भारतीय सैन्यदलाद्वारे पाच प्रकल्पांना मान्यता | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Indian Army
भारतीय सैन्यदलाद्वारे ५ प्रकल्पांना मान्यता

भारतीय सैन्यदलाद्वारे पाच प्रकल्पांना मान्यता

पुणे : देशात आत्मनिर्भर भारत या संकल्पनेअंतर्गत विविध क्षेत्रात तंत्रज्ञान, उत्पादने, प्रणाली विकसित करण्यावर भर दिला जात आहे. त्यात स्वदेशी तंत्रज्ञानाचा वापर करत उत्पादनांच्या निर्मितीसाठी सैन्यदलाद्वारे मेक-२ श्रेणीतील पाच प्रकल्पांना मान्यता देण्यात आली आहे. त्यामुळे आत्मनिर्भर वाटचालीकडे एक मोठा पाऊल पडला आहे.

मेक २ प्रकल्पाअंतर्गत उत्पादनाच्या विकासासाठी भारतीय उद्योगांच्या माध्यमातून डिझाइन, विकास आणि नावीन्यपूर्ण उपायांचा त्यात समावेश आहे. यामुळे सूक्ष्म, लघु व मध्यम उद्योग (एमएसएमई), स्टार्टअपला संधी मिळत आहे.

दरम्यान, उत्पादनाच्या विकासानंतर यशस्वी चाचणी प्रक्रिया पूर्ण झाल्यावर अपेक्षित संख्येमध्ये त्या उत्पादनाची मागणी नोंदवण्यात येते. सैन्यदलाद्वारे मान्यता मिळालेल्या प्रकल्पांमध्ये हाय फ्रिक्वेंसी मॅन पॅक्ड सॉफ्टवेअर डिझाईन रेडिओ (एचएफएसडीआर), ड्रोनला विरोधी यंत्रणा, इन्फंट्री ट्रेनिंग वेपन सिम्युलेटर (आयडब्‍ल्यूटीएस), मध्यम पल्ल्याची अचूक मारा करणारी प्रणाली (एमआरपीकेएस) आणि १५५ एमएम टर्मिनली गाइडेड म्युनिशन (टीजीएम) यांचा समावेश आहे.

संरक्षण क्षेत्रात स्वदेशी तंत्रज्ञान, शस्त्रप्रणाली, डिझाइन आणि उत्पादनाला चालना देण्यासाठी मेक-२ खरेदी योजनेची सुरवात करण्यात आली आहे. सध्या लष्कराच्या ४३ पैकी २२ प्रकल्प प्रोटोटाइप डेव्हलपमेंट टप्प्यात आहेत.

अशी असेल सैन्यदलाची मागणी

  • एचएफएसडीआर उत्पादन नमुन्यांच्या यशस्वी विकासानंतर

  • ३०० एचएफएसडीआर खरेदी करण्याचे नियोजन

  • ड्रोन विरोधी यंत्रणेच्या ३५ संचाच्या खरेदीसाठी १८ विकसनशील संस्थांना प्रकल्प मंजुरी आदेशांना मान्यता

  • आयडब्ल्यूटीएसच्या १२५ संचाच्या खरेदीसाठी ४ एजन्सींना मंजुरी

  • हवाईदल एमआरपीकेएसचे १० संच खरेदी करेल

टॅग्स :Pune Newsindian armyArmy