महाविद्यालयांना तंबाखूजन्य पदार्थांचा विळखा | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

महाविद्यालयांना तंबाखूजन्य पदार्थांचा विळखा
महाविद्यालयांना तंबाखूजन्य पदार्थांचा विळखा

महाविद्यालयांना तंबाखूजन्य पदार्थांचा विळखा

sakal_logo
By

पुणे, ता. ६ : शहरातील शाळा आणि महाविद्यालयाच्या परिसरातच विद्यार्थ्यांना गुटखा, तंबाखूजन्य पदार्थ आणि सिगारेटची पाकिटे रोजरोजसपणे मिळत आहेत. शाळकरी मुलांभोवती पडलेला कर्करोगाचा विळखा आहे. त्यातून मुलांना आता सोडविले नाही तर भविष्यात कर्करोगावर नियंत्रण कसे ठेवणार, असा सवाल पुण्यातील कर्करोग तज्ज्ञांनी केला.

शाळा-महाविद्यालयात जाणारे काही विद्यार्थी जवळच्याच पानटपऱ्या आणि चहाच्या गाड्यांवर गुटख्याच्या पिचकाऱ्या किंवा सिगारेटचे झुरके मारताना दिसतात, असे निरीक्षण कोथरूडमधील महाविद्यालयातील पालक संघाचे अध्यक्ष हेमंत पाटील यांनी जागतिक कर्करोग दिनाच्या (७ नोव्हेंबर) पार्श्वभूमिवर नोंदविले. या पार्श्वभूमिवर कर्करोग तज्ज्ञांशी ‘सकाळ’ने साधलेल्या संवादात त्यांनी हा सवाल केला.

नियम काय, वस्तुस्थिती काय?
- शाळा, महाविद्यालये, तसेच अन्य शिक्षण संस्थांच्या शंभर मीटर परिसरात सिगारेट व तंबाखूजन्य पदार्थांच्या विक्रीवर बंदी
- निर्णयाची अंमलबजावणी २००५ पासून सुरू
- बंदीकडे शाळा-महाविद्यालयांचे लक्ष नाही
- पोलिस आणि अन्न व औषध प्रशासनाला या नियमाचा विसर
- शाळा-महाविद्यालयांजवळील दुकाने, पानाच्या व चहाच्या टपऱ्यांवर सिगारेट व तंबाखूजन्य पदार्थांची विक्री

काय केले पाहिजे?
मुलांना तंबाखूजन्य पदार्थ सहजतेने उपलब्ध होणार नाहीत, याची सक्षम व्यवस्था निर्माण केली पाहिजे. त्याच वेळी या व्यसनांच्या होणाऱ्या गंभीर परिणामांबद्दल मुलांमध्ये जाणीव जागृती करण्यासाठी सातत्याने उपक्रम हाती घेण्याची गरज आहे.

सवय तोडणे अवघड
तंबाखूचे व्यसन हे लहान वयात लागते आणि त्या व्यसनाबरोबर त्यातून सुटण्याचे मार्ग बंद होता. तंबाखूची सवय सुटणे अवघड असते. त्यामुळे या व्यसनाच्या मार्गाला जाऊ नये, असे आवाहन कर्करोग तज्ज्ञांनी केले.

देशात गेल्या दहा वर्षांमध्ये तोंडाच्या कर्करोगाचे वय सुमारे दहा ते पंधरा वर्षांनी कमी झाले आहे. यापूर्वी पन्नाशी जवळ आलेल्या रुग्णाला तोंडाच्या कर्करोगाचे निदान होत असे. ते प्रमाण पस्तीशीपर्यंत आले आहे. त्यातही जिभेच्या कर्करोगाचे प्रमाण सर्वाधिक आहे. त्यामागे कमी वयात तंबाखूची सवय लागणे हे एक प्रमुख कारण आहे. त्यामुळे शाळांच्या परिसरात होणारी तंबाखूजन्य पदार्थांची विक्री थांबविली पाहिजे.
- डॉ. संजय देशमुख, कर्करोग शल्यचिकित्सक, रूबी हॉल क्लिनिक

भविष्यातील ५० टक्के कर्करोग हे सिगारेट आणि तंबाखूमुळे झालेले असतील. शाळकरी वयातच पानतंबाखूचे व्यसन मुलांना लागते. त्यामुळे शाळेजवळ अशी दुकाने असू नये. एका बाजूला आपण कर्करोगावर प्रभावी उपचार करण्याचे प्रयत्न करत आहोत, पण दुसरीकडे कर्करोगाला प्रतिबंध करण्यात कमी पडत असल्याचे दिसते.
- डॉ. अनंतभूषण रानडे, कर्करोग तज्ज्ञ, संजीवन हॉस्पिटल