अभ्यासक्रम उरकायचाय..?? शिकवा घाईने | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Education News
अभ्यासक्रम उरकायचाय..?? शिकवा घाईने वेळापत्रक कोलमडल्यामुळे विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक भविष्याशी तडजोड

अभ्यासक्रम उरकायचाय..?? शिकवा घाईने

पुणे : ‘‘सॉरी, मी नोट्स लिहून देऊ शकत नाही. मला कल्पना आहे की, मी भरभर शिकवतेय. पण माझ्यापुढेही पर्याय नाही. मला सिलॅबस लवकर संपवायचा आहे,’’ पुण्यातील एका महाविद्यालयातील प्राध्यापिकेने विद्यार्थ्यांना दिलेले हे उत्तर. शैक्षणिक वेळापत्रक कोलमडल्यामुळे सध्या अनेक महाविद्यालयांत अशी भीषण अवस्था निर्माण झाली आहे.

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे शैक्षणिक वेळापत्रक कोलमडले असून, पदवी परीक्षांचे निकालही उशिराने लागले आहेत. त्यामुळे बहुतेक महाविद्यालयांत पदव्युत्तर अभ्यासक्रमांचे प्रथम वर्ष दिवाळीनंतर सुरू झाले.

त्यात लवकरच येणाऱ्या सत्र परीक्षांमुळे अभ्यासक्रम जलदगतीने संपविण्याची घाई प्राध्यापकांनी केली असून, यात विद्यार्थ्यांचे मोठ्या प्रमाणावर शैक्षणिक नुकसान होत आहे. विज्ञान शाखेत पदव्युत्तर शिक्षण घेणारी विद्यार्थिनी सांगते, ‘‘सप्टेंबरच्या शेवटच्याच आठवड्यात आमचे प्रवेश झाले. मात्र प्रत्यक्ष वर्ग दिवाळीनंतर सुरू झाले.

एकतर उशिराने महाविद्यालये सुरू केली, त्यात आता अभ्यासक्रम वेगाने शिकवत आहे. त्यामुळे प्राध्यापकांना काही विचारायचे की नाही, असा प्रश्न उपस्थित झाला आहे.’’ परीक्षा विभागाने डिसेंबरमध्ये पुढील सत्र परीक्षेची तयारी करत असल्याचे स्पष्ट केले होते. आता विद्यापीठाकडून शैक्षणिक वेळापत्रक अद्ययावत करण्यात आल्याचे सांगण्यात आले आहे.

घडलंय काय?

  • अजूनही पदव्युत्तर पदवी अभ्यासक्रमांचे प्रवेश सुरू

  • काही महाविद्यालयांत दिवाळीनंतर शिकविण्यास सुरुवात

  • डिसेंबरमध्ये पुढील सत्र परीक्षा प्रस्तावित, त्यामुळे अभ्यासक्रम उरकण्याची घाई

  • घाई-गडबडीत आणि अतिजलद पद्धतीने प्रात्यक्षिक परीक्षा

  • शैक्षणिक वेळापत्रक अद्ययावत केल्याचा विद्यापीठाचा दावा, मात्र प्राध्यापकांची शिकविण्याची घाई कायम

परिणाम

  • विद्यार्थ्यांना खरंच समजतेय का, याचा विचार न करता शिकविण्यास सुरुवात

  • अध्ययन आणि अध्यापनाचा दर्जा घसरला

  • विद्यार्थ्यांच्या प्रथम सत्राचे शैक्षणिक नुकसान

विनाकारण घाई नको...

एक सत्र ९० दिवसांचे असते, त्यासाठी विद्यापीठ शैक्षणिक वेळापत्रकही घोषित करत आहे. त्यामुळे प्राध्यापकांनी विनाकारण घाई न करता, अभ्यासक्रम शिकविणे गरजेचे आहे. जेणेकरून विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान टाळता येईल.

सर्वांचेच निकाल उशिरा लागल्यामुळे शैक्षणिक वेळापत्रक पुन्हा अद्ययावत करण्यात आले आहे. ९० दिवसांच्या सत्रपूर्ततेनंतरच विद्यार्थ्यांची परीक्षा होईल. वेळोवेळी अभ्यासक्रमांच्या अध्यापनाशी संबंधित आढाव अधिष्ठाता घेतील. प्राचार्यांचीही त्या संदर्भात बैठक घेण्यात येईल.

- डॉ. संजीव सोनवणे, प्र-कुलगुरू, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ

मला विश्वास आहे की, प्राध्यापक दिलेल्या वेळेतच अभ्यासक्रम पूर्ण करतील. विद्यापीठाच्या नियमानुसार ९० दिवसांच्या सत्रपूर्तीनंतरच परीक्षा होतील.

- डॉ. मनोहर चासकर, अधिष्ठाता, विज्ञान व तंत्रज्ञान विभाग