झेडपी नोकरभरती मागणीचे नियोजित आंदोलन स्थगित | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

झेडपी नोकरभरती मागणीचे 
नियोजित आंदोलन स्थगित
झेडपी नोकरभरती मागणीचे नियोजित आंदोलन स्थगित

झेडपी नोकरभरती मागणीचे नियोजित आंदोलन स्थगित

sakal_logo
By

पुणे, ता. ६ ः राज्यातील जिल्हा परिषदांमधील रिक्त पदांच्या भरतीसाठी सुमारे चार वर्षापूर्वी सुरू केलेले भरती प्रक्रिया अचानक रद्द केल्याच्या निषेधार्थ आणि या नोकरभरतीची प्रक्रिया त्वरित सुरू करण्याच्या मागणीसाठीचे नियोजित आंदोलन मागे घेण्यात आले आहे. स्पर्धा परीक्षा समन्वय समितीच्यावतीने या आंदोलनाची घोषणा करण्यात आली होती. हे आंदोलन येत्या सोमवारपासून राज्यातील २१ जिल्हाधिकारी कार्यालयांसमोर राज्यव्यापी आंदोलन करण्यात येणार असल्याची घोषणा या समितीचे समन्वयक राहुल कवठेकर यांनी केली होती.
या नियोजित आंदोलनास पोलिसांनी परवानगी नाकारली आहे. त्यामुळे हे नियोजित आंदोलन स्थगित करण्यात येत असून, या आंदोलनाला पोलिसांनी परवानगी नाकारणे हा मूलभूत हक्कांचे उल्लंघन करण्याचा प्रकार असल्याचा आरोप या समन्वय समितीच्यावतीने करण्यात आला आहे.
राज्याच्या ग्रामविकास विभागाच्यावतीने राज्यातील सर्व जिल्हा परिषदांमधील मिळून १३ हजार ५१४ रिक्त जागांच्या भरतीसाठी मार्च २०१९ मध्ये जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली होती. या जाहिरातीनुसार सुरु केलेली नोकरभरती प्रक्रिया राज्य सरकारने नुकतीच रद्द करत पुन्हा येत्या जानेवारी महिन्यात नव्याने प्रक्रिया सुरु करण्याची घोषणा केली आहे. जिल्हा परिषदांमधील पदांचा सुधारित आकृतिबंध करण्यासाठी याआधीची प्रक्रिया रद्द केल्याचे कारण राज्य सरकारच्यावतीने देण्यात आले आहे. दरम्यान, जिल्हा परिषदांमधील पदांच्या सुधारित आकृतिबंध तयार करण्यासाठी सोलापूर जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप स्वामी यांच्या अध्यक्षतेखालील सात सदस्यीय समिती स्थापन करण्यात आली आहे. या समितीला येत्या २१ डिसेंबरपर्यंतची मुदत देण्यात आली आहे.