‘राज्यसेवा पूर्व’चा निकाल जाहीर मुख्य परीक्षा जानेवारी महिन्यात; पात्र उमेदवारांची यादी संकेतस्थळावर | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

‘राज्यसेवा पूर्व’चा निकाल जाहीर
मुख्य परीक्षा जानेवारी महिन्यात; पात्र उमेदवारांची यादी संकेतस्थळावर
‘राज्यसेवा पूर्व’चा निकाल जाहीर मुख्य परीक्षा जानेवारी महिन्यात; पात्र उमेदवारांची यादी संकेतस्थळावर

‘राज्यसेवा पूर्व’चा निकाल जाहीर मुख्य परीक्षा जानेवारी महिन्यात; पात्र उमेदवारांची यादी संकेतस्थळावर

sakal_logo
By

पुणे, ता. ४ : महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत २१ ऑगस्ट रोजी घेतलेल्या राज्यसेवा पूर्व परीक्षेचा निकाल आयोगाच्या संकेतस्थळावर शुक्रवारी जाहीर करण्यात आला. या परीक्षेतून मुख्य परीक्षेसाठी पात्र ठरलेल्या उमेदवारांच्या नावांची यादी आणि गुणांची सीमारेषा आयोगाच्या ‘https://mpsc.gov.in’ या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आली आहे. आयोगाच्या वतीने ‘राज्यसेवा मुख्य परीक्षा’ ही २१, २२ आणि २३ जानेवारी २०२३ रोजी घेण्यात येणार आहे.

राज्य सरकारच्या विविध विभागांतर्गत विभिन्न संवर्गातील एकूण १६१ पदांवरील भरतीसाठी आयोगामार्फत राज्यातील ३७ जिल्हा केंद्रांवर ही परीक्षा झाली. सहायक संचालक (वित्त व लेखा सेवा), मुख्याधिकारी नगरपालिका/परिषद (गट-अ), बाल विकास प्रकल्प अधिकारी, सहायक आयुक्त, उपअधीक्षक (राज्य उत्पादन शुल्क, गट-ब), कक्ष अधिकारी (गट-ब), सहायक प्रादेशिक परिवहन अधिकारी (गट-ब) या पदांसाठी ही परीक्षा घेण्यात आली.

पूर्व परीक्षेसाठी उमेदवारांनी ऑनलाइन पद्धतीने केलेल्या अर्जात दिलेल्या माहितीच्या आधारे त्यांच्या पात्रता तपासण्याच्या अटीनुसार आणि पूर्व परीक्षेच्या निकालाच्या आधारे मुख्य परीक्षेस पात्र ठरलेल्या उमेदवारांची नावे बैठक क्रमांकासह जाहीर करण्यात आली. दिलेल्या कालावधीत अर्ज करणाऱ्या आणि परीक्षा शुल्क भरणाऱ्या पात्र उमेदवारांनाच मुख्य परीक्षेस प्रवेश देण्यात येणार आहे. पूर्व परीक्षेच्या आधारे मुख्य परीक्षेच्या प्रवेशासाठी पात्र ठरलेल्या उमेदवारांना त्यांनी अर्जात नमूद केलेल्या भ्रमणध्वनी क्रमांकावर एसएमएसद्वारे कळविण्यात आले आहे. मुख्य परीक्षेच्या प्रवेशासाठी पात्र उमेदवारांनी ऑनलाइन पद्धतीने आवश्यक माहिती व परीक्षा शुल्क दिलेल्या मुदतीत सादर करणे आवश्यक आहे. त्याशिवाय उमेदवारास मुख्य परीक्षेच्या प्रवेशासाठी पात्र समजण्यात येणार नाही, असे आयोगाने स्पष्ट केले आहे.