मुलाखत | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

मुलाखत
मुलाखत

मुलाखत

sakal_logo
By

प्रख्यात नाटककार, दिग्दर्शक व अभिनेते डॉ. सतीश आळेकर तसेच ते ललित कला केंद्राचे संचालक असताना त्यांची विद्यार्थिनी असलेली मुक्ता बर्वे, या गुरू-शिष्यांनी मराठी नाट्यसृष्टीत आगळावेगळा ठसा उमटवला आहे. रंगभूमी दिनानिमित्त या दोघांशी बातचीत...

नागर रंगभूमी हे महाराष्ट्राचं वैभव!

प्रश्न : पाच दशकांहून अधिक काळ आपण कार्यरत आहात. नाटकांच्या आजच्या स्थितीबद्दल काय वाटतं?
आळेकर : नाटक ही जिवंत कला आहे. तिच्याशी रसिकांचं नातं उत्कट असतं. समांतर व व्यावसायिक या दोन्ही प्रकारच्या नाटकांना रसिक लाभतात. या दोन्ही प्रकारच्या नाटकांत नवे प्रयोग यशस्वी करणारे उत्तम लेखक, दिग्दर्शक व कलावंत बघायला मिळतात. कोविड काळात डिजिटल मंचाचा राक्षस जरी होता, तरी परंपरागत रंगभूमीला मरण नाही. नागर रंगभूमी हे इतर राज्यांच्या तुलनेत महाराष्ट्राचं वैभव आहे. १९९० नंतर दिग्दर्शकही महत्त्वाचा झाला. इतर घटकही दमदार झाले. पुन्हा नव्याने नाटकांना दिसू लागलेला मोठा प्रतिसाद, हे सुचिन्ह आहे.

प्रश्न : महापूर, महानिर्वाण, बेगम बर्वे यांसारख्या नाटकांमधून आपण सामाजिक रूढी, परंपरांवर विनोदाच्या अंगाने तिरकस भाष्य केलं. यामागे काय भूमिका होती?
आळेकर : मी लिहिलेली नाटकं लोकप्रिय नसली तरी प्रेक्षकांनी स्वीकारली. बदलत जाणारा काळ पाहिला. आर्थिक पातळीवर जागतिकीकरणाचा परिणाम दोन पिढ्यांत दिसला. ते मी मांडायचा प्रयत्न केला. नाटक ही एकल कला नसून सामूहिक स्वरूपाची आहे. नाटककाराने लिहिलेली संहिता रसिकांपर्यंत पोहोचवण्याच्या प्रक्रियेत संक्रमण होत जातं. नाटकाचं व्याकरण प्रवाही असतं. नाटकांसंबंधी दोन संस्थांच्या उभारणीत माझा सहभाग होता. थिएटर अॅकेडमी व सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचं ललित कला केंद्र. या केंद्राच्या अभ्यासक्रमाची बांधणी केली. येथील विद्यार्थ्यांपैकी अनेकांचं त्यांच्या कलागुणांमुळे नाव झालं. मुक्ता बर्वे ही तर होतकरू कलावंतांसाठी रोल मॉडेल ठरली आहे.

चौकट
पाच नोव्हेंबर मराठी रंगभूमी दिन. १८४३ मध्ये विष्णुदास भावे यांनी ‘सीता स्वयंवर’ हे पहिले मराठी नाटक रंगभूमीवर आणून मराठी रंगभूमीची मुहूर्तमेढ रोवली. या घटनेच्या गौरवार्थ १९४३ मध्ये ५ नोव्हेंबर रोजी सांगलीत राज्यभरातून जमलेल्या नाट्यकर्मींनी शताब्दी महोत्सव केला. त्यात मराठी नाट्य संमेलन आयोजित करण्यात आले होते. तेव्हापासून आजच्या तारखेला मराठी रंगभूमी दिन साजरा केला जातो. सांगलीतील अखिल महाराष्ट्र नाट्य विद्या मंदिर समितीकडून १९६० पासून, मराठी रंगभूमीवर दीर्घकाळ सेवा करणाऱ्या ज्येष्ठ रंगकर्मीला ‘विष्णुदास भावे गौरवपदक’ देऊन सन्मानित करण्यात येते. यंदाच्या रंगभूमी दिनी ज्येष्ठ नाटककार, दिग्दर्शक व अभिनेते डॉ. सतीश आळेकर यांना हा मान मिळणार आहे.

------------------------------------------
रसिकांना नाटकं जवळची वाटतात

प्रश्न : गेल्या दोन दशकांच्या लक्षवेधी कारकिर्दीत तू चित्रपट व मालिकाही अनेक केल्या. यात नाट्यशिक्षण व आळेकरांच्या मार्गदर्शनाचं योगदान नक्कीच असेल.
मुक्ता : सरांनी प्रत्येक विद्यार्थ्याची ताकद कशात आहे, ते ओळखून त्याबाबत मशागत करायला प्रोत्साहन दिलं. संचालक व शिक्षक असले तरी त्यांनी आम्हाला एकाच साच्यात बंदिस्त न करता रंगभूमीच्या विविध घटकांचं भान दिलं. आपल्या क्षमता विकसित करून पाय घट्ट रोवून उभं राहण्याची ताकद दिली. कलेची व्यावसायिक बाजू कमी न लेखता दर्जेदार काम करण्याची मानसिकता वाढवली. उत्तम कलावंत होण्यासाठी उत्तम माणूस होण्याची जाण दिली. अभिनेत्री ते निर्माती होईपर्यंतच्या माझ्या वाटचालीचा सरांना अभिमान वाटला.

प्रश्न : कोविडनंतर मराठी नाटकांना कसा प्रतिसाद आहे?

मुक्ता : सहा वर्षांपूर्वी नाटकांना उदंड प्रतिसाद नव्हता. कोविडकाळात लोकांनी टीव्हीच्या पडद्यावर राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय स्वरूपातील बऱ्याच कलाकृती पाहिल्या. पण त्यात नाटकासारखी कलावंत व रसिकांमध्ये देवाणघेवाण नव्हती. जिवंतपणा नसलेल्या अशा कलाकृती मोठ्या प्रमाणात पाहिल्याने त्या अंगावर आल्यासारख्या जाणवल्या. त्यातून बाहेर पडायला आतुर रसिक नाटक किंवा संगीताच्या मैफलींमध्ये जिवंतपणा अनुभवायला गर्दी करताना आता दिसतात. पूर्वीच्या व आताच्या नाटकांमध्ये तंत्रात्मक फरकही जाणवतो. तंत्रज्ञानाची जोडही चांगला परिणाम साधायला मदत करते आहे.

डॉ. सतीश आळेकर यांच्याशी हृद्य संवाद साधताना मुक्ता बर्वे.----------02868