाऱ्यांच्या प्रवाहामुळे गारठ्याची अनुभूती होत आहे. कडाक्याच्या थंडीची प्रतिक्षा असली तरी गारठा चांगलाच जाणवू लागला असल्याने उपनगरातील काही भागांमध्ये रात्रीच्या वेळी थंडीपासून बचाव करण्यासाठी शेकोट्या पेटू लागल्या आहेत. पहाटे व्यायामासाठी बाहेर पडलेले नागरिक स्वेटर, जॅकेट, मफलर, कानटोपी वापरताना दिसत आहेत. असे असले तरी शहर व परिसरातील किमान तापमानातील चढ-उतार कायम राहणार असून तापमान १४ ते १८ अंशांच्या दरम्यान नोंदले जाऊ शकते.
मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि कोकणातील बऱ्याच ठिकाणी गुरुवारी कमाल तापमान हे सरासरीच्या जवळपास नोंदले गेले. तर राज्यातील बहुतांश भागात किमान तापमानात काहीशी वाढ झाली होती. बऱ्याच भागात किमान तापमान हे १५ अंशांच्या वर तर कोकणात २० अंशांच्यावर होते.
सध्या दक्षिण तमिळनाडू आणि परिसरावर चक्राकार वाऱ्यांची स्थिती कायम असून या प्रणालीपासून केरळ ते लक्षद्वीपपर्यंत हवेचा कमी दाबाचा पट्टा सक्रिय आहे. त्यात नैऋत्य बंगालच्या उपसागरावर चक्राकार वाऱ्यांची स्थिती तयार झाली आहे. तर राज्यात तापमानात होणारे चढ-उतार असेच कायम राहू शकते, असे हवामानशास्त्र विभागाने नमूद केले.